आषाढी यात्रा.... माउलींच्या पादुका विमान किंवा एसटीने आणणार 

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 29 मे 2020

श्री.  भरणे म्हणाले,""कोणत्याही स्थितीत कोणतीही दिंडी निघणार नाही, हे सुरवातीलाच श्री. पवार यांनी स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांची मते जाणून घेतली. त्यानंतर पादुका कसे आणायच्या याचे नियोजन सांगितले. आषाढी यात्रा यंदा साध्या पद्धतीनेच साजरी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.'' 

सोलापूर ः कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा कोणत्याही दिंड्या निघणार नाहीत, असे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी स्पष्ट केले आहे. पावसाळी स्थिती नसेल तर हेलिकॉप्टर किंवा विमान आणि पावसाळी परिस्थिती असेल तर एसटीने माउलींच्या पादुका पंढरपुरात आणल्या जातील, तसे नियोजन करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले. 

श्री. भरणे यांनी आज शुक्रवारी सोलापुरात येऊन शहरातील विविध संघटना आणि आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर वारकरी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांची श्री. पवार यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्स झाली. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त दीपक तावरे व पोलिस अधीक्षक मनोज पाटील उपस्थित होते. 

श्री. भरणे म्हणाले,""कोणत्याही स्थितीत कोणतीही दिंडी निघणार नाही, हे सुरवातीलाच श्री. पवार यांनी स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांची मते जाणून घेतली. त्यानंतर पादुका कसे आणायच्या याचे नियोजन सांगितले. आषाढी यात्रा यंदा साध्या पद्धतीनेच साजरी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.'' 

सोलापुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. मात्र त्याचवेळी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सक्षमपणे काम करीत असल्याचेही सांगितले. प्रशासनाच्या काही चुका झाल्या हे मान्य, पण प्रशासकीय यंत्रणा चोवीस तास राबत आहे याचाही विचार करायला हवा, असेही ते म्हणाले. शहरातील दवाखान्यात रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही, अशा तक्रारी वाढल्या आहेत. त्याची दखल घेत श्री. भरणे यांनी ज्या रुग्णालयात असा प्रकार दिसून येईल, त्यांच्याविरुद्ध बेधडक कारवाई करावी, अगदी माझ्या भाउ असला तरी कारवाई करा, असा आदेश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. 

रिक्त जागांची संगणकीय यादी होणार 
शहरातील कोणत्या खासगी रुग्णालयात किती खाटा रिक्त आहेत याची माहिती तातडीने अपडेट केली जाईल. त्यामुळे रुग्णांना त्यांच्या सोईच्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची सोय होईल. तसेच जे हॉस्पिटल कोरोना टेस्टचा आग्रह धरत असतील, त्यांच्याविरुद्ध कारवाईचे आदेश लवकरच काढण्यात येईल, असेही श्री. शंभरकर यांनी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gaurdian minister dattatrey bharane press about aashadi yatra