Car Purchase- नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कार खरेदीचा निर्णय}

नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

रचना रानडे
नव्या वर्षात तुमच्या काही नव्या योजना असतील, काही मोठे खर्च करायचे ठरवले असतील आणि तुम्ही नवी गाडी-कार (चारचाकी) घ्यायची ठरवली असेल, तर मग हा लेख नक्की वाचा. कोणत्याही खर्चाचा ज्यावेळी आपण विचार करतो, त्यावेळी नियोजन केलं पाहिजे.

सर्वांत आधी गाडी घेणं आपल्याला शक्य आहे की नाही, इथपासून विचार आणि नियोजन केले पाहिजे. म्हणूनच या लेखामध्ये आपण गाडी खरेदीसंबंधी सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत आणि त्यानंतरच गाडी खरेदीचा निर्णय तुम्ही घ्यावा, असं मला वाटतं. (What points important to consider before Car Purchase)

गाडी किंवा कार खरेदी करण्यापूर्वी आपण कोणत्या मुद्‍यांचा विचार करणार आहोत, ते आधी जाणून घेऊ.
१. परिमाणवाचक घटक
२. ठोकताळा
३. गाडी घेण्याची योग्य वेळ
४. गाडीसाठी पैसे कसे उभे करावेत?
५. गुणात्मक घटक
यामध्ये काही क्वांटिटेटिव्ह म्हणजेच परिमाणवाचक घटक असतात, त्याचा गाडी खरेदीशी थेट संबंध काय आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. सर्वांत मूलभूत प्रश्न म्हणजे, आपण गाडी किती किंमतीची घ्यावी? म्हणजेच आपण सहा लाखांची गाडी घ्यावी, की आठ लाखांची, की त्याहीपेक्षा महागडी दहा-बारा लाखांची गाडी घ्यावी, यासाठी काही बजेट ठेवलं पाहिजे का? तसंच यासाठी काही थम्बरूल म्हणजेच ठोकताळा आहे का? याचीही माहिती घेणार आहोत.

गाडी घेण्याची योग्य वेळ कोणती?
आता आयुष्यात गाडी घेण्याची योग्य वेळ नेमकी कोणती? एखादा म्हणेल, मी आज २१ वर्षांचा आहे, आत्ताच गाडी घेण्यात मजा आहे. एखादा म्हणेल, मी आता २५ वर्षांचा झालोय, त्यामुळे मी गाडी घेणं योग्य आहे. अशी गाडी घेण्यासाठी विशिष्ट आणि योग्य वेळ असली पाहिजे का? तसेच गाडी घेण्यासाठी पैसे कसे उभे करावेत? म्हणजेच स्वतःच्या साठवलेल्या पैशातून गाडी घ्यावी, की या मोठ्या खरेदीसाठी कर्ज घ्यावं? याचीही माहिती आपण घेणार आहोत. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गाडी खरेदी करण्यामागे असलेला गुणात्मक घटक याचाही विचार आपण करणार आहोत.

या चारही महत्त्वाच्या मुद्यांची उत्तरं मिळाल्यानंतरच तुम्ही गाडी खरेदीचा निर्णय घ्यावा, असं मला वाटतं. प्रत्येकाच्या मनात गाडी खरेदी करण्याचं एक स्वप्न असतं. ‘आपली गाडी’ हा एक जिव्हाळ्याचा विषय असतो. इतकंच नाही, तर ती गाडी आपल्या घरातला सदस्य बनते. इतकं गाडीशी घट्ट नातं विणलं जातं. आपल्या स्वप्नातली गाडी आपल्याला परवडणार आहे का? याचा विचार सर्वांत आधी केला पाहिजे. म्हणूनच प्रथम काही मूलभूत प्रश्नांची उत्तर जाणून घेऊ.

