"डोक्यातून रक्त वाहत होतं, गुंडांना वाटलं मी मेलो..." राजू शेट्टींवरील हल्ल्याची 'ती' कहाणी | Raju Shetti Attack | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Shetti Attack

"डोक्यातून रक्त वाहत होतं, गुंडांना वाटलं मी मेलो..." राजू शेट्टींवरील हल्ल्याची 'ती' कहाणी | Raju Shetti Attack

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी हे शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी लढणारे नेते म्हणून ओळखले जातात. तर उस उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केलाय. पण ते आमदार होण्याअगोदर २००२ च्या नोव्हेंबरमध्ये त्यांच्यावर कारखानदारांनी जीवघेणा हल्ला केला होत. या हल्ल्याचा किस्सा त्यांनी सकाळने घेतलेल्या मुलाखतीत सांगितला आहे.

गोष्ट आहे २००२ सालची. नोव्हेंबरमध्ये गळीत हंगाम सुरू होण्यापुर्वी शेतकऱ्यांच्या उसाला चांगला हमीभाव मिळावा यासाठी राजू शेट्टी यांनी आंदोलन सुरू केलं होतं. त्यांच्या पाठीमागे अनेक उस उत्पादक शेतकऱ्यांचा पाठिंबा होता. कारखानदारांनी गळीत हंगाम सुरू केला होता पण चांगला हमीभाव मिळावा म्हणून राजू शेट्टी आणि शेतकऱ्यांनी उसाच्या गाड्या अडवून धरल्या होत्या. त्यामुळे हे आंदोलन चांगलंच पेटलं होतं. शेतकऱ्यांचा पाठिंबा असल्यामुळे पोलिसही काही करू शकत नव्हते.

हे आंदोलन सुरू असताना सरकारने साखर कारखानदारांना सरकारने कारखाने कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे कारखानदारांनी हे आंदोलन मोडून काढण्यासाठी एक षडयंत्र रचलं. काही शेतकरी उस घेऊन कारखान्यावर जात असताना आंदोलकांनी या गाड्या अडवल्या आणि आंदोलन पुन्हा चिखळलं. पण एखादं आंदोलन मोडून काढायचं असेल तर त्याच्या नेतृत्वाचा काटा काढावा लागतो. या दृष्टीकोनातून राजू शेट्टी यांना आंदोलनातून खोटा निरोप देऊन बाहेर बोलावलं गेलं.

"मला माझ्यावर होणाऱ्या हल्ल्याबाबत कसलीही कल्पना नव्हती. पण मला आंदोलनातून बाहेर बोलावल्यानंतर कारखानदारांच्या गुंडांनी भरदिवसा माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मी गंभीर जखमी झालो होतो. माझं डोकं फुटलं होतं. मी रक्ताच्या थारोळ्यात पडलो होतो. मी बेशुद्ध पडल्यामुळे त्यांना वाटलं की माझा मृत्यूच झाला. मला मारण्याच्या हिशोबाने गुंड मला नदीच्या पुलावरून नदीत फेकून देणार होते. पण तेवढ्या काही कार्यकर्त्यांच्या गाड्या आल्या आणि शेतकऱ्यांच्या नजरेस ही घटना पडली. त्यामुळे मला तसंच ठेवून गुंड पळून गेले."

"रस्त्यावरून जाणाऱ्या काही शेतकऱ्यांनी मला ओळखलं आणि तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मी अनेक दिवस उपचार घेतल्यानंतर बरा झालो पण हॉस्पिटलमध्ये असतानाही मी आंदोलन चालूच ठेवलं आणि ते यशस्वी करून दाखवलं." ही घटना माजी खासदार राजू शेट्टी यांनी सकाळने आयोजित केलेल्या मुलाखतीत सांगितली.