महाशिवआघाडीचा गुंता सुटला?; शरद पवार-सोनिया गांधी अंतिम बैठक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 November 2019

आज झालेल्या बैठकीत किमान समान कार्यक्रमाला अंतिम स्वरुप देण्यात आलं आहे. मात्र, शनिवारी सोनिया गांधी- शरद पवार यांच्यामध्ये होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुंबई : महाशिवआघाडी महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार हे अंतिम झाल्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांच्या एकावर एक बैठका आयोजित केल्या जात आहेत. आता याबाबतची अंतिम बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या दोघांमध्ये शनिवारी (ता.16) दिल्लीत होणार असल्याचे माहिती पुढे आली आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

गुरुवारी (ता.14) महाशिवआघाडीच्या पक्षांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीत एकमेकांच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत काडीमोड झाल्याने सेनेने आघाडीसोबत हातमिळवणी केली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले होते. मात्र, त्यांना दिलेल्या वेळेत ते 145 आमदारांचे संख्याबळ सिद्ध करू शकले नाहीत. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. 

त्यानंतर आज मुंबईत महाशिवआघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठक पार पडली. राष्ट्रवादीचे जयंत पाटील, छगन भुजबळ, नवाब मलिक, शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई आणि काँग्रेसतर्फे माणिकराव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. 

तिन्ही पक्षांच्या विचारधारा वेगवेगळ्या असल्यामुळे किमान समान कार्यक्रम ठरविण्यासाठी या बैठका होत असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. आज झालेल्या बैठकीत किमान समान कार्यक्रमाला अंतिम स्वरुप देण्यात आलं आहे. मात्र, शनिवारी सोनिया गांधी- शरद पवार यांच्यामध्ये होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

बाळासाहेबांची शपथ घेऊन, सांगतो हे ठरलं होतं : संजय राऊत 

तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्रीपद कुणाच्या वाट्याला जाणार याविषयी खुलासा केला. ते म्हणाले की, किमान समान कार्यक्रम ठरविणे आणि आगामी सरकारचा अजेंडा काय असेल याविषयी काँग्रेस आग्रही आहे.

ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतील. शिवसेनेचं संख्याबळ जास्त असल्याने मुख्यमंत्रीही त्यांचाच होईल. याबाबत आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. जयपूरहून मुंबईत आल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीदेखील मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असे संकेत दिले होते. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात आनंदाचं वातावरण पसरलं आहे.   

बच्चू कडू ताब्यात, राष्ट्रपती राजवटीत मोर्चाला परवानगी नाही? 

या सर्व बैठकांमध्ये झालेल्या चर्चांचं फलित शनिवारी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत मिळणार की नाही, याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवार राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Final meeting about Mahashivaghadi between Sharad Pawar and Sonia Gandhi will be held on Saturday in Delhi