मुंबई : गणेश विसर्जनादरम्यान राज्यभरात विविध ठिकाणी पाण्यात बुडून किंवा विजेचा धक्का बसून १४ गणेश भक्तांचा मृत्यू झाला. तर, पाण्यात पडलेल्या काही जणांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले आहे, तर उरलेल्या जणांचा शोध सुरू आहे..ठाणे जिल्ह्यात भारंगी नदीकाठी विसर्जनाआधी गणपती आरती सुरू असताना नदीवरच बांधलेल्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी उडी मारलेल्या तरुणाला वाचविण्यासाठी पाण्यात उतरलेले पाच जण शनिवारी (ता. ६) सायंकाळी बुडाले. या घटनेतील दोघांना वाचविण्यात तत्काळ यश आले, तर उर्वरित तिघांपैकी एकाचा मृतदेह शनिवारी रात्री उशिरा तर एकाचा मृतदेह रविवारी (ता. ७) दुपारी हाती लागला. साकीनाका परिसरात रविवारी (ता. ७) सकाळी विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान लटकत्या विद्युत तारेचा स्पर्श गणेशमूर्तीला झाल्याने सहा भाविकांना विजेचा धक्का बसला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर पाच जखमी झाले. भाईंदरमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीची तयारी करीत असताना विजेचा धक्का लागून एका ३५ वर्षीय तरुणाचा शनिवारी (ता. ६) रात्री मृत्यू झाला. पालघरमध्ये बुडणाऱ्या तिघांना वाचविण्यात यश आले..पुण्यात चाकण परिसरात वाकी खुर्द येथील भामा नदीत दोघे जण, बिरदवडी येथील विहिरीत एक जण, शेलपिंपळगाव येथील भीमा नदीत एक जण अशा वेगवेगळ्या घटनात चार जण बुडाले असून पैकी एकाचा मृतदेह मिळाला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी नदीपात्रात गणरायाचे विसर्जन करण्यासाठी उतरलेले चार गणेशभक्त पाण्यात बुडाले आहे. यापैकी दोघांचे मृतदेह सापडले असून दोघांचा शोध सुरू आहे. .जळगावातही दोन बुडाले असून त्यांचा शोध घेतला जात आहे. अहिल्यानगर येथे गणेश विसर्जनानंतर एका युवकाचा मृत्यू झाला. टाकळी खातगाव (ता. नगर) शिवारातील पादीरवाडी तलावात शनिवारी (ता. ६) ही घटना घडली. जिल्ह्यातील राहाता तालुक्यातही एका युवकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. विसर्जन मिरवणुकीतील डीजेच्या दणदणाटात नाचल्यानंतर त्याने पाणी प्राशन केले आणि काही क्षणातच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. सोलापूरमध्ये गल्लीतील मित्रांसमवेत गणपतीची विसर्जन मिरवणूक पाहायला घराबाहेर पडलेल्या सहा वर्षांच्या एका बालकाचा रिक्षाची धडक बसल्याने मृत्यू झाला..वाशीम जिल्ह्यातील सेवादासनगर ता. मानोरा येथे नदीच्या प्रवाहात एक युवक वाहून गेला. नांदेडमध्येही नदीत तिघे जण बुडाले असून त्यांचा शोध सुरू आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री येथे गणेश विसर्जनासाठी तलावात उतरलेल्या ४३ वर्षीय रुग्णवाहिका चालकाचा तोल गेल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. सात) सायंकाळी पोखरी शिवारात घडली. नांदेडमध्येही देगाव बुद्रुक (ता. देगलूर) येथे ‘श्रीं’च्या मूर्तीचे विसर्जन करताना शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी वाहून गेलेल्या तरुणाचा रात्री उशिरा मृतदेह सापडला. अमरावती जिल्ह्यात दोघांचा बुडून मृत्यू झाल्याच्या, तर एकजण बेपत्ता असल्याच्या घटना विविध भागात घडल्या..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.