esakal | नाशिकच्या पिवळ्या बेदाण्याला चांगले दिवस
sakal

बोलून बातमी शोधा

नाशिकच्या पिवळ्या बेदाण्याला चांगले दिवस

- निर्यातीतून एक कोटी डॉलरचे परकीय चलन
- आयातदार देश आता निर्यातदार 

नाशिकच्या पिवळ्या बेदाण्याला चांगले दिवस

sakal_logo
By
एस. डी. आहिरे

पिंपळगाव बसवंत (नाशिक) ः जगाच्या बाजारपेठेत पिवळ्या बेदाण्याचा उत्पादक जिल्हा अशी ओळख नाशिकने अधोरेखित केली आहे. द्राक्षाबरोबरच बेदाणा निर्मितीत शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून पिवळ्या बेदाण्याने जागतिक बाजारपेठ कवेत घेतली आहे. गेल्यावर्षी दीड लाख टन उत्पादनापैकी 40 हजार टन बेदाण्याची निर्यात करत एक कोटी डॉलरचे परकीय चलन मिळवले. 

नाशिकच्या पिवळ्या पाचूची (बेदाणा) बरकत वाढली आहे. पंधरा वर्षांपूर्वी आयातदार भारत आता निर्यातदार झाला आहे. द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो, कांदा, ऊस उत्पादक जिल्ह्यात बेदाणा उद्योगाची पहाट झाली आहे. भावाच्या चढ-उतारमध्ये गेल्या दहा वर्षांपासून बेदाणा निर्मितीचा आलेख उंचावत चालला आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे बेदाण्याच्या उत्पादनासह त्याचा दर्जा, निर्मिती पूरक व्यवसायात वाढ झाली आहे. पिंपळगाव बसवंत, उगाव, कसबे सुकेणे, मोहाडी, खेडगाव, गिरणारे या भागाचे अर्थकारण द्राक्षासोबत बेदाण्याभोवती केंद्रित झाले आहे. 

निव्वळ बेदाण्यासाठी द्राक्ष उत्पादन घेतले जात नसले तरीही, आगामी काळात केवळ बेदाण्यासाठी द्राक्ष शेती हे समीकरण रूढ होऊ शकते. नाशिकचे हवामान पिवळ्या बेदाण्यासाठी पोषक ठरत आहे. बेदाण्यासाठीचे द्राक्षमणी बाजार समित्यांमधून विक्रीसाठी येतात. "डिपिंग ऑइल', सल्फर या पद्धतीने बेदाण्याची निर्मिती होते. मनुका करण्यासाठी तिसऱ्या प्रकारात प्रक्रिया करावी लागत नाही. द्राक्षमणी सुकल्यानंतर मनुका तयार होतो. चार ते पाच किलो द्राक्षमण्यांवर प्रक्रिया केल्यावर पंधरा दिवसांनी एक किलो बेदाणा तयार होतो. 

पाच हजार कुटुंबे जोडली 
उन्हाळ्यात बेदाण्याची निर्मिती होते. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळते. उत्पादक, व्यापारी, मजूर अशी पाच हजार कुटुंबे बेदाण्याच्या उद्योगाशी जोडली गेली आहेत. बेदाणा वित्तीय संस्था व शीतगृहासाठी उत्पन्नाचे साधन बनला आहे. पतसंस्था बारा टक्के व्याजदराने बेदाण्यासाठी कर्ज देतात. शीतगृहात किलोभर बेदाण्यासाठी चाळीस पैसे शुल्क आकारले जाते. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत प्रत्येक सोमवारी बेदाण्याचा लिलाव होतो. बेदाण्याला सध्या 110 ते 120 रुपये किलो असा सरासरी भाव मिळत आहे. बेदाणा उद्योगाला वरदान ठरणारे 14 कोटी 80 लाखांचे क्‍लस्टर सरकारने मंजूर केले होते; पण उत्पादक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या मतभेदामुळे क्‍लष्टरचे घोंगडे भिजत पडले आहे. 

दराचा गोडवा वाढू लागल्याने टाकाऊ द्राक्षमण्यांपासून बेदाणा निर्मितीच्या मानसिकतेतून उत्पादक बाहेर आले आहेत. चवदार आणि चकाकी असलेला बेदाणा तयार करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करत व्यापाऱ्यांनी परदेशी बनावटीची यंत्रसामग्री व्यापाऱ्यांनी आणली आहे. कचरा दूर करून "ऑइल कोटिंग' केले जाते. एका आकाराचे बेदाणे पॅक करून निर्यातीसाठी दिले जातात. 

निर्यात आणि उपयोग 
बेदाणा निर्यात झालेले प्रमुख देश ः युरोप, रशिया, युक्रेन, सौदी अरेबिया, दुबई, श्रीलंका, इंडोनेशिया 

बेदाण्याचा उपयोग ः औषध निर्मिती, सुकामेवा, चिवडा, बेकरी, आईस्क्रीम, वायनरी 

अफगाणिस्तान, तुर्कस्तानातून दहा वर्षांपूर्वी उच्च प्रतीचा बेदाणा आयात केला जायचा. उत्पादक आणि व्यापाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे आपला देश निर्यातदार झाला. "अपेडा' आणि केंद्र सरकारने बेदाणाच्या मार्केटिंगसाठी प्रोत्साहन दिल्यास परदेशातील नवीन बाजारपेठा मिळवणे शक्‍य होईल. - शीतलकुमार भंडारी, बेदाणा निर्यातदार 

गेल्या पंधरा वर्षांपासून बेदाण्याचे उत्पादन घेत आहे. भावाची अनिश्‍चितता असली तरीही, चांगल्या मालाला दर मिळतो. निर्यात सुरू झाल्याने चांगला भाव मिळण्यास मदत होत आहे. बेदाणा शेड उभारणीसाठी सरकारने अनुदान सुलभरीत्या उपलब्ध करून द्यावे. - रवी बावणे, बेदाणा उत्पादक 

loading image
go to top