विद्यार्थ्यांसाठी खुषखबर! विद्यापीठाच्या परीक्षेत प्रत्येक तासाला मिळणार १५ मिनिटांचा वेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

student
विद्यार्थ्यांसाठी खुषखबर! विद्यापीठाच्या परीक्षेत प्रत्येक तासाला मिळणार १५ मिनिटांचा वेळ

विद्यार्थ्यांसाठी खुषखबर! विद्यापीठाच्या परीक्षेत प्रत्येक तासाला मिळणार १५ मिनिटांचा वेळ

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर विभागाच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा १५ जूनपासून ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ विभागाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षा होतील. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा अंतिम निर्णय झाला आहे. बीए, बीकॉम, बीएस्सी, एमए, एमकॉम, एमएससी, एमबीए, एमसीए या पारंपारिक व व्यवसायिक विद्याशाखांच्या सर्व विषयांच्या परीक्षा ऑफलाइन होतील. परीक्षेसाठी शहरात २४ तर ग्रामीण भागातील विविध महाविद्यालयांमध्ये ४७ केंद्रे असणार आहेत. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे मिळून ७० हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सम सत्राच्या या परीक्षा आहेत. सुरुवातीला अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होतील. १५ जून ते २० जुलैपर्यंत चालतील, असेही विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी व परीक्षेत गैरप्रकार होऊ नयेत म्हणून भरारी पथकांची नियुक्ती केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त परीक्षा द्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणपूर यांनी केले आहे. दरम्यान, दोन पेपरमध्ये एक की दोन दिवसांची सुटी असणार, याबाबत विद्यापीठाकडून काहीच सांगण्यात आलेले नाही.

तासाला १५ मिनिटांचा ज्यादा वेळ
कोरोना काळात सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून एका तासाला पंधरा मिनिटांचा ज्यादा वेळ विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी दिला जाणार आहे. तीन तासाचा पेपर असल्यास ४५ मिनिटे अधिक मिळेल, अशी माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी यावेळी दिली.