पंढरपूरमध्ये पुन्हा पूरस्थिती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पंढरपुरात चंद्रभागा नदी शुक्रवारी सकाळी दुथडी भरून वाहू लागली आहे.

पंढरपूर  - पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पंढरपुरात चंद्रभागा नदी शुक्रवारी सकाळी दुथडी भरून वाहू लागली आहे. येथील नदीपात्रात ४६ हजार ७०० क्‍युसेक पाणी आल्याने पंढरपूर-सोलापूर मार्गावरील जुना दगडी पूल आज सकाळी पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे उजनीत येणाऱ्या पाण्यात वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातून भीमा नदीत पाणी सोडले जात आहे. गुरुवारी (ता. ५) सकाळी उजनी धरणातून २६ हजार ३०० क्‍युसेक एवढा पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. त्यानंतर रात्री पुन्हा ३१ हजार ६०० क्‍युसेक पाणी सोडण्यात आले. आज दुपारी चारच्या सुमारास ४६ हजार ७०० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आहे. त्यातच वीर धरणातूनही नीरा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. 

दक्षतेचा इशारा 
जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील लोकांना दक्षतेचा इशारा दिला आहे. पंढरपूर शहरातील नदीकाठावरील झोपड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांनाही नगरपालिका आणि महसूल प्रशासनाने सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Floods again in Pandharpur