पदभरतीवरील ‘वित्त’चे निर्बंध उठले! राज्यात ९० हजार पदांची मेगाभरती शक्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mantralay
पदभरतीवरील ‘वित्त’चे निर्बंध उठले! राज्यात ९० हजार पदांची मेगाभरती शक्य

पदभरतीवरील ‘वित्त’चे निर्बंध उठले! राज्यात ९० हजार पदांची मेगाभरती शक्य

सोलापूर : सद्यस्थितीत शासनाच्या ३४ प्रमुख विभागांमध्ये दोन लाखांवर पदे रिक्त आहेत. एकूण रिक्त पदांच्या ५० टक्के पदांच्या वेतनावरील खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असून पदभरतीवरील सर्व निर्बंधही वित्त विभागाने उठविले आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीनंतर पहिल्या टप्प्यात ७० हजार ते ९० हजार पदांची मेगाभरती होऊ शकते, अशी माहिती राज्याच्या वित्त विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

हेही वाचा: महापालिका निवडणुकीसाठी महाआघाडीचा ४०: ४० :३३ फॉर्म्युला

राज्य सरकारी विभागांमध्ये मागील सहा वर्षांत मोठी पदभरती झालेली नाही. आता राज्याच्या गृह विभागात जवळपास १८ हजार, जलसंपदा विभागात १५ हजार, पशुसंवर्धन, कृषी, मराठी राजभाषा विभाग, महसूल, भूमीअभिलेख, पुरवठा विभाग, शिक्षण अशा विभागांमध्ये रिक्त पदांची संख्या वाढली आहे. पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेऊनही बरेच तरूण-तरुणी घरीच असून काहीजण कुटुंबाच्या आर्थिक अडचणींमुळे मिळेल ते काम करीत आहेत. सरकारी नोकऱ्या नसल्याने अनेकजण विशेषत: मुली मधूनच शिक्षण सोडून देत असल्याचीही वस्तुस्थिती आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात घोषित झालेली ६० हजार पदांची मेगाभरती अजूनही झालेली नाही. त्यामुळे तरूणांमध्ये नाराजीचा प्रचंड सूर आहे. या पार्श्वभूमीवर वित्त विभागाने पदभरतीवरील सर्व निर्बंध उठविले असून आता सर्व विभागांनी त्यांच्याकडील मंजूर व रिक्तपदांच्या आकृतीबंधास मान्यता घेऊन पदभरती सुरु करण्याची कार्यवाही सुरु केली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांवर दरवर्षी एक लाख ३१ हजार कोटींचा तर ग्रॅच्युटी व पेन्शनवर दरवर्षी जवळपास ५६ हजार कोटींचा खर्च होतो. दरम्यान, एकूण रिक्तपदांच्या ५० टक्के पदभरती होईल, असे ग्राह्य धरून तेवढ्या रकमेची तरतूद केल्याचेही वित्त विभागाकडून सांगण्यात आले. आता आकृतीबंधास अंतिम मान्यता मिळाल्यानंतर ही पदभरती अपेक्षित आहे.

हेही वाचा: नेत्यांसमोर आमदारकीचा पेच! कोठे, चंदनशिवे, बेरिया, तौफिक यांचा जूनमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश

राज्यातील सरकारी पदांची स्थिती
एकूण मंजूर पदे
११,५३,०४२
भरलेली पदे
८,७४,०४०
रिक्त पदांची संख्या
२,०६,३०३
वेतनावरील एकूण खर्च
१.३१ लाख कोटी

हेही वाचा: गड्या आपली मराठी शाळाच बरी! झेडपी,महापालिका शाळांचा वाढली पटसंख्या

काँग्रेसचा कॉमन मिनिमम प्रोग्राम
शेतकरी कर्जमाफीसोबतच राज्यातील सुरक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम हादेखील मुद्दा काँग्रेसच्या मिनिमम प्रोग्राममध्ये समाविष्ठ आहे. त्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मागील अधिवेशनात यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. शासकीय रिक्त पदांची संख्या वाढल्याने विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे रिक्त पदांची भरती तातडीने व्हावी, अशी काँग्रेसची मागणी आहे.

Web Title: Finance Restrictions On Recruitment Lifted Mega Recruitment Of 90000 Posts Possible In The

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..