सोलापूर : महापालिकेतील आशा वर्कर्सचे खासगी दवाखान्यासोबत असलेले आर्थिक लागेबांधे उघड झाल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून श्रेयश हॉस्पिटलची तपासणी सुरू होती. अखेर शुक्रवारी महापालिकेने डॉ. सुमीत सुरवसे यांचा परवाना तात्पुरत्या स्वरूपात रद्द करून हॉस्पिटलही तात्पुरत्या स्वरूपात बंद केले आहे. या कारवाईवेळी रुग्ण दवाखान्यात, डॉक्टर वकिलाकडे तर महापालिकेकडून कारवाई असे एकंदरीत चित्र पाहायला मिळाले.
महापालिका प्रसूतिगृहाकडील रुग्ण खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी पाठविणे, महापालिकेत प्रसूती होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांकडून दहा हजारांची मागणी करणे, पैसे न देणाऱ्या रुग्णांना सिव्हिलकडे पाठविणे आदी कृत्ये करणाऱ्या आशा वर्कर्सची टोळीच महापालिका आरोग्य विभागाने चार दिवसांपूर्वी उघडकीस आणली. दरम्यान, श्रेयश नर्सिंग होमच्या तपासणीत महापालिकेच्या पथकाने सीझर, सोनोग्राफीसह सुमारे १८ रजिस्टर ताब्यात घेतल्या. या ठिकाणी अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या. श्रेयश नर्सिंग होमच्या डॉक्टर्सना नोटीस बजावण्यात आली. या रजिस्टरमध्ये नियमानुसार आवश्यक त्या नोंदी घेतल्या नाहीत. रुग्णांच्या संमतीपत्रावर नावे नाहीत. रुग्णांचा पूर्ण पत्ता आढळून येत नाही.
चुकीचे काम करणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णांची ओळख पटू नये, याची पुरेपूर दक्षता घेत असल्याचे रजिस्टरवरून दिसून आले. श्रेयश हॉस्पिटलच्या इतर रजिस्टरमध्ये महापालिकेच्या आशा वर्कर्सची नावे आढळून आली. चार दिवसांत त्याचा खुलासा देण्याची सूचना महापालिकेने डॉ. सुमीत सुरवसे आणि श्रद्धा सुरवसे यांना केली होती. परंतु, डॉक्टरांनी या नोटिशीला उत्तर दिले नाही. महापालिकेची कारवाई टाळण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. महापालिकेला तपासणीत सहकार्य न करता शासकीय कामात अडथळे आणले.
अखेर महापालिकेने नोटिशीची मुदत संपल्यानंतर खुलासा प्राप्त न झाल्याने शुक्रवारी दुपारी ४ वाजता श्रेयश हॉस्पिटल सीलची कारवाई केली. तात्पुरत्या स्वरूपात त्यांचा परवाना रद्द करण्यात आला. महापालिकेची यंत्रणा दवाखान्यात दाखल झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी सीझर झालेली एक रुग्ण आणि फॅमिली प्लॅनिंगची एक असे दोन रुग्ण रुग्णालयात दाखल होते. या रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी छोटा प्रवेशद्वार सुरू ठेवण्यात आला. तर हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वार सील करून त्यावर नोटीस लावण्यात आली.
१८ आशासेविकांची आरोग्याधिकाऱ्यांकडे गयावया
महापालिकेच्या विरोधात कृत्य करणाऱ्या आणि खासगी दवाखान्यात आर्थिक लागेबांधे असलेल्या तसेच नागरिकांच्या विविध तक्रारी प्राप्त झालेल्या आशा सेविकांना कामावरून बडतर्फ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. कारवाई होणाऱ्या आशा सेविकांची नावे प्रसिद्ध होताच एक मेट्रन आणि १८ आशा सेविकांनी आरोग्याधिकाऱ्यांसमोर गयावया सुरू केली. डोळ्यात अश्रू आणून आपण त्यामध्ये नसल्याबाबत सफाई देण्यासाठी आरोग्य विभागात आशा सेविकांनी गर्दी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.