सरपंचाने भ्रष्टाचार केल्यास गुन्हा होणार दाखल, शासनाचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sarpanch

सरपंचाने भ्रष्टाचार केल्यास गुन्हा होणार दाखल, शासनाचे आदेश

शिरपूर जैन (जि. वाशिम) : गाव कारभार चालविताना ग्रामपंचायतीच्या (grampanchayat) आर्थिक व्यवहारात अनियमितता करणे, मालमत्ता अथवा निधीचा अपहार करणे, ग्रामपंचायतीतील मूळ दस्तऐवजामध्ये खोट्या, बनावट कागदपत्रांचा समावेश करणे, असे प्रकार करणाऱ्या सरपंचांना आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. भ्रष्ट सरपंचाविरोधात (corruption in grampanchayat) फौजदारी गुन्हा दाखल करून अपहाराची रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्याचा आदेश राज्याच्या ग्रामविकास खात्याने जिल्हा परिषद, पंचायत समितीला दिला आहे, त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा: खेळण्याच्या वयात दृष्टी गेली, तरीही शिकवणीशिवाय करतोय IAS ची तयारी

गावो-गावी ग्रामपंचायतद्वारे शासकीय योजना राबवत असताना भ्रष्टाचाराचे प्रकार उघडकीस आले आहेत, असे प्रकार गंभीर स्वरूपाचे असल्याने शासनाने आता फौजदारी कारवाई बरोबरच अपहार केलेली रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्यात जबाबदार असणाऱ्या संबंधित सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, कर्मचारी यापैकी कोणीही अथवा सर्वजण चौकशीअंती दोषी आढळल्यास संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे आदेशात नमूद केले आहे. ग्रामपंचायत हा लोकशाहीचा कमी आणि भ्रष्टाचाराचा पाया जास्त असेच विदारक चित्र पाहायला मिळते. सरपंच आणि ग्रामसेवक या कर्तव्यदक्ष अधिकारी-पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने अनेक गावांची वाट लागल्याच्या तक्रारी शासन दरबारी दाखल झाल्या आहेत. विरोधकांनी त्यांचे कितीही भ्रष्टाचार बाहेर काढले असले, तरीही कारवाई होत नसल्याने अशा महाठगांचे फावले आहे. आता त्याला ब्रेक लावणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य शासनाचा विविध प्रकारचा निधी आता थेट ग्रामपंचायतींना येत आहे. यात प्रामुख्याने वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतला सर्वाधिक मिळत आहे. निधीचा गैरवापर करण्याचे प्रकार वाढत असल्याच्या तक्रारी ग्रामविकास खात्याकडे प्राप्त झाल्या आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न केले आहेत. अपहाराच्या रकमेत विभागीय चौकशींमध्ये गुन्हा घडल्याबाबत निष्कर्ष काढण्यात आल्यास संबंधिताविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच ज्या प्रकरणांमध्ये कोणतीही चौकशी झालेली नाही, अशा प्रकरणी संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी प्राथमिक चौकशी करावी, चौकशी एका महिन्यांमध्ये पूर्ण करणे अनिवार्य असल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे.

Web Title: Fir Will File Against Sarpanch If He Commits Corruption

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Akola