राज्यातील वृक्षाच्छादनात वाढ

राजेश रामपूरकर
Tuesday, 23 July 2019

राज्यातील सर्वच जिल्ह्यांत जंगल संरक्षणावर भर दिला जात आहे. संयुक्त वनव्यवस्थापन, डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन वनविकास योजनेच्या माध्यमातून गावातील जन-जल-जमीन या संसाधनांचा शाश्‍वत विकास साधून उत्पन्न उत्पादकता, पर्यायी रोजगार संधी वाढविणे याबरोबरच संरक्षण क्षेत्रावरील मानवी दबाव कमी केला आहे. 
- शैलेंद्र टेभूर्णीकर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण)

नागपूर - शेती, सिंचन, रस्ते, पायाभूत सुविधांकरिता वनजमिनीचा वापर वाढल्यामुळे वनाच्छादनामध्ये राज्यात १७ चौरस किलोमीटरची घट झालेली असताना वृक्षाच्छादनात २७३ चौरस किलोमीटरची वाढ झाली आहे.

वृक्षाच्छादनाचा विचार करता महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. कांदळवन क्षेत्रात ८२ चौरस किलोमीटर, तर जलव्याप्त क्षेत्रात ४३२ चौरस किलोमीटरची वाढ झालेली आहे. 

२०१५ च्या अहवालानुसार महाराष्ट्रात ५०,६९९ चौरस किलोमीटर वनाच्छादन असल्याचे नमूद केले आहे. मात्र, २०१७ च्या अहवालात तब्बल १७ चौ.कि.मी. एकूण वनाच्छादन गमावले आहे. पायाभूत सुविधा, शेती, रस्ते, रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण, सिंचनासह इतरही कामांसाठी जमिनीचा वापर वाढतो आहे. विकासावर निर्बंध आणणे अशक्‍य असल्याने वनक्षेत्र वाढवणे कठीण होत आहे.

त्यामुळेच सरकारने २०१२ मध्ये १०० कोटी वृक्षलागवड कार्यक्रम राबविण्याचा संकल्प केला होता. त्यानंतर २०१६ मध्ये राज्य सरकारने ५० कोटी वृक्षलागवड कार्यक्रम हाती घेतला. त्यामुळेच खासगी क्षेत्रामध्ये वृक्षाच्छादन तीन टक्‍क्‍यांनी वाढले आहे. महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ४३.४९ टक्के वनक्षेत्र हे (२०१५ च्या अहवालानुसार) ३५ जिल्ह्यांपैकी सात डोंगराळ जिल्हे व १२ आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये एकवटले आहे. अनेक वनाधिकारी केवळ वनाच्छादन व वृक्षाच्छादनात वाढ हा निकष न ठेवता जंगलात नैसर्गिक पुनरुत्पादन क्षमता आहे का, नैसर्गिक झाडोरा किती प्रमाणात येत आहे, यालाच महत्त्व देत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forest Tree