अगोदर तापमान वाढणार मग मुसळधार पाऊस येणार! सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार परतीचा मॉन्सून; हवामान तज्ज्ञ म्हणाले, ‘या’ भागात पडेल पाऊस

उजनी धरण भरले, कित्येक लाख लिटर पाणी भीमा नदीतून सोडून दिले. भीमा काठ महापुरात, तर उर्वरित जिल्हा कोरड्या दुष्काळाच्या संकटात आल्याने ही रुखरुख कायम आहे. ऑगस्टअखेरपर्यंत आपल्याकडे तापमान वाढेल आणि जम्मू-काश्मीर व राजस्थानमध्ये तापमान कमी होईल. राजस्थानमध्ये हवेचा दाब कमी झाल्याने साधारण १ सप्टेंबरपासून मॉन्सून परतीच्या प्रवासाला निघेल. परतीच्या मॉन्सूनमध्ये सोलापूरसह काही जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस होईल.
temprature

temprature

sakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : उजनी धरण भरले, कित्येक लाख लिटर पाणी भीमा नदीतून सोडून दिले. भीमा काठ महापुरात, तर उर्वरित जिल्हा कोरड्या दुष्काळाच्या संकटात आल्याने ही रुखरुख कायम आहे. ऑगस्टअखेरपर्यंत आपल्याकडे तापमान वाढेल आणि जम्मू-काश्मीर व राजस्थानमध्ये तापमान कमी होईल. राजस्थानमध्ये हवेचा दाब कमी झाल्याने साधारण १ सप्टेंबरपासून मॉन्सून परतीच्या प्रवासाला निघेल. परतीच्या मॉन्सूनमध्ये सोलापूरसह काही जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.

जून, जुलैमध्ये पावसाने हुलकावणी दिल्याने खरिपाच्या पेरण्या झाल्या नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी देवाच्या भरवशावर पेरले, त्यांचे पीक आता ऑगस्टमध्ये पावसाअभावी जळून जाऊ लागले आहे. पावसाने पाठ फिरविल्याने यंदाचा खरीप गेला. आता किमान रब्बी तरी हाताला लागावा, अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करू लागला आहे. रब्बी ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्याचे आता परतीच्या पावसाकडे लक्ष लागले आहे.

परतीच्या मॉन्सूनमध्ये मुसळधार पाऊस झाल्यास रब्बी हंगामात ज्वारी, करडई यासारखी पिके घेता येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात खऱ्या अर्थाने बैलपोळ्यानंतरच पावसाला सुरुवात होत असल्याचे ज्येष्ठ सांगतात. यंदा अधिक महिन्यामुळे बैलपोळा १० सप्टेंबरला आला आहे. सध्याची हवामानाची स्थिती व अंदाज आणि पोळ्यापासून सुरू होणारा सोलापूरचा पावसाळा हा अनुभव पाहता, सप्टेंबर महिना यंदा सोलापूरसाठी आशादायी आहे.

आतापर्यंतचा पाऊस, मिलिमीटरमध्ये

  • जून : ८२.० (८० टक्के)

  • जुलै : ७५.४ (७९.५ टक्के)

  • २० ऑगस्टपर्यंत : २२.७ (३४.४ टक्के)

‘या’ भागात सप्टेंबरमध्ये पडेल पाऊस

प्रशांत महासागरात पेरू दरम्यान सध्याचे तापमान २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. विषुववृत्तात तापमान २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. अल निनोचा प्रभाव असता तर सध्या हे तापमान २८ अंश सेल्सिअसच्या वर हवे होते. आयओडी पॉझिटिव्ह झाला आहे, हिंद महासागरातील तापमान वाढू लागले आहे. अल निनोचा प्रभाव कमी झाल्याने परतीचा मॉन्सून चांगली हजेरी लावण्याची शक्यता आहे. परतीच्या मॉन्सूनवर सोलापूरसह महाराष्ट्रातील १५ जिल्हे व जवळपास ८४ तालुके अवलंबून आहेत. या भागात सप्टेंबरमध्ये पाऊस दमदार हजेरी लावेल, असा अंदाज आहे.

- डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com