मालमत्तेचं मूल्य
फायनान्सच्या भाषेत गाडी म्हणजे मालमत्ता! ज्याला इंग्रजीत ॲसेट म्हणतात. ॲसेट दोन प्रकारच्या असतात. एक ॲसेट असते ॲप्रिसिएटिंग ॲसेट आणि दुसरी असते डेप्रिसिएटिंग ॲसेट. ॲप्रिसिएटिंग ॲसेट म्हणजे ज्या मालमत्तेचं मूल्य-किंमत वाढत जाते. याचं एक उदाहरण म्हणजे, तुम्ही जमीन खरेदीमध्ये पैसे गुंतवले, तर भविष्यात त्या जमिनीचे मूल्य वाढणार आहे, त्यामुळे ही झाली ॲप्रिसिएटिंग ॲसेट; परंतु गाडी ही डेप्रिसिएटिंग ॲसेट आहे. कारण एकदा का तुम्ही गाडी खरेदी केली आणि ती शोरूममधून बाहेर पडली, की तिची किंमत तुम्ही घेतल्यापेक्षा कमी होणार आहे. वाढणार नाही. म्हणूनच गाडी ही डेप्रिसिएटिंग ॲसेट असते. याचं उदाहरण म्हणजे, तुम्ही आज सहा लाखांची गाडी घेतली आणि तीन वर्षांनी ती विकायची ठरवली, तर तिची किंमत वाढणार नाही, तर सहा लाखांपेक्षा नक्कीच कमी येणार आहे. म्हणूनच मूल्य कमी होणाऱ्या मालमत्तेला डेप्रिसिएटिंग ॲसेट म्हणतात.

गाडी खरेदीचे २०-४-१० गणित
आता आपण गाडी खरेदीचा गणिती भाग विचारात घेणार आहोत. कारण गाडी खरेदी करताना बजेटचा विचारही करावा लागेल. तर गाडी किती किमतीची घ्यावी? या प्रश्नाचं उत्तर शोधताना एक अतिशय महत्त्वाचा ठोकताळा आपण लक्षात घ्यायचा आहे. या ठोकताळ्यामध्ये २०-४-१० यांचं गणित आहे. आता या तीन आकड्यांचं महत्त्व तुम्हाला विस्तारानं समजावून सांगते.
या ठोकताळ्यातला पहिला आकडा म्हणजे २०! तुम्ही कोणतीही गाडी घ्या, कितीही लाखांची ती असू दे, पण त्या गाडीची ‘ऑन रोड’ किंमत म्हणजेच सर्व प्रकारचे कर, नोंदणी शुल्क, गाडीची सजावट आणि सुरक्षेसाठी बसवलेली उपकरणं, साधनं, असा सगळा खर्च मिळून जी किंमत येते, त्यापैकी २० टक्के रक्कम डाउन पेमेंट म्हणून तुम्हाला द्यावी लागते.

सर्वांत प्रथम आपण विचार करायचा आहे, तो म्हणजे हे डाउन पेमेंट आपण करू शकतो का? दुसरा आकडा आहे ४! गाडी खरेदी करताना कर्ज घ्यायचं ठरवलं, तर ते कर्ज चार वर्षांत पूर्णपणे फेडण्याची ताकद असली पाहिजे. इतके आपण आर्थिक सक्षम आहोत का, हे तपासून पाहिले पाहिजे. आणि शेवटचा आकडा आहे १०! तुमच्या मासिक उत्पन्नाच्या १० टक्के गाडीचा ‘ईएमआय’ असला पाहिजे. उत्पन्नाच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त गाडीचा ‘ईएमआय’ असून चालणार नाही. याचं सोपं उदाहरण घेऊ. तुमचं एका महिन्याचं उत्पन्न ५०,००० असेल, तर तुमचा गाडीचा मासिक हप्ता जास्तीत जास्त ५,००० असला पाहिजे. ही सगळी गणितं सुटत असतील, तरच तुम्ही गाडी खरेदीचं बजेट तयार करू शकणार आहात. या ठोकताळ्याच्या गणितात तुम्ही बसत नसाल, तर तुम्ही थोडी जास्त महाग गाडी घेत आहात, थोडी मोठी उडी मारत आहात. मात्र, असं अजिबात करू नका.

मी हे आकडे अनेक वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये घालून पाहिले आणि लक्षात आले, की २० आणि ४ मध्ये कोणतीच समस्या येत नाही. परंतु, १० मध्ये मात्र गडबड होते. त्यावेळी मी विचार केला, की हा १० चा आकडा वाढवला तर काय होईल? हा आकडा जास्तीत जास्त २० पर्यंत नक्कीच वाढवता येऊ शकतो. मात्र, त्यासाठी आर्थिक शिस्त लावून घेतली पाहिजे. कारण तुम्ही गाडीसाठी ‘ईएमआय’ भरणार आहात. तुमच्यासाठी गाडी काय आहे? गाडी नित्य गरजेचा विषय आहे की, हौसमौजेसाठी गाडी घेतली जात आहे? बऱ्याच जणांसाठी गाडी खरेदी हा विषय हौसमौज किंवा प्रतिष्ठा यासाठी असू शकतो. हौसेसाठी गाडी घ्यायची असेल, तर पैसे वाचवून ती कशी घ्यायची, हे आपण पाहिले पाहिजे.

