पूरातील अडीच लाख नागरिक सुरक्षितस्थळी : चंद्रकांत पाटील

पूरातील अडीच लाख नागरिक सुरक्षितस्थळी : चंद्रकांत पाटील

मुंबई : कोल्हापूर व सांगलीतील पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाचे आपत्ती नियंत्रण कक्ष, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर, नौदल, वायूदल, तटरक्षक दलाचे जवान कार्यरत आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून केंद्र शासनाकडूनही मदत घेण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे राज्य शासनाच्या संपर्कात असून केंद्राकडून लागेल ती मदत करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. बचाव पथकाने आतापर्यंत 2 लाख 52 हजार 813 जणांना सुरक्षित स्थळी हलविले असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. 

कोल्हापूर व सांगलीमध्ये जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, स्थानिक प्रशासनाबरोबरच ओडिसा, पंजाब व गुजरात राज्यातील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे 22 तसेच नौदलाच्या 26, तटरक्षक दलाचे सांगलीमध्ये 2 व कोल्हापुरात 9 पथके, सैन्यदलाचे 8 पथके, राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे सांगलीमध्ये दोन तर कोल्हापुरात एक अशी तीन पथके कार्यरत आहेत. तसेच कोल्हापुरात 76 तर सांगलीमध्ये 90 बोटींद्वारे बचाव कार्य सुरू आहे. पूरपरिस्थितीबद्दल राज्य शासनाने केंद्र शासनाशी तत्काळ संपर्क साधल्यामुळे सैन्य दलाची व तटरक्षक दलाची पथके कार्यरत झाली आहेत. मदत व पुनर्वसन विभागाचे आपत्ती नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत असून वेळोवेळी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाबरोबर मदती संदर्भात संपर्कात आहे. 

सध्या कर्नाटकातील आलमट्टी धरणातून आज दुपारपर्यंत 4 लाख 50 हजार क्‍युसेक्‍स पाणी सोडण्यात येत असून त्यामुळे कोल्हापुरातील पाणी पातळी कालच्या पेक्षा कमी झाली आहे. तसेच सांगलीतील पाणी पातळी स्थिर आहे. पाऊस कमी झाल्यानंतर या ठिकाणची पाणीपातली आणखी कमी होण्यास मदत होईल. 

पूरग्रस्तांना मदतीसाठी राज्य शासनाने 154 कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यातून ग्रामीण भागातील आपत्तीग्रस्त नागरिकांना प्रति कुटुंब 10 हजार तर शहरी भागातील प्रति कुटुंब 15 हजार रुपये मदत करण्यात येणार आहे. ही मदत तातडीने वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

कोल्हापूर जिल्ह्यातील 8 तालुक्‍यातील 239 गावे व सांगली जिल्ह्यातील 4 तालुक्‍यातील 90 गावे अशी 12 तालुक्‍यातील 329 गावे पुरामुळे बाधित झाली आहेत. पुरामुळे बाधित गावातील दोन लाख 52 हजार जणांना बचाव पथकानी सुरक्षितस्थळी हलविले असून विविध 270 ठिकाणी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवासाच्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. 

सांगली जिल्ह्यातील सांगलवाडी व हरिपूर येथे एनडीआरएफ व एसडीआरएफची टीम बचाव कार्य सुरू करत आहेत. सांगलवाडीत वीस ते बावीस बोटीद्वारे बचावकार्य सुरू आहे. तसेच एअरलिफ्टिंगने नागरिकांना हलविण्यात येत आहे. तर हरिपूरमध्येही बोटीतून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

मिरज, पलूस व वाळवा तालुक्‍यातही प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांच्या राहण्याची, जेवणाची व औषधोपचाराची सोय केली आहे. याबरोबरच जनावरांच्या बचावासाठीही प्रयत्न सुरू आहेत. कवलापूर येथे तीन हेलिकॉप्टरने बचावकार्य सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com