शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक! आमिषाला बळी पडलेल्यांनी ‘या’ क्रमांकावर करावा कॉल; हडप झालेली रक्कम परत मिळेल

सुरवातीला थोड्या रकमेचा परतावा लगेचच दिला जातो, जेणेकरून समोरील व्यक्ती विश्वास ठेवून जास्त पैसे गुंतविण्यास तयार होईल. मात्र, मोठी रक्कम हाती लागल्यानंतर सायबर गुन्हेगार ना मुद्दल ना जादा परतावा देतात अशी वस्तुस्थिती आहे.
solapur
cyber-crimesakal

सोलापूर : शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग खाते उघडून पैसे गुंतविल्यास कमी दिवसांत चांगला परतावा मिळेल, असे आमिष सायबर गुन्हेगारांकडून लोकांना दाखविले जात आहे. सुरवातीला थोड्या रकमेचा परतावा लगेचच दिला जातो, जेणेकरून समोरील व्यक्ती विश्वास ठेवून जास्त पैसे गुंतविण्यास तयार होईल. मात्र, मोठी रक्कम हाती लागल्यानंतर सायबर गुन्हेगार ना मुद्दल ना जादा परतावा देतात अशी वस्तुस्थिती आहे.

सायबर गुन्हेगार काही दिवसांसाठी म्हणजेच लोकांना आमिषाच्या जाळ्यात ओढून पैसा कमाविण्यासाठी ‘व्हीपीएन’ नंबरचा वापर करतात. त्या क्रमांकावरून कोणत्याही अनोळखी व्यक्तींना कॉल करून आमिषाच्या जाळ्यात ओढतात. आजवर सोलापूर शहर जिल्ह्यातील शेकडो व्यक्तींची सायबर गुन्हेगारांनी वेगवेगळ्या माध्यमातून फसवणूक केली आहे. तरीदेखील, अद्याप लोक कमी दिवसात जास्त पैसा कमावण्याच्या आमिषाला बळी पडतच आहेत हे विशेष. सायबर गुन्हेगार नेहमी वेगवेगळे फंडे वापरून लोकांना आमिषाच्या जाळ्यात ओढतात. कमी दिवसात श्रीमंत होण्याच्या लालसेतून अनेकजण त्यांच्या आमिषाला बळी पडतात. त्यामुळे सर्वांनी सायबर गुन्हेगारांपासून सतर्क राहाणे हाच सर्वात मोठा उपाय असल्याचेही सायबर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हे लक्षात ठेवा...

  • ‘सेबी’त नोंद असलेल्या ब्रोकर्सची यादी संकेतस्थळावर असते. त्यांच्याशी संपर्क करून खात्री करावी व त्यांच्यामार्फत गुंतवणूक करावी.

  • अनोळखी लिंक उघडू नका, त्यावर प्रतिसाद देऊ नका, अनोळखी कॉलवरील व्यक्तीच्या आमिषावर भरोसा ठेवून गुंतवणूक करू नका.

  • कमी दिवसात जास्त पैसा मिळत नाही, त्यामुळे समोरच्यांनी दाखविलेल्या आमिषाला वेळेतच ओळखावे.

  • फसलेल्यांनी जवळील पोलिसांत किंवा सायबर पोलिस ठाण्यात तत्काळ तक्रार करावी. जेणेकरून हडपलेली रक्कम होल्ड करून ठेवता येते.

१९३० क्रमांक फसलेल्यांचा आधार

सायबर गुन्हेगारांचा शिकार ठरलेल्या व्यक्तींनी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच १९३० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा. त्यावेळी समोरील व्यक्ती काही प्रश्न विचारेल. त्यांना फसवणूक झाल्यासंदर्भातील माहिती द्यावी. त्यानंतर काही वेळातच ज्या सायबर गुन्हेगाराने आपली फसवणूक केली, त्याने एकापाठोपाठ चार वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर केलेली रक्कम ब्लॉक करता येते. त्यासाठी फसलेल्या व्यक्तीने काही तासातच १९३० या क्रमांकावर तक्रार करणे अपेक्षित आहे.

नागरिकांनी तात्काळ १९३० वर संपर्क करावा

ज्याठिकाणी ‘कमी दिवसात सर्वाधिक नफा’ असे सूत्र असते त्याठिकाणी फसवणूक होते, हे लोकांनी लक्षात घ्यायला हवे. दुसरीकडे फसवणूक झालेल्या व्यक्तीने लगेचच सायबर पोलिस, जवळील पोलिस ठाणे किंवा १९३० या टोल फ्री क्रमांकावर तक्रार केल्यास त्यांचे पैसे परत मिळण्याची आशा राहाते.

- श्रीशैल गजा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (सायबर), सोलापूर शहर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com