तुम्ही कामगार आहात ना ! प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून घ्या 1550 आजारांवर मोफत उपचार; खर्चाची मर्यादा नाही

तात्या लांडगे
Friday, 22 January 2021

ठळक बाबी... 

  • कामगार योजनेतील (ईएसआय) कामगारांना मिळणार आता प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ 
  • राज्यातील कामगारांच्या 33 लाख कुटुंबांचा आरोग्याचा प्रश्‍न मिटला; खर्चाची मर्यादा नाहीच 
  • राज्यभरातील 980 रुग्णालयांमधून कामगारांना मिळणार एक हजार 550 आजारांवर मोफत उपचार 
  • ईएसआयचे कार्ड तथा पासबूक आवश्‍यक; 11 जानेवारीपासून मोफत लाभ देण्याचा केंद्राचा निर्णय 

सोलापूर : राज्यातील सर्वसामान्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत एक हजार 209 आजारांवर मोफत उपचाराचा लाभ मिळतो. या योजनेअंतर्गत राज्यातील दोन कोटी 22 लाख कुटुंब लाभार्थी असून त्यांना 996 रुग्णालयांमधून तीन लाखांपर्यंत मोफत उपचार दिले जातात. दुसरीकडे केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत तथा प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील 83 लाख 67 हजार कुटुंबांना पाच लाखांपर्यंत लाभ दिला जातो. दरम्यान, आता ईएसआयअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या कामगारांना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत 980 रुग्णालयांमधून एक हजार 550 आजारांवर मोफत उपचार देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

सर्वसामान्यांसाठी दोन्ही योजना वरदानच 
दोन्ही योजनांचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत. राज्य सरकारची महात्मा फुले जनआरोग्य योजना व केंद्र सरकारची प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तथा आयुष्यमान भारत योजनेचा लाभ राज्यातील गोरगरिबांना मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. आता कामगारांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. लाभार्थ्यांनी योजनेची माहिती जाणून घेऊन मोफत योजनांचा लाभ घ्यावा. 
- डॉ. बाहुबली नागावकर, सहसंचालक, सार्वजनिक आरोग्य योजना, मुंबई 

 

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील लाभार्थ्यांकडे रेशनकार्ड तथा अधिवास दाखला आणि मतदान, आधार अथवा पॅनकार्ड असणे आवश्‍यक आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार राज्यातील सर्वच शिधापत्रिकाधारकांना 31 जानेवारीपर्यंत या योजनेतून मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे. त्याची मुदत आणखी वाढेल, असे सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. आयुष्यमान भारत योजना तथा प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थी निश्‍चित झाले आहेत. त्यांच्याकडे या योजनेचे ई- कार्ड अथवा केंद्र सरकारने टपाल कार्यालयातर्फे पाठवलेले लाभार्थ्यांच्या नावाचे पत्र असल्यास, त्यांना योजनेतील रुग्णालयातून पाच लाखांपर्यंत मोफत उपचार दिले जात आहेत. दरम्यान, कामगारांसाठीही या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय झाला असून त्यांना मात्र, उपचारावरील खर्चाची कोणतीच मर्यादा घालण्यात आलेली नाही.

 

ठळक बाबी... 

  • कामगार योजनेतील (ईएसआय) कामगारांना मिळणार आता प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ 
  • राज्यातील कामगारांच्या 33 लाख कुटुंबांचा आरोग्याचा प्रश्‍न मिटला; खर्चाची मर्यादा नाहीच 
  • राज्यभरातील 980 रुग्णालयांमधून कामगारांना मिळणार एक हजार 550 आजारांवर मोफत उपचार 
  • ईएसआयचे कार्ड तथा पासबूक आवश्‍यक; 11 जानेवारीपासून मोफत लाभ देण्याचा केंद्राचा निर्णय 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for workers! Pradhan Mantri Janaarogya Yojana will provide free treatment for 1550 diseases