
राज्यातील सर्वच राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या विरोधी निर्णय घेतात, शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एक होऊन संघटना वाढवली पाहिजे.
शेतकऱ्यांचे राज्य येण्यासाठी सज्ज व्हा - रघुनाथदादा पाटील
तळेगाव ढमढेरे - राज्यातील सर्वच राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या विरोधी निर्णय घेतात, शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एक होऊन संघटना वाढवली पाहिजे, शेतकरी संघटनेपुढे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठी आपले सरकार राज्यात असणे गरजेचे आहे. युवकांनी संघटित होऊन शेतकरी संघटनेला सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी केले.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे आयोजित "ऊस परिषदेत" श्री पाटील बोलत होते. यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील शेतकरी संघटना महाराष्ट्राचे अध्यक्ष शिवाजीराव नांदखीले, शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजित काळे, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, स्वागत अध्यक्ष ऍड. सुधीर ढमढेरे, श्रीकांतदादा ढमढेरे, शिरूर तालुका अध्यक्ष राजेंद्र ढमढेरे आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी पुणे जिल्ह्यसह राज्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री पाटील म्हणाले की, आगामी काळात कायद्याप्रमाणे उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद होऊ देणार नाही. पुनर्वसनाचे शिक्के रद्द झाले पाहिजेत, कांदा- बटाटा यावरील निर्यात बंदी कायमची रद्द झाली पाहिजे, दोन साखर कारखाने व इथेनॉल कारखान्यातील हवाई अंतराची अट रद्द झाली पाहिजे, गुंठेवारीची नोंद तात्काळ चालू करून तुकडेबंदी कायदा रद्द झाला पाहिजे, सातबारावरील पुनर्वसनाचे शिक्के तात्काळ रद्द झाले पाहिजेत, संपूर्ण कर्ज व वीज बिल मुक्ती झालीच पाहिजे अशा प्रकारच्या मागण्या मांडण्यात आल्या. श्री पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आगामी काळात राज्यात शेतकरी संघटनेचे सरकार असणे आवश्यक आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी गावागावांमध्ये चळवळ उभी करावी, कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रलोभनाला शेतकऱ्यांनी बळी पडू नये. कांदा,ऊस व इतर पिकांबद्दल भेदभाव न करता सर्वांनी शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र येऊन शेतमालाला योग्यभाव मिळण्यासाठी संघटित व्हा असे आवाहन त्यांनी केले. शेतकरी संघटनेचा झेंडा तरुणांच्या हातात दिसत आहे ही कौतुकाची बाब असून, यापुढेही संघटनात्मक कार्यास हातभार लावावा, कायदा हातात घेऊन किमान शेतमालाच्या भावासाठी आंदोलनात सहभागी व्हा असे आवाहन केले.
एफ आर पी कायद्यात उपपदार्थांचा हिशोब दिला जात नाही, कारखानदार परवडत नाही म्हणून कारखान्यावर नेहमीच कर्ज दाखवतात नफा कधीच सांगत नाहीत, राज्यकर्त्यांना "डोंगर, झाडी व हॉटेल हे ओके दिसते परंतु शेतकऱ्यांच्या अडचणी दिसत नाहीत. राजकीय पक्ष शेतकऱ्यांना फसवत आहेत अशी टीका त्यांनी केली.
सरकारी धोरण हे शेतकऱ्यांचे मरण आहे, विजेच्या बिलातून शेतकरी मुक्त झाला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सर्वांच्या किमती वाढतात परंतु शेतमालाची किंमत वाढत नाही सत्ता बदलली की धोरणे बदलतात. यावेळी "आज आपल्या बाजूने कोणी नाही, मी सर्व राजकीय पक्षांचा नाद सोडला आहे" अशी सर्वांना शपथ श्री पाटील यांनी दिली.
'ईडीची नोटीस आली की भाजप आणि कर्जाची नोटीस आली की शेतकरी संघटना असे चित्र सध्या राजकारणात दिसत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आगामी काळात शेतकरी संघटनेचे राज्य आले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, शेतकरी संघटनेतर्फे गावातून रॅली काढण्यात आली, यामध्ये शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. तळेगाव ढमढेरे येथील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मेळाव्याचे उत्कृष्ट संयोजन केले. राहुल कदम यांनी सूत्रसंचालन केले.