

सोलापूर : भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) इंडियन प्रिमिअर लीगची (आयपीएल) सुरवात २२ मार्चपासून केली जाणार आहे. देशातील ज्या शहरांमध्ये सर्वाधिक क्रिकेटप्रेमी आहेत, त्या प्रेक्षकांसाठी ‘बीसीसीआय’कडून ‘आयपीएल’चे सामने पाहण्यासाठी विशेष सोय करून दिली जाणार आहे. सोलापूर शहर- जिल्ह्यातील सुमारे १० ते १२ हजार क्रिकेटप्रेमींना २९ व ३० मार्च रोजी होणारे ‘आयपीएल’चे सामने मोठ्या स्क्रीनवर विजयपूर रोडवरील नेहरूनगर शासकीय मैदानावर पाहता येणार आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर क्रिकेटप्रेमींना आता ‘आयपीएल’च्या सामन्यांची प्रतीक्षा आहे. सोलापूर शहर- जिल्ह्यातील किमान १५ लाखांहून अधिक लोक सामने पाहतातच, असा सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर ‘आयपीएल’च्या सीझनमध्ये यापूर्वी सहावेळा ‘बीसीसीआय’ने स्क्रीनद्वारे काही सामने पाहण्याची सोय सोलापुरातील शासकीय मैदानावर करून दिली होती.
आता यंदाही अशी सोय करून दिली जाणार असून, त्या ठिकाणी वातानुकूलित मंडप असणार आहे. आपण प्रत्यक्षात मैदानावरील स्टेडिअमवर बसूनच सामना पाहतोय, असे फील त्यावेळी येते. त्या ठिकाणी १८ फूट रुंद व ३६ फूट उंच स्क्रीन लावली जाते व त्यावरून क्रिकेटप्रेमींना ते सामने दाखविले जाणार असल्याची माहिती सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेंबर्सू यांनी दिली.
‘हे’ तीन सामने पाहता येणार विनामूल्य
‘आयपीएल’अंतर्गत २९ मार्च रोजी गुजरात संघाविरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. तर ३० मार्च रोजी राजस्थान रॉयल विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली विरुद्ध हैदराबाद या संघांमध्ये सामना होणार आहे. दोन दिवसातील तीन सामने सोलापुरातील १० ते १२ हजार क्रिकेटप्रेमींना नेहरू नगरातील शासकीय मैदानावर विनामूल्य पाहता येणार आहे. वातानुकूलित मंडपात हे सामने पाहता येणार असून त्या ठिकाणी उपस्थितांमधून प्रत्येक सामन्यावेळी दोन जणांना लकी ड्रॉमधून गिफ्ट देखील दिले जाणार आहे.
पार्क स्टेडिअमवर ‘आयपीएल’ अशक्यच
सोलापूर शहराच्या मध्यवर्ती इंदिरा गांधी पार्क स्टेडिअम असून, आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे मैदान स्मार्ट सिटीतून सुमारे २० कोटींचा खर्च करून विकसित केले आहे. पण, या मैदानावर सोलापूरकरांना आयपीएल किंवा आंतरराष्ट्रीय सामने पाहण्यासाठी आणखी काही वर्षांची वाटच पाहावी लागणार आहे. मैदानावर दिवस- रात्र सामन्यांसाठी फ्लड लाईटची सोय नाही, विमानतळ अजून सुरू झालेले नाही आणि मैदानाची प्रेक्षक क्षमता ३५ हजारांपर्यंत आवश्यक आहे, पण सध्या १५ हजार प्रेक्षक बसतील एवढीच क्षमता आहे. बाजूलाच किल्ला असल्याने परिसरात खोदाई करण्यावर निर्बंध असल्याने देखील फ्लड लाईट बसविण्यास अडचणी येतील, असे अधिकारी सांगत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.