आमच्याकडे 162 आमदारांचे बहुमत; महाविकास आघाडीचे पत्र

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजभवनात दाखल होत, महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या तिन्ही पक्षांसह सहाकरी पक्षाचे  व अपक्ष आमदार असे मिळून एकूण १६२ आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र जमा केले आहे.

मुंबई ः राज्यातील सत्ता संघर्षाच्यादृष्टीने आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात महाविकास आघाडीकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी होत असताना, दुसरीकडे शिवसेनेने सत्तास्थापनेचा दावा करणारे पत्र राजभवनात सादर केले आहे.  महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजभवनात दाखल होत, महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या तिन्ही पक्षांसह सहाकरी पक्षाचे  व अपक्ष आमदार असे मिळून एकूण १६२ आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र जमा केले आहे.

देवेद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, परंतु आज देखील त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने ते बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करत आहोत, असे या पत्रात म्हटले आहे. सरकार स्थापन करण्यसाठी आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याने आम्हाला सरकार स्थापन करण्यास तात्काळ पाचारण करण्यात यावे अशी विनंती देखील पत्राद्वारे करण्यात आलेली आहे. या पत्रावर शिवसेना विधीमंडळ नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची स्वाक्षरी आहे.

याबाबत राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते जयंत पाटील म्हणाले की, ''राज्यपालांना आम्ही 162 आमदारांचे पत्र दिले आहे. आम्ही सत्तास्थापनेचा दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुरसे संख्याबळ  नाही. त्यामुळे ते बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत. आम्हाला शिवसेना, राष्ट्रवादी  काँग्रेस,  काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सीपीएम आणि सात अपक्ष पक्षांचा आम्हाला पाठिंबा आहे. आमच्याकडे 162 आमदारांचे बहुमत आहे. भाजपने चुकीच्या गोष्टी दाखवून फसवणूक केली आहे. भाजपने अगोदर सत्तास्थापन करण्यात असमर्थतता दाखविली होती, तर त्यांना परत संधी का दिली गेली. आत्ता सध्या त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे सत्तास्थापनेची संधी आम्हाला द्यावी. राष्ट्रवादीच्या 51 आमदारांच्या निवेदनावर सह्या आहेत. आता फक्त तीन आमदार आमच्यासोबत नाहीत. सुप्रिम कोर्टात सध्या सुनावणी सुरु आहे, त्याबबात काही बोलणे उचित ठरणार नाही.

एकनाथ शिंदे म्हणाले, ''शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली शपथ ही लोकशाहीची पायमल्ली आहे. त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही. असे असतानाही त्यांनी शपथ घेत जनतेची फसवणूक केली आहे. आमच्या सरकार साथापनेच्या मागणीचा तात्काळ विचार करून आम्हाला सरकार साथापनेसाठी राज्यपालांनी पाचारण करावे. तसेच फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे. सत्तास्थापनेसाठी सरकारने आम्हाला बोलवावे लोकशाही प्रक्रीयेचा गळा घोटण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे. तो आम्ही हाणून पाडू. एका रात्रीतलं सरकार आम्हाला मान्य नाही.''

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gives us 162 mlas chance power letter governor says jayant patil