ग्लोबल टीचर डिसले राजीनाम्यावर ठाम! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही कारवाईची टांगती तलवार

प्रतिनियुक्तीच्या काळात तब्बल ३२ महिने परस्पर गैरहजर राहिलेल्या ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसलेंना मुख्यमंत्री कार्यालयाकडून भेटीसाठी बोलावण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतरही डिसलेंना कारवाईतून ठोस आश्वासन न मिळाल्याने ते राजीनाम्यावर ठाम आहेत.
Global Teacher Ranjit Singh Disley
Global Teacher Ranjit Singh Disleyesakal

सोलापूर : प्रतिनियुक्तीच्या काळात तब्बल ३२ महिने परस्पर गैरहजर राहिलेल्या ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसलेंना मुख्यमंत्री कार्यालयाकडून भेटीसाठी बोलावण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतरही डिसलेंना कारवाईतून ठोस आश्वासन न मिळाल्याने ते राजीनाम्यावर ठाम आहेत. तत्पूर्वी, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी बोलावून त्यांची बाजू ऐकून घेतली होती.

जिल्हा परिषद शाळांमधील चिमुकल्यांचे शिक्षण सोपे व्हावे, यासाठी डिसलेंनी ‘क्यूआर कोड’ शिक्षण प्रणाली विकसित केली. त्यानंतर त्यांचा नावलौकिक वाढला आणि त्यांच्याकडील ज्ञानाचा वापर इतरांसाठीही व्हावा म्हणून परितेवाडी (ता. माढा) येथील वस्ती शाळेवरील डिसलेंनी ‘ग्लोबल’ होण्याचे स्वप्न पाहिले. दरम्यान, त्यांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेवर (डायट) प्रतिनियुक्ती देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. पण, त्यांना सुरवातीला त्या ठिकाणी एक वर्षाची प्रतिनियुक्ती मिळाली आणि त्यानंतर दोन वर्षे मुदतवाढ देण्यात आली. ३२ महिन्यांच्या काळात डिसले गुरुजींची ‘डायट’कडे एकाच दिवसाची हजेरी लागली होती. त्यांच्याबद्दल शिक्षण विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्यावर त्यासंदर्भात चौकशी झाली. त्या चौकशी समितीच्या अहवालातील त्रुटींवर पुन्हा एकदा चौकशी झाली. त्यात ते गैरहजर राहिल्याचे आणि प्रतिनियुक्तीवर असतानाही त्यांनी परितेवाडी शाळेच्या मुख्याध्यापकाचा आर्थिक व्यवहार स्वत:कडेच ठेवल्याची बाब समोर आली. त्यामुळे आता ते कारवाईच्या रडारवर आहेत. ७ जुलैला त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ग्लोबल टीचर पुन्हा एकदा चर्चेत आले. त्यांना थेट मुख्यमंत्री कार्यालयाने भेटायला बोलावले. त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेटही घेतली. पण, अजूनही त्यांना कारवाई मागे घेण्यासंदर्भात ठोस आश्वासन न मिळाल्याने अद्याप ते राजीनाम्यावर ठाम आहेत.

शिक्षणाधिकाऱ्यांना ‘सीईओं’चे पत्र


प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार हे कोल्हापूर येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी असताना त्यांच्या बेधडक व थेट कारवाईमुळे चर्चेत होते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड चालणार नाही म्हणून त्यांनी अनेकदा प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून सोलापूर जिल्ह्यातील झेडपी शाळांवरील लेटकमर शिक्षकांवर बिनपगारीची कारवाई केली. तसेच ग्लोबल टीचरसंदर्भात त्यांनी स्पष्ट भूमिका घेत शिक्षण विभागाची बाजू बेधडकपणे प्रसार माध्यमांसमोर मांडली. पण, आता प्रसार माध्यमांना किंवा इतरांना बोलताना तारतम्य बाळगावे, असे समजपत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना दिले आहे.

ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांनी अद्याप राजीनामा मागे घेतलेला नाही. ८ ऑगस्टपर्यंत राजीनामा मागे घेण्याची मुदत असून मुदतीत राजीनामा मागे न घेतल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कार्यवाही केली जाईल.


- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com