
पवारांशी थेट संघर्ष करून त्यांची सत्ता घालवणारा पहिला नेता म्हणजे गोपीनाथ मुंडे
गोपीनाथ मुंडे. महाराष्ट्राचे लोकनेते आणि मराठवाड्याचे दमदार नेतृत्व असणारे गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतिदिन. मातीशी नाळ जोडलेले आणि कष्टकरी, शेतकरी, ऊसतोड कामगारांसाठी अविरत झटणारे गोपीनाथ मुंडे यांची 8 वर्षांपूर्वी प्राणज्योत मालवली. महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता असताना सक्षम विरोधी पक्षनेते म्हणून गोपीनाथ मुंडेंनी शरद पवारांना खुलं आव्हान दिलं होतं. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्याशी थेट भिडण्याची ताकद कुणाची नसताना ही हिंमत गोपीनाथ नावाच्या पठ्ठ्याने करून दाखवली होती.
3 जून 2014. महाराष्ट्राच्या एका ग्रामीण राजकीय पर्वाचा अंत... लोकसभेवर निवडून आल्यावर गोपीनाथ मुंडेंनी ग्रामविकास मंत्री पदाची शपथ घेतली होती. पण इकडे महाराष्ट्रात युती सरकारकडून विधानसभेच्या निवडणुकांसाठीही मोर्चेबांधणी केली जात होती. भाजपाकडून मुख्यमंत्रीपदासाठी कोणता उमेदवार द्यावा याचा विचार सुरू होता. त्यानंतर भाजपचे तात्कालीन प्रदेशाध्यक्ष एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांचं नाव जाहीर करून टाकलं होतं.

शरद पवार, दाऊद आणि गोपनाथ मुंडे
गोपीनाथ मुंडे हे त्यावेळी दिल्लीत होते. शपथविधीनंतर ते प्रथमच महाराष्ट्रात येणार होते. लोकसभेत यश मिळवल्यावर त्यांनी दिल्लीत जाऊन मंत्रीपदाची शपथ घेतली होती. शपथ घेतल्यावर ते पहिल्यांदाच महाराष्ट्रात येणार होते. गाडी तयार झाली. निवासस्थानावरून ते विमानतळावर येणार होते. गाडीतून विमानतळाकडे रवाना झाले आणि मध्येच रस्त्यात घात झाला. त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. महाराष्ट्राच्या तळागाळातील लोकांच्या घरी जाऊन त्यांचे अश्रू पसणारा नेता महाराष्ट्राने गमावला होता.
१९९५ सालापर्यंत महाराष्ट्रात भाजपा शिवसेनेचं सरकार स्थापन झाल नव्हतं. पण १९९५ साली भाजपा शिवसेना युती सरकार सत्तेत आलं होतं. त्याअगोदर राजकारणात आपल्याला मोठं व्हायचं असेल तर आपला शत्रूही तेवढाच मोठा असायला पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं होतं. १९९२ नंतर झालेल्या दंगलीनंतर महाराष्ट्रासहित देशात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तोपर्यंत पवारांशी वाकड्यात घुसण्याची हिंमत कुणी केली नव्हती. ती हिंमत गोपीनाथरावांनी केली आणि पवारांवर निशाणा साधायला सुरूवात केली. एनरॉय प्रकरण आणि दाऊदशी संबंध असल्याचे उघड आरोप करत राजकारणातील शरद पवारांचा विरोधक म्हणून त्यांनी आपली प्रतिमा तयार केली. गोपीनाथ मुंडे यांनी पवारांचे दाऊदशी संंबंध असल्याचं जाहीरपणे सांगितलं पण पुढे पुराव्यांच्या अभावामुळे ते शरद पवारांवरील आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत, आणि एनरॉय पाण्यात समुद्रात बुडवल्याची भूमिकाही त्यांना पुढे बदलावी लागली होती.

Gopinath Munde
१९९४-९५ साली गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवारांच्या विरोधात संघर्ष यात्रा काढली आणि तिथून पुढे शरद पवारांच्या उतरत्या काळाला सुरूवात झाली. मुंडेंच्या शिवनेरी ते शिवतीर्थ या संघर्षयात्रेमुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. १९९५ साली होणाऱ्या निवडणुकांच्या रणधुमाळीत आपली वर्णी लावायची असेल तर आपल्याला शरद पवार नावाच्या बड्या नेत्याशी दोन हात केले पाहिजेत हे त्यांना कळून चुकलं होतं. त्यामुळे त्यांनी संघर्ष यात्रा काढून महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेच्या प्रश्नाला हात घातला आणि पुढे १९९५ साली भाजप शिवसेना युती सरकार सत्तेत आलं. त्यांच्या शरद पवारांच्या विरोधातील ठाम भूमिकेमुळे राज्यात सत्ता आणता आली होती हे विसरता येणार नाही. युती सरकार सत्तेत आल्यावर मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपद आणि गोपीनाथ मुंडे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं.
तसं बघितलं तर मनोहर जोशी आणि शरद पवारांचे जवळचे संबंध होते. पण शरद पवारांविरोधात जाहीर भूमिका घेऊन मुंडे एकटे पडले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या राजकारणाची शैली हळूहळू बदलली. पुढे मुंडेंना पवारांशी जुळवून घ्यावे लागले होते. पुढे महाराष्ट्रात सहकार रूजवण्यासाठी त्यांना शरद पवारांचा सल्ला वेळोवेळी घ्यावा लागला होता.

Gopinath Munde
त्यांच्या या राजकीय प्रवासात त्यांना साथ मिळाली ती त्यांचे मेहुणे प्रमोद महाजन यांची. पण पुढे २००६ मध्ये महाजनांच्या भावाने त्यांची हत्या केली आणि भाजपाच्या गोटात अनेक स्थित्यंतरे आली. कारण महाराष्ट्रात महाजन मुंडे ही जोडी म्हणजे भाजपाचा चेहरा होता. त्या जोडीतला एक तारा निखळला आणि मुंडेंना काँग्रेस राष्ट्रवादीतील विरोधकांशी जेवढा संघर्ष करावा लागला तेवढा संघर्ष त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना करावा लागला होता.
२०१४ च्या निवडणुकांत त्यांचा पुन्हा विजय झाला पण त्यांनी कामाची सूत्रे हाती घेताच त्यांच्यावर काळाने झडप घातली आणि महाराष्ट्राने एक दूरदृष्टी असलेला महाराष्ट्रातील ग्रामीण, कष्टकरी, शेतकरी, कामगारांच्या हक्काचा नेता गमावला. पण त्यांच्या राजकीय प्रवासातील शरद पवारांच्या विरोधातील भूमिकेमुळे युती सरकार सत्तेत आणण्यासाठी मदत झाली हे विसरता येणार नाही.
Web Title: Gopinath Munde Death Anniversary Congress Cm Sharad Pawar Opposition
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..