हे देखिल वाचा-

गाडी खरेदीचं बजेट, किती किंमतीची गाडी घ्यावी, हे तीन वेगवेगळ्या उदाहरणांवरून जाणून घेऊ.

तीन उदाहरणे
आता आपण ए, बी, सी या तीन व्यक्तींची उदाहरणे पाहू. ‘ए’ हा मध्यमवर्गातला मनुष्य आहे. ‘बी’ हा थोडासा उच्च मध्यमवर्गातला आहे आणि ‘सी’ श्रीमंत वर्गातला आहे. तिघांचंही वार्षिक उत्पन्न अनुक्रमे ७ लाख, १५ लाख आणि २४ लाख आहे. त्या वार्षिक उत्पन्नाला १२ ने भागून त्यांचं मासिक उत्पन्न काढलं आहे. त्यानंतर त्यांनी निवडलेल्या गाडीची किंमत आहे. हे पाहून अनेकांना प्रश्न पडेल, की सुरवातच ७ लाख उत्पन्नापासून होत आहे, माझं वार्षिक उत्पन्न ३ लाख आहे आणि घरामध्ये मी एकटाच कमावता आहे, तर मग मला कधी गाडी घेता येईल? अशावेळी तुम्ही गाडी घेऊ नये, असं माझं प्रांजळ मत आहे.

ज्यावेळी अगदी गरज असेल, म्हणजे घरामध्ये वैद्यकीय गरज असेल, गावी जायचं असेल, त्यावेळी तुम्ही भाड्याने गाडी घ्या. परंतु, यामुळे नाराज होऊ नका, आयुष्यात तुम्हाला कधीच गाडी घेता येणार नाही, असा याचा अर्थ अजिबात नाही. पुढे भविष्यात कधीतरी उत्पन्न तसंच बचत वाढेल आणि तुम्ही गाडीचा आनंद घेऊ शकता.

एखादी व्यक्ती जिचा पगार ७ लाखांच्या आत आहे; पण त्या व्यक्तीकडे गुंतवणुकीची चांगली शिस्त आहे, तर अशा व्यक्तीकडे काही पर्याय आहेत का? तर यावरही पर्याय आहे. आर्थिक शिस्त पाळून दरमहा ‘एसआयपी’मध्ये गुंतवणूक केली, तर साधारणपणे तीन वर्षांत एक चांगली मोठी रक्कम तुमच्या हातात येईल आणि त्यातून तुम्ही तुमची स्वप्न साकारु शकता. गुंतवणुकीतील जोखीम कमी करण्यासाठी ‘निफ्टी’च्या टॉप पन्नास कंपन्यांमध्ये थोडी-थोडी गुंतवणूक करण्याचा पर्याय आहे. तसंच इंडेक्स फंडमध्ये गुंतवणुकीचा मार्गही चांगला आहे.

‘ईएमआय’चे गणित
आता पुन्हा आपण आपल्या उदाहरणाकडे वळू. गाडी खरेदी करू इच्छिणाऱ्यांना २०-४-१० चा ठोकताळा मांडताना गाडीच्या किमतीच्या २० टक्के डाउन पेमेंट करावं लागणार आहे. त्यानुसार ए, बी, आणि सी यांना अनुक्रमे १,२०,०००/२,४०,०००/४,००,००० रूपये डाउन पेमेंट करावं लागणार आहे. म्हणजे या तिघांना उर्वरित रकमेचं कर्ज घ्यावं लागेल. यानुसार तिघांना अनुक्रमे ४,८०,००० / ९,६०,०००/१६,००,००० इतकं कर्ज घ्यावं लागेल. याला इंग्रजीत ‘बॅलन्सिंग फीगर’ असं म्हणतात. आता या तिघांना ‘ईएमआय’ किती पडेल हे पाहू. साधारणपणे, तिघांना अनुक्रमे ११,२०५/२३,२११/३८,६८६ रूपये ‘ईएमआय’ असणार आहे. याआधीच आपण वाचलं, की ‘ईएमआय’ हा आपल्या मासिक उत्पन्नाच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त असू नये; परंतु हा आकडा बचतीचे पर्याय वापरून २० टक्क्यांपर्यंत वाढवता येऊ शकतो. इथं दिलेल्या उदाहरणांपैकी ‘ए’च्या ‘ईएमआय’च्या रकमेला तुम्ही त्याच्या मासिक उत्पन्नाने भागले, तर ‘ईएमआय’ची टक्केवारी निघेल. त्यानुसार ‘ए’च्या उत्पन्नाच्या बरोबर २० टक्के ‘ईएमआय’ जातो, तर ‘बी’ आणि ‘सी’च्या उत्पन्नाच्या १९ टक्के ‘ईएमआय’ आहे.

