राज्यात आता ऑनलाइन तासिकेसाठी होणार 'गुगल क्लासरूम'चा वापर

मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 July 2020

'गुगल क्लासरूम'च्या सुविधेचा प्रत्यक्ष वापर करण्यासाठी पहिल्या टप्प्यात राज्यातील सर्व शासकीय,स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व तंत्रस्नेही शिक्षकांना गुगल क्लासरूमचे ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

पुणे -  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने आता मुलांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी आता 'गुगल' मदतीला आले आहे. 'गुगल क्लासरूम' द्वारे राज्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लवकरच धडे गिरविता येणार आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाने जय्यत तयारी सूरू केली असून लवकरच शिक्षकांना या सुविधेचा वापर कसा करायचा याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सद्यस्थितीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद असली, तरीही तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रत्यक्ष संवाद साधता यावा, शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संदर्भ साहित्य उपलब्ध करून देता यावे, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करता यावे, विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या अभ्यापनाचा लाभ घेता यावा, यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या मार्फत राज्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्यासाठी गूगल क्लासरूम ही सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अंतर्गत प्रत्येक शिक्षकास अमर्यादित स्टोरेजचे आणि विद्यार्थ्यांस जास्तीत जास्त मर्यादेचे 'जी सूट आयडी' आणि पासवर्ड तयार करून देण्यात येणार आहे. या द्वारे शिक्षक एका वेळी जास्तीत जास्त २५० विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन तासिका घेता येणार आहे. त्याशिवाय ही तासिका रेकॉर्ड करून कधीही विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध होऊ शकणार आहे. यासाठी गुगल केवळ गुगल क्लासरूम हे व्यासपीठ उपलब्ध करून देणार असून शिक्षक आणि विद्यार्थी यांची माहिती शिक्षण विभागाकडे राहणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जवळपास ४० हजार शिक्षकांना पहिल्या टप्प्यात मिळणार प्रशिक्षण
'गुगल क्लासरूम'च्या सुविधेचा प्रत्यक्ष वापर करण्यासाठी पहिल्या टप्प्यात राज्यातील सर्व शासकीय,स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व तंत्रस्नेही शिक्षकांना गुगल क्लासरूमचे ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात जवळपास ४० हजार शिक्षकांचे प्रशिक्षण ऑनलाइनद्वारे घेण्यात येणार आहे. त्यानंतर खासगी अनुदानित आणि खासगी विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी पत्राद्वारे सर्व विभागीय उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना दिली आहे.

'ताटाखालचे मांजर न झाल्यामुळेच गायकवाड यांची बदली'; काँग्रेसने केली टीका​

शिक्षक गिरविणार शिकविण्याचे धडे
"गुगल क्लासरूमचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येणार असून त्यासाठी शिक्षकांना सोमवारपर्यंत नोंदणी करता येणार आहे. याद्वारे शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभागातर्फे प्रत्येक शिक्षक आणि विद्यार्थ्यांला जी सूट आयडी' आणि पासवर्ड तयार करून दिला जाणार आहे. शिक्षकांने केवळ 'गुगल क्लासरूम'चा वापर करून शिकवायचे कसे, गृहपाठ द्यायचा कसा हे तंत्र प्रशिक्षणातून शिकायचे आहे."
- विकास गरड, उपसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद

Edited by : Kalyan Bhalerao


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google Classroom use for online class in maharashtra