भावी जवानांची देशभक्ती "लाल फितीत'  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भावी जवानांची देशभक्ती "लाल फितीत' 

भावी जवानांची देशभक्ती "लाल फितीत' 

मुंबई - भारत-पाक सीमेवर अत्यंत संवेदनशील वातावरण असतानाही निमलष्करी दलात सहभागी होऊन देशसेवा करण्याची धमक दाखवणाऱ्या युवकांच्या अपेक्षांना सरकार कारभाराची "लाल फित' अडथळा ठरली आहे. दीड वर्षापूर्वी केंद्रीय भरती आयोगाने (एसएससी) परीक्षा घेऊनही अद्याप अंतिम निवड यादी जाहीर झाली नसल्याने जवान म्हणून भरती होण्यासाठी इच्छुक असलेल्या महाराष्ट्रातल्या तब्बल 60 हजार युवकांमध्ये अस्वस्थता आहे. केंद्र सरकारने या परीक्षांचा निकाल तातडीने जाहीर करावा, यासाठी राज्यात काही ठिकाणी जिल्हा अधिकारी कार्यालयांसमोर उपोषण करण्याचाही इशारा दिला आहे. 

देशभरात निमलष्करी दलाच्या 62 हजार 390 रिक्‍त पदांसाठी 4 ऑक्‍टोबर 2015 रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्याअगोदर मे-जून 2015 मध्ये देशभरात या युवकांची शारीरिक चाचणी घेतली होती. महाराष्ट्रात एकूण चार हजार पदांचा कोटा ठेवण्यात आला होता. त्यासाठी तब्बल 60 हजार युवकांनी शारीरिक चाचणी उत्तीर्ण करत लेखी परीक्षा दिली होती. त्यानंतर या युवकांची यंदा जून महिन्यात वैद्यकीय तपासणीदेखील करण्यात आली. मात्र, आतापर्यंत अंतिम निवड यादीच जाहीर झाली नसल्याने या युवकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. 

निमलष्करी दलात सहभागी होण्याची इच्छा असलेले युवक वयाच्या पंधराव्या वर्षापासूनच शारीरिक व बौद्धिक तयारी करतात. देशाच्या लष्करात सहभागी होण्याची तयारी व कष्ट घेऊनही सरकारी लाल फितीचा त्यांना फटका बसत असल्याचे आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. निमलष्करी दलात सहभागी होण्यासाठी मराठा, डोग्रा व जाट समाजाला विशेष आरक्षण व सवलत दिली जाते. त्यामुळे महाराष्ट्रातून मराठा समाजाचे हजारो युवक या भरती प्रक्रियेत सहभागी होत असतात. इतर कोणत्याही क्षेत्रात आरक्षण नसल्याने मराठा युवक निमलष्करी दलाची संधी घेतात. मात्र, दीड वर्षापासून या भरती प्रक्रियेचा निकालच अधांतरी असल्याने या युवकांना आश्‍चर्य वाटत आहे. 

"वन रॅंक वन पेन्शन' यासाठी देशभरात जवानांनी तीव्र आंदोलन केले. त्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवरील चकमकीत महाराष्ट्रातील कित्येक जवान हुतात्मा झाले. तरीही देशसेवेची प्रबळ इच्छा असलेल्या युवकांनी सर्व तयारी व सोपस्कार पूर्ण करूनही संधी मिळत नसल्याने त्यांनी उपोषणाला बसण्याची तयारी सुरू केली आहे. 

देशसेवेसाठी महाराष्ट्रातल्या युवकांनी मागील पाच सात वर्षांपासून तयारी केलेली असते. निमलष्करी दलात त्यांना संधी मिळावी, यासाठी अहोरात्र ते शारीरिक कष्ट घेत असतात. मात्र, परीक्षेचा अंतिम निकाल लागत नसल्याने मी स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर 7 डिसेंबरपासून उपोषणास बसणार आहे. 

प्रताप देशमुख, (संचालक), वीर भगतसिंह ऍकॅडमी 

Web Title: Future Soldiers Patriotism Red Ribbons

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..