अधिक किमतीची गाडी घेण्याचा निर्णय
हे सगळं गणित बसणार असेल, तर गाडी घेण्यात काही अडचण नाही. परंतु ‘ए’ने ६ लाखांऐवजी १२ लाखांची गाडी घेण्याचा निर्णय घेतला तर काय होईल? ‘ए’ने १२ लाखांची गाडी घेण्याचा विचार केला, तर त्याचा ‘ईएमआय’ २३,२११ रूपये येईल आणि त्याची ‘ईएमआय’ टक्केवारी ३९.७९ टक्के होईल. आपल्या आर्थिक ठोकताळ्यात हे गणित बसणार नाही. यावरून तुमच्या लक्षात आले असेलच, की गणित कसं मांडायचं आणि आपल्याला किती किंमतीची गाडी परवडणार आहे, हे कसं जाणून घ्यायचं. एकूण काय, तर २०-४-२० या नियमामध्ये बसणारी ६ लाखांची गाडी घेण्याचा योग्य निर्णय तुम्ही घेतला, असं आपण मानू. या गाडीचं डाउन पेमेंट असणार आहे १,२०,००० रुपये. ते तुम्हाला भरायचे आहेत. आता ही रक्कम आणायची कुठून? एफडी मोडायची की सोनं? हा पर्याय अगदीच चुकीचा आहे. त्याच्यासाठीही आपण नक्कीच चांगलं नियोजन करू शकतो.

हे देखिल वाचा-

५०-३०-२० हा नियम
आधी ५०-३०-२० हा नियम काय आहे, ते सांगते. यामध्ये ५० टक्के गरज, ३० टक्के हौसमौज आणि २० टक्के बचत असे वर्गीकरण करायला पाहिजे. आता ६ लाखांची गाडी घेण्याऱ्या माणसानं ५०-३०-२० या नियमानुसार बचत करून ३० टक्के हौसमौजेसाठी बाजूला काढले आहेत. मात्र, आपण ते सर्व ३० टक्के गाडीसाठी वापरणार नाही, तर त्यापैकी २० टक्केच घेणार आहोत. म्हणजेच (५८,३३३*२० टक्के) राउंडअप रक्कम म्हणून १२,००० रूपये बाजूला काढून ठेऊ. अशी किती महिने बचत केली, तर आपल्याकडे डाउन पेमेंटचे १,२०,००० जमा होणार? अर्थात, उत्तर असणार १० महिने!

