#PowerDrama सरकार स्थापनेस दिरंगाईमुळे महाराष्ट्र संतापला

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 November 2019

सर्वकाही  आलबेल नाही
भाजपने सरकार स्थापनेचा दावा अजूनही केलेला नाही. शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद व काही महत्त्वाची खाती हवी आहेत. देवेंद्र फडणवीस यांना मात्र हे मान्य नाही. शिवसेना त्यामुळेच संतापली आहे

मुंबई - विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळूनही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत सत्तेचा वाटा अधिक मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू राहिली. परिणामी निवडणुकीचा निकाल लागून आज आठवडा उलटला, तरीही महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. एकीकडे अवकाळी पावसाने उद्‌ध्वस्त झालेला शेतकरी सावरण्याचे आव्हान उभे असताना, बहुमत मिळालेली युती सत्तेच्या वाट्यासाठी भांडत असल्याचे चित्र महाराष्ट्रात उभे राहिले आहे. हा पोरखेळ थांबवावा, अशी भावना महाराष्ट्रातून व्यक्त होत आहे. या भावनेचे प्रतिबिंब सोशल मीडियातही उमटले आहे. 

विधानसभेची मुदत नऊ नोव्हेंबरला संपते आहे. त्या आधी सरकार स्थापन न झाल्यास संविधानिक पेचप्रसंग उभा राहू शकतो. प्रशासनाचा गाडा २१ सप्टेंबरपासून लागू झालेल्या आचारसंहितेमुळे थांबला होता. आचारसंहिता ३० ऑक्‍टोबरला संपुष्टात आली आहे. मात्र, नवे सरकार अस्तित्वात आले नसल्याने राज्यातील प्रश्नांवर निर्णय घेणार कोण आणि ते अमलात आणणार कोण याबद्दल प्रशासकीय संभ्रम आहे.

निवडणुकीत युतीसोबत एकहाती लढत देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिवसभरात उत्तर महाराष्ट्रात शेतावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. ‘शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी सरकारने हातभार लावला पाहिजे. सरकारने तशी भूमिका घेतली नाही तर आम्ही याविरोधात ठोस भूमिका घेऊ,’ असा स्पष्ट इशारा पवार यांनी नाशिक जिल्ह्यातील गोबापूर (ता. कळवण) येथे दिला. शेतीच्या नुकसानीमुळे उद्‌ध्वस्त झालेल्या बागलाण येथील शेतकऱ्यांना धीर देताना पवार यांनी, ‘काही झाले तरी मैदान सोडायचे नाही,’ असे आवाहन केले. 

निवडणुकीत ५४ जागा मिळविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्ष म्हणून काम करणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे. आज काँग्रेसनेही आपली भूमिका स्पष्ट करताना, ‘शिवसेनेला पाठिंबा न देण्याबाबत आपण ठाम असून, जनतेने विरोधात बसण्यासाठी दिलेला कौल शिरोधार्य मानून प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काम करणार आहे,’ असे जाहीर केले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीतील दोन्ही पक्षांनी भूमिका स्पष्ट केली असतानाही, ‘महाराष्ट्राला शिवसेनेचाच मुख्यमंत्री पाहिजे,’ असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सकाळी जाहीर केले. त्यापाठोपाठ भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी, सात नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, असा इशारा दिला. भाजपला १०५ आणि शिवसेनेला ५६ अशा युतीला मिळून १६१ जागा २४ ऑक्‍टोबरलाच मिळाल्या आहेत. मात्र, त्यानंतरचा आठवडा युतीतील दोन्ही पक्षांनी असा परस्परांवर कुरघोडी करण्यात घालविला. आजचा दिवसही त्याला अपवाद नव्हता. 

शपथविधीची तयारी सुरू
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा मंगळवारी (ता. ५) शपथविधी होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी वानखेडे स्टेडियमवर सोहळ्याची तयारी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, आमदार प्रसाद लाड व कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्याकडे या सोहळ्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे समजते. मंत्रालयातील राजशिष्टाचार विभागालादेखील तयार राहण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपाल भाजपला सत्तास्थापनेची सर्वप्रथम संधी देतील, हे निर्विवाद असल्याने भाजपने फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी करण्याची तयारी सुरू केली. भाजपचे किमान नऊ मंत्री शपथ घेतील, असा दावा करण्यात येत असून, यामध्ये पंकजा मुंडे यांचाही समावेश होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, नवीन विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर राज्यपाल भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी जास्तीत जास्त आठ ते दहा दिवसांची मुदत देतील. या कालावधीत शिवसेनेची मनधरणी करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न होतील, असे सूत्रांचे मत आहे. 

सर्वकाही  आलबेल नाही
भाजपने सरकार स्थापनेचा दावा अजूनही केलेला नाही. शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद व काही महत्त्वाची खाती हवी आहेत. देवेंद्र फडणवीस यांना मात्र हे मान्य नाही. शिवसेना त्यामुळेच संतापली आहे. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच, याचा पुनरुच्चार शिवसेना नेते संजय राऊत करत असल्याने युतीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

शिवसेनेने ठरविले तर ते सत्ता स्थापन करू शकतात, विधानसभेचा अध्यक्ष भाजपचा होऊ नये म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या वाघाला हत्तीचे बळ मिळाले असून ते दिसू द्या.
- नवाब मलिक, प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस

महाराष्ट्राचा होणारा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, राज्यातील जनता देखील शिवसेनेचाच मुख्यमंत्री पाहू इच्छिते. समसमान सत्ता वाटपावर आम्ही ठाम आहोत, समोरचा पक्ष त्याचे पालन करणार नसेल तर आमच्यासाठी अन्य पर्याय खुले आहेत.
- संजय राऊत, नेते शिवसेना

तिढा सुटेना
    शिवसेनेला पाठिंब्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद
    शरद पवार सोनिया गांधींना दिल्लीत भेटणार
    फडणवीसच राहणार 
काळजीवाहू मुख्यमंत्री
    मित्रपक्षाचे नेते उद्या (ता.२) राज्यपालांच्या भेटीला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The formation of the Government delay of Maharashtra