महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबत वाटाघाटींचे गुऱ्हाळ आता मुंबईत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 November 2019

- मुख्यमंत्रिपद आणि विधानसभा अध्यक्षांबाबत दोन्ही कॉंग्रेसमध्ये मतभेद 

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सरकार बनविण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वाटाघाटींचे गुऱ्हाळ आता मुंबईत चालणार आहे. दोन्ही पक्षांची दिल्लीतील बोलणी आज आटोपली. उद्या लहान मित्रपक्षांशी विचारविनिमय केल्यानंतर दोन्ही पक्ष शिवसेनेशी बोलतील. मात्र, अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद आणि विधानसभा अध्यक्षपद कोणाकडे असावे, यावर अजूनही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सहमती झाली नसल्याचे समजते. यामुळे रविवारपर्यंत बोलणी पूर्ण होणे अपेक्षित असून पुढील आठवड्यात नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतो. 

महाराष्ट्रात 22 दिवसांपासून असलेल्या राजकीय अस्थिरतेवरील तोडगा आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. सरकार स्थापनेच्या वाटाघाटी सुरळीत चालल्या असल्या तरी केंद्रातील भाजप नेतृत्वाकडून येऊ शकणारे संभाव्य अडथळे यामुळे दोन्ही कॉंग्रेसकडून सावध पावले टाकली जात आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या उपस्थितीत काल दोन्ही पक्षांच्या राज्यपातळीवरील नेत्यांची बोलणी उशिरापर्यंत चालली होती. मात्र, वाटाघाटी पूर्ण झाल्या नसल्याचेच दोन्ही बाजूंचे नेते सांगत होते. त्या पार्श्‍वभूमीवर आज पुन्हा दोन्ही पक्षांचे बैठकसत्र चालले. दोन्ही बाजू किमान समान कार्यक्रम ठरविणे आणि त्यानुसार सरकार चालविणे यावर सहमत असल्या तरी महत्त्वाच्या खात्यांवरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच चालली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रयत्न अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळावे यासाठी आहे. तर सत्तेत समसमान वाटा मिळावा, यासाठी प्रयत्नशील असलेल्या कॉंग्रेसने दोन उपमुख्यमंत्री नेमण्याचा आणि विधानसभा अध्यक्षपद मिळावे यासाठीचा प्रस्ताव दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर उशिरापर्यंत चाललेली बोलणी अर्धवट राहिल्याने मुंबईत उर्वरित वाटाघाटी पूर्ण करण्याचे ठरले. 

तत्पूर्वी, कॉंग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीतही महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि शिवसेनेसोबत जाण्याबाबत चर्चा झाली. कॉंग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत दुजोरा दिला. राज्यातील स्थितीची कार्यकारिणी सदस्यांना माहिती देण्यात आली असून राष्ट्रवादी कॉंग्रेससमवेत आजही बोलणी होतील. त्यानंतर उद्या मुंबईत उर्वरित वाटाघाटी होतील, असे वेणुगोपाल यांनी सांगितले. 

काल (ता.20) सोनिया गांधींनी होकार दिल्यानंतरच कॉंग्रेसने राष्ट्रवादी कॉंग्रेसशी बोलणीला सुरुवात केली होती. त्यानंतर आज कार्यकारिणी बैठकीनंतर कॉंग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी 15 गुरुद्वारा रकाबगंज या वॉर रुममध्ये राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर स्वतंत्रपणे चर्चा केली. त्याचवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचीही शरद पवार यांच्या 6 जनपथ या निवासस्थानी बैठक झाली. यानंतर दुपारी दोनच्या सुमारास दोन्ही बाजूंच्या नेत्यांची एकत्रित बैठक पवार यांच्या निवासस्थानी होऊन त्यात शिवसेनेला द्यावयाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाले. 

कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी बैठकीनंतर पत्रकारांना या निर्णयाची माहिती दिली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने सर्व मुद्‌द्‌यांवरील चर्चा पूर्ण केली असून दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. उद्या मुंबईत निवडणूकपूर्व आघाडीतील मित्रपक्षांशी आधी बोलणी होईल. आतापर्यंतच्या चर्चेची त्यांना माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शिवसेनेशी बोलतील आणि सहमती झाल्यानंतर मुंबईतच औपचारिक घोषणा होईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

सरकारची रचना, मंत्र्यांची संख्या तसेच खातेवाटप याबाबत माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्या निव्वळ अटकळबाजी असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. या बैठकीनंतर शरद पवार यांच्यासह दोन्ही कॉंग्रेसचे प्रदेशस्तरीय नेते मुंबईला रवाना झाले आहेत. 

दिवसभरात

- कॉंग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत महाराष्ट्राच्या स्थितीवर चर्चा 
- कॉंग्रेसच्या राज्यस्तरीय आणि केंद्रीय नेत्यांची 15 गुरुद्वारा रकाबगंज या "वॉररूम'मध्ये चर्चा 
- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचा सहा जनपथ या शरद पवार यांच्या निवासस्थानी विचारविनिमय 
- शिवसेना नेते संजय राऊत संसद भवनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटले 
- कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या एकत्रित चर्चेमध्ये सरकार स्थापनेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब 

काँग्रेसची नेतानिवड आज 

कॉंग्रेसचे खजिनदार अहमद पटेल, प्रभारी सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे आणि संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हेदेखील मुंबईत पोचणार आहेत. उद्याच कॉंग्रेसची विधीमंडळ पक्षनेता निवडीची औपचारिकता पार पाडली जाईल. कॉंग्रेसच्या परंपरेप्रमाणे आमदारांचे म्हणणे ऐकले जाईल आणि नेतानिवडीसाठी कॉंग्रेस अध्यक्षांना सर्वाधिकार देण्याचा एक ओळीचा ठराव मंजूर केला जाईल. त्यानंतर नव्या विधीमंडळ पक्ष नेत्याच्या नावाची घोषणा दिल्लीतून होईल, असे समजते. 

दावा पुढील आठवड्यात शक्‍य 

राज्यपाल भगतसिंह कोशियारी हे दोन दिवसीय राज्यपाल परिषदेसाठी उद्या (शुक्रवारी) दिल्लीत पोचणार आहेत. शनिवारी परिषदेचा समारोप होणार असून, राज्यपाल सोमवारी मुंबईत पोचण्याची शक्‍यता आहे. त्यानंतरच शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसतर्फे बहुमताचा औपचारिक दावा राज्यपालांकडे केला जाईल. यामुळे शपथविधीला विलंब होण्याची शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Final Discussion for Maharashtra Government Formation in Mumbai