एकूण काय तर गाडी घेण्यासाठीची रक्कम आपल्याकडे जमा आहे. सगळे ठोकताळे ओके आहेत; परंतु इतकाच विचार करून भागणार नाही. आणखीही काही मुद्दे आहेत, त्याकडे आपण पाहिले पाहिजे.
१. रिकरिंग कॉस्ट म्हणजेच वारंवार करावा लागणारा खर्चः गाडीला पेट्रोल, डिझेल, पार्किंग शुल्क, टोल आदी खर्च वारंवार येणार आहेत. गाडीच्या दुरूस्तीचाही खर्च येऊ शकतो. हे सगळे रिकरिंग खर्च असतात. त्यामुळे गाडी खरेदी केली, की खर्च संपत नाही.
२. नियंत्रणाबाहेरचे खर्चः हे खर्च टाळता येत नाहीत. दुर्दैवानं अपघात झाला, तर तो टाळता येत नाही. चुकून सिग्नल तोडला गेला, तर दंड भरावा लागतो. अशा खर्चांचाही विचार केला पाहिजे.
३. गुंतवणूक संधीची किंमतः हा खर्च वास्तविक आपण देत नसतो, तरीही ही किंमत आपल्याला मोजावी लागते. याचा अर्थ असा, की सहा लाखांची गाडी घेण्याऐवजी सहा लाखांची एफडी केली असती, शेअर खरेदी केले असते किंवा हेच पैसे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवले असते, तर त्यातून परतावा मिळाला असता. माझ्या मालमत्तेमध्ये वाढ झाली असती, परंतु गाडी घेतल्यामुळे ते मूल्य कमी होत जाणार आहे, ही सुद्धा एक किंमतच आपल्याला मोजावी लागली आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
या सगळ्या गोष्टींचा विचार न करता आपण महागडी गाडी घेतली, तर तिचा विमा जास्त असतो, तिच्या सर्व्हिंसिंगचा खर्चही जास्त असतो. मग नंतर गाडी बाळगणे अवघड जाते. म्हणून गाडी घ्यायच्या आधीच ही सर्व गणितं मांडणं खूप महत्त्वाचं आहे.

गुणात्मक घटकांचा विचार
गाडी घेताना पहिला प्रश्न होता, ही गाडी मला परवडणार आहे की नाही? या प्रश्नाला एक होय किंवा दुसरे नाही, यापैकी उत्तर असू शकणार आहे. २०-४-२० आणि ५०-३०-२० या सूत्रांमधून आपल्या लक्षात आले, की गाडी आपल्याला परवडणार नाही, तर आता गाडी घ्यायची नाही. विषय संपला! परंतु उत्तर ‘हो’ आलं, तर ताबडतोब जाऊन गाडी घेण्याची घाई अजिबात करू नका. थोडं थांबा! कारण आपण गुणात्मक घटकांचा विचार करणंही गरजेचं आहे. हे घटक कोणते, ते पाहू.

१. कुटुंबाची गरजः गाडी परवडतेय, परंतु आपल्याला गाडीची गरज आहे का? हे पाहू. उदाहरणार्थ, आपल्या कुटुंबात दोघेजण म्हणजे पती-पत्नी आहेत. काय गरज आहे गाडीची? कुटुंबात ऐंशी-शीनव्वदीच्या घरातले आजी-आजोबा आहेत. थोडक्यात, ज्यांना वैद्यकीय आणीबाणीचा प्रसंग कधीही उद्भवू शकतो, त्यांच्याकडे स्वतःची गाडी असलेली चांगली. गरज आणि परवडणे या दोन्ही निकषांमध्ये आपण येत असू, तर जरूर गाडी घ्यावी.
२. सुरक्षितताः दुसरा गुणात्मक घटक आहे सुरक्षितता. कोरोनाच्या काळानंतर हा मुद्दा आला. एकदा कोरोना होऊन गेल्यानंतर पुन्हा संसर्ग होऊ नये म्हणून मी स्वतःची गाडी वापरणं चांगलं, हा विचार केला जाऊ शकतो.
३. गाडीची क्रेझः हौसेला मोल नाहीच! म्हणजे गाडी घेणं मला गणिताप्रमाणे परवडत आहे आणि मला गाड्यांची अतिशय आवडदेखील आहे. मग मी गाडी का घेऊ नये? आवड, हौस परवडत असेल तर जरूर पूर्ण करावी.
४. नवा व्यवसायः तुमचा नवा व्यवसाय असेल आणि तुम्हाला व्यवसायानिमित्त वेगवेगळ्या लोकांना किंवा क्लाएंटना भेटावे लागत असेल, तर चांगली गाडी, महागडा मोबाईल यावरुन क्लाएंट तुमची किंमत करू शकतात. दुर्दैवानं, हे चुकीचे असले तरी सत्य आहे. तुम्ही मार्केटिंग क्षेत्रात असाल, तर या गोष्टी पाहिल्या जातात आणि त्यातून आपला बिझनेस वाढून खूप पैसा मिळू शकतो, असा विचार करूनही गाडी घेतली जाते.
वर नमूद केलेले चारही घटकांचे किंवा बहुतांश घटकांचे उत्तर ‘हो’ असेल, तर तुम्ही गाडी जरूर घ्या. मात्र त्याआधी गणित जरूर मांडा आणि त्या गणिताचे उत्तर ‘नाही’ असं आलं तर? म्हणजेच तुम्हाला गाडी परवडतेय, मात्र ती घेण्याची गरज नसेल, तर मग कशाला घेताय गाडी? त्याऐवजी तेच पैसे गुंतवा आणि गुंतवलेल्या पैशातून जे व्याज आणि परतावा मिळेल, त्यातून मौज करा.

आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याचा आपण इथे विचार करणार आहोत. ज्यावेळी तुम्ही गाडी घेण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी ती रोख रक्कम देऊन घेणार, की कर्ज काढून घेणार याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. या दोन्हींपैकी तुम्हाला कोणता पर्याय सोयीचा ठरणार आहे, हे पाहू.
गाडी घ्या रोखीने!

तुम्ही नोकरी करत असाल आणि तुम्हाला दरमहा वेतन मिळत असेल, तर अशा वेळी रोख रक्कम भरुन गाडी घ्यावी. आता तुम्ही म्हणाल रोखीनं गाडी घेणं शक्य असते, तर मग काही समस्याच नाही! परंतु नोकरदारांना हे नक्कीच शक्य आहे. ते कसे? तुमचा डाउन पेमेंटचा प्रश्न, तर आपण सोडवला आहेच. आता उर्वरित रकमेसाठी तुम्ही ‘स्मार्ट गोल बेस्ड’ गुंतवणूक नियोजन केले पाहिजे. म्हणजेच ‘ईएमआय’ची रक्कम ‘एसआयपी’मध्ये गुंतवून आपली मालमत्ता वाढवली पाहिजे. यासाठी तुम्ही ‘इंडेक्स फंडा’मध्ये पैसे गुंतवू शकता आणि एकदा का इंडेक्स फंडाची व्हॅल्यू आपल्या उदाहरणानुसार ६ लाखांच्या ८० टक्के म्हणजे ४,८०,०००० जमेल, त्यावेळी तो मोडून तुम्ही गाडी रोखीने, अजिबात कर्ज न काढता घेऊ शकता.
कर्जाचा पर्याय निवडताना...

कर्जाचा विषय हा व्यावसायिकांसाठी येऊ शकतो. कर्जानं गाडी घेणं कदाचित व्यावसायिकांना फायद्याचं ठरू शकतं. इथं एक सोपं उदाहरण घेऊ. तुम्हाला गाडीसाठी ८ टक्के व्याजदरानं कर्ज मिळत असेल आणि तुम्ही स्वतःच्या व्यवसायातून १२ टक्के परतावा मिळवत असाल, तर मग तुम्ही ८ टक्क्यांनी कर्ज घ्या. आपला पैसा व्यवसायात गुंतवा आणि १२ टक्के परतावा घ्या. आणखी एक गोष्ट म्हणजे, गाडीवरचा घसारा (डेप्रिसिएशन) असतो, तो व्यावसायिकांना खर्च म्हणून मिळू शकतो आणि ‘ईएमआय’मधील व्याजाच्या रकमेची करसवलतदेखील मिळू शकते. हे लाभ घेण्यासाठी व्यावसायिकांनी कर्ज काढून गाडी घेणं कधीही चांगलं!

गाडी घेण्याचं योग्य वय कोणतं?
गाडी घेण्याचं योग्य वय कोणतं? अगदी २१ वर्षांच्या युवकाच्या आर्थिक गणिताचा विचार केला आणि तो गुणात्मक दृष्टीने, सर्व गोष्टींमध्ये बसत असेल, त्याला परवडत असेल, त्याला गरज असेल, तर त्याच्यासाठी गाडी घेणं रास्त आहे. समजा ४० वर्षांची एखादी व्यक्ती असेल, तर मात्र या गोष्टी लागू होत नाहीत. त्याच्या वेतनात हे गणित बसत नसेल, तर त्यानं गाडी घेणं योग्य नाही. एकूण काय तर गाडी घेताना फक्त वय हा मुद्दा लक्षात घ्यायचा नाही, तर परिमाणवाचक घटक आणि गुणात्मक घटक हे विचारात घ्यायचे आहेत. नोकरदारांनी शक्यतो पैसे साठवून गाडी घ्यावी, असे माझे मत आहे.

(लेखिका सीए आणि प्रसिद्ध यूट्युबर आहेत.)
(माध्यमांतरः सुवर्णा बेडेकर)