अवनी’ येणार मोठ्या पडद्यावर ! विदर्भातील वन्यजीव-मानव संघर्ष प्रथमच रूपेरी पडद्यावर 

राजेश रामपूरकर
Saturday, 24 October 2020

चित्रपटाच्या शूटिंगचे ६० टक्के काम मध्यप्रदेशातील जंगलात पूर्ण झाले आहे. कोरोनामुळे मार्चअखेर ‘शेरनी’चे शूटिंग थांबवण्यात आले होते. आता बालाघाट येथील रेंजर कॉलेजचे प्राचार्य यांच्या बंगल्यात विद्या बालन यांच्या हस्ते पूजा करून चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक काळजी घेत विद्या बालनने शूटिंग सुरू केले आहे. २५ ऑक्टोबरपर्यंत चित्रीकरण चालणार आहे.

नागपूर :  यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा-राळेगाव तालुक्यात १३ जणांचा बळी घेणाऱ्या अवनी (टी १) वाघिणीच्या जीवनपटावर ‘शेरनी’ चित्रपटाचे चित्रीकरण केले जात आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने विदर्भातील मानव-वन्यजीव संघर्ष प्रथमच मोठ्या पडद्यावर झळकणार असून, या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन महिला उपवनसंरक्षकाची भूमिका साकारणार आहे. 

चित्रपटाच्या शूटिंगचे ६० टक्के काम मध्यप्रदेशातील जंगलात पूर्ण झाले आहे. कोरोनामुळे मार्चअखेर ‘शेरनी’चे शूटिंग थांबवण्यात आले होते. आता बालाघाट येथील रेंजर कॉलेजचे प्राचार्य यांच्या बंगल्यात विद्या बालन यांच्या हस्ते पूजा करून चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक काळजी घेत विद्या बालनने शूटिंग सुरू केले आहे. २५ ऑक्टोबरपर्यंत चित्रीकरण चालणार आहे. जियल इंटरटेनमेंट सर्व्हिसला मध्यप्रदेश सरकारने काही अटींवर चित्रपट निर्मितीसाठी परवानगी दिलेली आहे.

क्या बात है! हॉलिडे बनले 'सायन्स डे'; आयसरचे सोपे विज्ञान प्रयोग पोहोचला सातासमुद्रापार

अमित मसुरकर दिग्दर्शित या चित्रपटात विद्या बालन वन अधिकारी या भूमिकेत दिसेल. या चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वी विद्या बालन शंकुतला देवी चित्रपटात दिसल्या होत्या. कोरोना आणि लॉकडाउनमुळे चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. शकुंतला देवीच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले. 

कोण आहे अवनी? 

यवतमाळ जिल्ह्यातील टी १ या अवनी वाघिणीने २०१६ पासून दोन वर्षात १३ जणांचा जीव घेतला. व्यक्तींच्या जखमांतील वाघिणीच्या लाळेची डीएनए चाचणी घेण्यात आली होती. त्यातील पाच व्यक्तींचा मृत्यू वाघिणीच्या हल्ल्यात झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्या वाघिणीला ठार मारण्याचे आदेश दिले होते. तत्कालीन सरकारने त्या वाघिणीला ठार मारण्यासाठी खासगी शिकारी शाफत अली याला नियुक्ती केल्याने हा वाद चिघळला. त्याचा मुलगा असगर अली याने अवनीला ठार मारल्यानंतर प्रचंड आरोप-प्रत्यारोप झाले. चित्रपट अभिनेत्री रविना टंडन, दाक्षिणात्य अभिनेते सिद्धार्थ, विद्यमान पर्यावरण मंत्री व शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी त्यांच्याच सरकारवर टीका केली होती. तसेच हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही गेले होते. त्यामुळे या चित्रपट कधी रिलीज होणार हे अद्याप निश्चित झालेले नसले तरी या चित्रपट कधी प्रदर्शित होईल याची उत्सुकता आहे. याबाबत वरिष्ठ वनाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर हा चित्रपट अवनी वाघिणीवरच असल्याचे सांगितले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Film will coming soon on Tiger Awni shooting started at Balaghat