महापालिका निवडणुकीसाठी महाआघाडीचा ४०: ४० :३३ फॉर्म्युला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ncp-congress-shivsena
निवडणुकीसाठी महाआघाडीचा ४०: ४० :३३ फॉर्म्युला

महापालिका निवडणुकीसाठी महाआघाडीचा ४०: ४० :३३ फॉर्म्युला

सोलापूर : आगामी दोन-तीन महिन्यांत महापालिका निवडणूक होऊ शकते. तत्पूर्वी, सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरु केली असून इच्छुकांचा अंदाज घेऊन उमेदवारी निश्चित केली जात आहे. सोलापूर महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढतील. महापालिकेतील ११३ जागांवर काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी ४० तर शिवसेनेला ३३ जागा देऊन महाविकास आघाडी भाजपला टक्कर देईल, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

महापालिकेवर ८ मार्चपासून प्रशासक असून आयुक्त सध्या सर्व कारभार हाकत आहेत. तरीही, आपल्या प्रभागातील अडचणी महापालिकेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी नगरसेवक आयुक्तांकडे तशी मागणी करीत आहेत. अनेक वर्षांनंतर मिळालेली सत्ता टिकविण्यासाठी भाजपचा प्रयत्न सुरु आहेत. तर हातून गेलेली सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीने नियोजन सुरु केले असून दोन्ही पक्षातील अनेक वरिष्ठ नेतेमंडळी सोलापूर दौरे करीत आहेत. जागावाटपाचे भांडण न करताना भाजपला सत्तेपासून रोखणे हाच प्रमुख हेतूने महाविकास आघाडीचा राहणार आहे. भाजपकडूनही आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक काळात काही दिवस सोलापूर शहरात तळ ठोकून असतील. आता महापालिकेवरील प्रशासकराज संपून निवडणूक कधी जाहीर होणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

ज्याच्या जागा अधिक, त्यांचाच महापौर
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉम्युला कसाही ठरला, तरी ज्या पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून येतील, त्यांचाच महापौर होणार आहे. तर दुसऱ्या क्रमांकावरील पक्षाकडे उपमहापौरपद जाईल हे निश्चित आहे. त्यामुळे पदांचा तिढा या पध्दतीने सुटेल, पण जागा वाटपाबद्दल शिवसेना व काँग्रेसची भूमिका काय राहील, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

भाजपच्या दोन्ही माजी मंत्र्यांचा लागणार कस
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सोलापूर जिल्ह्यातून आमदार सुभाष देशमुख व आमदार विजयकुमार देशमुख यांची वर्णी लागली होती. महापालिका निवडणुकीची जबाबदारी आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर सोपविली आहे. पण, महापालिकेवरील सत्ता कायम ठेवण्यासाठी त्या दोन्ही मंत्र्यांना तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीविरोधात ताण काढावा लागणार, हे निश्चित. तर भविष्यात पक्षातील स्थान आणखी बळकट करण्यासाठी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे व शिवसेनेतून राष्ट्रवादीत जाणारे महेश केाठे यांनाही कसरत करावी लागणार आहे.