पूररेषांच्या उसळीने पाणी पाणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

सर्वसाधारण परिस्थितीत पूररेषा काही सेंटीमीटरने आतापर्यंत वाढते. पण, यंदा मात्र एकाहून अधिक ठिकाणी ही पूररेषा ५०० सेंटीमीटरपेक्षा (५ मीटर) जास्त वाढली असल्याचे प्राथमिक निरीक्षण या संस्थेने नोंदविले आहे.

पुणे - कृष्णा खोऱ्यातील प्रमुख नद्या आणि उपनद्यांच्या पूररेषेची उंची अविश्‍वसनीय वाढली, असा निष्कर्ष ‘साउथ आशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर्स अँड पीपल’ने (एसएएनडीआरपी) काढला आहे. सर्वसाधारण परिस्थितीत पूररेषा काही सेंटीमीटरने आतापर्यंत वाढते. पण, यंदा मात्र एकाहून अधिक ठिकाणी ही पूररेषा ५०० सेंटीमीटरपेक्षा (५ मीटर) जास्त वाढली असल्याचे प्राथमिक निरीक्षण या संस्थेने नोंदविले आहे.

मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली शहरांसह जिल्ह्यातील बहुतांश भाग गेल्या काही दिवसांपासून अक्षरशः पाण्याखाली आहे. कृष्णा नदी खोऱ्यात पडलेला पाऊस, त्यामुळे धरणातील पाण्याची वेगाने वाढलेली पातळी, घरणांमधून एकाच वेळी नद्यांच्या पात्रात सोडण्यात आलेले पाणी आणि त्यातून आलेला पूर, याचे विश्‍लेषण हिमांशू ठक्कर आणि परिणीता दांडेकर यांनी अभ्यासात केले आहे. 

कृष्णा खोऱ्यातील वरच्या भागात म्हणजे कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये गेल्या महिन्यात सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस पडला. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) मुख्य नद्यांसह उपनद्यांनी बहुतांश सर्व ठिकाणी एकाच वेळी फक्त धोकादायकच नाही, तर उच्चतम पूरपातळीदेखील ओलांडली. कृष्णा, कोयना, पंचगंगा नद्यांनी काही ठिकाणी उच्चतम पूररेषा काही सेंटीमीटरने नाही, तर तब्बल काही ५०० सेंटीमीटने वाढली. त्यामुळे कृष्णा नदी खोऱ्यात ऑगस्ट २००५ पेक्षाही जास्त भयंकर पूर या वर्षी आला आहे, असेही त्यात स्पष्ट केले आहे. ऑगस्टमध्ये धरणाची पातळी वेगाने वाढत असताना आणि पुढील काही दिवसांमध्ये दमदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला असूनही या परिसरातील कोयना, राधानगरी आणि वारणा ही धरणे ५ ऑगस्टपर्यंत १०० टक्के भरली होती. पाऊस पडत असताना ५ ऑगस्टलाच शंभर टक्के धरण का भरू दिले, २५ जुलैपासून धरणातून टप्प्याटप्प्याने पाणी का सोडण्यात आले नाही, असे प्रश्‍न यात उपस्थित केले आहेत.

तीन जिल्ह्यांमध्ये १ ते ८ ऑगस्टदरम्यान पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
  कोल्हापूर ः २०६८.५ (सरासरीपेक्षा ७० टक्के जास्त)   सांगली ः ४८०.७ 
(सरासरीपेक्षा ६० टक्के जास्त) 
  सातारा ः १०२८.१ 
(सरासरीपेक्षा ७८ टक्के जास्त).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The floodline has increased by more than 5 meters