विरोधकांचा एकोप्याने सामना करा - महाविकास आघाडी

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 25 February 2020

पंचवीस हजार कोटींच्या पुरवणी मागण्या
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात आज (सोमवारी) पहिल्या दिवशी राज्य सरकारने २४ हजार, ७२३ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. यात सर्वाधिक पंधरा हजार कोटी रुपयांची तरतूद शेतकरी कर्जमाफीसाठी करण्यात आली. त्यामुळे राज्य शासनाने आतापर्यंत एकंदर २५ हजार कोटी रुपये शेतकरी कर्जमाफीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंतच्या कालावधीत अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या; तसेच या कालावधीत अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन, फेरपुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे थकीत दोन लाख रुपये कर्ज माफ केले जाणार आहे. या योजनेची अंमलबजावणी येत्या मे महिन्याअखेर पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नुकताच १० हजार कोटी इतका निधी आकस्मिकता निधीतून आगाऊ रक्कम उपलब्ध करून देण्यास शासनाने मान्यता दिली. त्यानंतर आता पुरवणी मागण्यांमध्ये १५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई - सरकारच्या निर्णयाचा व धोरणांचा अभ्यास करून ते प्रभावीपणे मांडताना तिन्ही पक्षांच्या आमदार व नेत्यांनी एकोप्याने विरोधकांचा सामना करावा, असा निर्धार आज महाविकास आघाडी सरकारच्या संयुक्‍त बैठकीत व्यक्‍त करण्यात आला. विधान भवनात आज शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांची संयुक्‍त बैठक पार पडली. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदारांना मार्गदर्शन केले.

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

सध्या सीसीए, एनआरसी व एनपीआरच्या मुद्द्यावरून ़ महाविकास आघाडीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रश्‍नावर अकारण आक्रमक होण्याचा विरोधकांचा मानस आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व आमदारांनी त्याकडे दुर्लक्ष करत वादग्रस्त वक्‍तव्ये टाळावीत. जे राष्ट्रीय मुद्दे ‌आहेत त्यावर तिन्ही पक्षांच्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांमधे चर्चा होत असतात. राज्य विधिमंडळात त्यावर चर्चा करण्याची आवश्‍यकता नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी आमदारांसमोर स्पष्ट केले.  प्रत्येक पक्षाची विचारधारा वेगळी असल्याने त्यांना ती सांभाळण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, सरकार या विचारधारांवर एकत्र आले नसून किमान समान कार्यक्रमावर एकत्र आले आहे. त्यामुळे जाहीरनाम्यातील बाबींवरच तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी व आमदारांनी लक्ष केंद्रित करावे, असे ठाकरे यांनी सांगितले. राष्ट्रीय प्रश्‍नांसदर्भात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली असून, यापुढेही तिन्ही पक्षांच्या नेत्यांसोबत अशा विषयांवर चर्चा करू, असे ठाकरे म्हणाले.

'भाजप नेत्यांना पायऱ्यांवर पाहून आमचे दिवस आठवले, ओरडून घसा कोरडा व्हायचा'

भाजपचे आमदार आक्रमक
भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी सोमवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आक्रमक होत सरकारविरोधात दोन्ही सभागृहांत गदारोळ केल्याने दिवसभराचे कामकाज तहकूब करण्यात आले. 

शेतकरी कर्जमाफी आणि महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांबाबत विरोधी आमदारांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह महाविकास आघाडी सरकारने एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. सत्ता स्थापन करताना या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी अनेक आश्‍वासने दिली. मात्र, अद्याप एकाही आश्‍वासनाची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. विधानसभेचे कामकाज सुरू झाल्याबरोबरच फडणवीस यांनी स्थगन प्रस्तावाचा मुद्दा उपस्थित करत, शेतकरी कर्जमाफीवर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ही मागणी फेटाळून लावली. यामुळे भाजपचे सर्व आमदार आक्रमक घोषणाबाजी करत अध्यक्षांच्या आसनासमोर जमा झाले. 

अधिवेशन सुरू  होण्यापूर्वी विरोधकांनी निषेधाचे फलक हातात घेऊन विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले.विधान परिषदेतही याच विषयावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शेतकरी कर्जमाफीवर स्थगन प्रस्ताव मांडण्यचा प्रयत्न केला.

शेतकऱ्यांना २५ हजार ते ५० हजार रुपये नुकसानभरपाई देऊ, असे महाविकास आघाडी सरकारने सांगितले होते. मात्र, यातील एक नवा पैसा अद्याप त्यांना मिळालेला नाही. महिला अत्याचारांत वाढ झाली आहे. याबाबत सरकारची संवेदनशीलता दिसत नाही.
- देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fight opponents one by one mahavikas aghadi