esakal | गांधीजींचे मारेकरी हेच सत्ताधाऱ्यांचे आदर्श  - जावेद अख्तर
sakal

बोलून बातमी शोधा

गांधीजींचे मारेकरी हेच सत्ताधाऱ्यांचे आदर्श  - जावेद अख्तर

गांधीजींचे मारेकरी हेच सत्ताधाऱ्यांचे आदर्श  - जावेद अख्तर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - धर्मनिरपेक्षता ही भारताची विचारधारा आहे. देशावर 50 वर्षे औरंगजेबाने राज्य केले, मात्र त्याला भारताच्या धर्मनिरपेक्षतेला संपवता आले नाही. ही धर्मनिरपेक्षता चार वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या मोदी सरकारला संपवता येणार नाही. धर्मनिरपेक्षतेच्या मुद्दावरच जनता येणाऱ्या निवडणुकीत सत्तांतर करेल असे परखड मत ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी व्यक्‍त केले. गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

गांधी प्रत्येकाच्या मनात जिवंत आहेत. त्यांचा विचार चिरतरुण आहे. मात्र असे असताना गांधींना मारणाऱ्यांचीही विचारधारा काहींनी जीवंत ठवली. ज्यांचे स्वातंत्र्यलढ्यात योगदान नाही त्यांनी गांधींना मारले. आज तेच लोक वल्लभाई पटेल, भगतसिंग यांना आपल्या बाजुचे म्हणवून घेत आहेत. अलीकडे गांधीजींना मारणारी विचारधारा अधिक तीव्र होत आहे. त्यामुळे गांधीजींचे विचार वाचवले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. 

गांधीजींचे मारेकरी हेच सत्ताधाऱ्यांचे आदर्श आहेत. हिंदुत्वाच्या नावाखाली धर्मामध्ये द्वेष, हिंसा पसरवली जात आहे, नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणली आहे. विज्ञान, कलांमध्ये हिंदुत्व शिरकाव करत आहे. राज्यघटनेवरील हे हल्ले थांबवले पाहिजे. त्यासाठी एकजूट दाखवली पाहिजे अशी भूमिका ज्येष्ठ इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांनी मांडली. आम्ही साहित्यिकांनी पुरस्कार वापसी करुन विरोध केला. ही चळवळ अधिक विस्तारायला हवी, असे मत सहगल यांनी व्यक्त केले. 

राज्यकर्त्यांचा अवाजवी हस्तक्षेप वाढतोय. तीस वर्षांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागतो. न्यायव्यवस्थेवर सगळीकडून दबाव आणला जातोय. विलंबित न्यायाच्या दुरुस्तीसाठी काय उपाययोजना केल्या. यासाठी जनतेचा दबाव धोरणकर्त्यांवर असला पाहिजे, अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती चेलमेश्वर यांनी मांडली. गांधी कधीच मरु शकत नाही असे प्रतिपादन अँडमिरल एल. रामदास यांनी केले. या कार्यक्रमात साहित्यिका कवी प्रज्ञा दया पवार, मीरा बोरवणकर, दिल्लीच्या विद्यार्थी परिषदेची प्रतिनिधी कौऊलप्रीत कौर आदींचा सहभाग होता. 

loading image