चिंता मिटली; गंभीर रुग्णांच्या शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा, सरकारनं दिल्या 'या' सूचना

भाग्यश्री भुवड
Monday, 24 August 2020

त्वरित उपचाराची आवश्यक असलेल्या नागरिकांची अ‍ॅण्टिजेन चाचणी करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हृदयविकाराचा झटका, अँजिओप्लास्टी, बायपास यासारख्या तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक असलेल्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई: कोरोना चाचणीशिवाय रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे प्रकृती गंभीर असलेल्या अनेक रुग्णांना आपले जीव गमवावे लागले. अ‍ॅण्टिजेन चाचणीमुळे आता अर्ध्या तासामध्ये कोरोना अहवाल मिळत आहे. त्यामुळे त्वरित उपचाराची आवश्यक असलेल्या नागरिकांची अ‍ॅण्टिजेन चाचणी करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हृदयविकाराचा झटका, अँजिओप्लास्टी, बायपास यासारख्या तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक असलेल्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. 

राज्यातील कोरोना रुग्ण सर्वच जिल्ह्यांमध्ये आढळून आले आहेत. या रुग्णांच्या संख्येमध्ये सतत वाढ होत आहे. कोरोना चाचण्यांसाठी आयसीएमआरने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचना तसेच राज्यातील रुग्णांचे स्वरुप लक्षात घेऊन राज्याच्या कोरोना चाचण्यांचे अल्गोरिदम तयार केले आहे. त्यानुसार चाचण्या करण्यासाठी सरकारकडून नव्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रकृती गंभीर असलेले रुग्ण, गर्भवती, तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज असलेल्या व्यक्तींची नॅट चाचणी करावी लागते. मात्र नव्या सूचनांनुसार ज्या हॉस्पिटलमध्ये नॅट चाचणीची सुविधा नसेल अशा ठिकाणी अ‍ॅण्टिजेन चाचणी करून उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचाः  1 सप्टेंबरनंतर कसा असेल लॉकडाऊन?, बुधवारी ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय

प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांना फार काळ ताटकळत ठेवणे योग्य नसल्याने या रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी त्यांची अ‍ॅण्टिजेन चाचणी करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे हृदयविकाराचा झटका, अँजिओप्लास्टी, बायपास, गर्भवती, ब्रेन डेड यासारख्या तातडीने आवश्यकता असलेल्या शस्त्रक्रियांचा मार्ग मोकळा झाला आहे. अ‍ॅण्टिजेन चाचणीमुळे या रुग्णांच्या शस्त्रक्रिया अवघ्या अर्ध्या तासामध्ये करणे शक्य होणार आहे. त्यामुळे रुग्णांचा मृत्यू होण्याच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. 

लक्षणे नसलेल्या व्यापारी, प्रवाशांना दिलासा

प्रवास करणार्‍या व्यक्ती, जिल्ह्यात दाखल होणार्‍या व्यक्ती, व्यापारी यांना जर कोविड 19 सदृश्य लक्षणे नसल्यास त्यांची कोविड 19 चाचणी करण्यात येऊ नये अशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशी व व्यापार करणार्‍या व्यक्तींना दिलासा मिळाला आहे.

मनोरुग्ण, कैद्यांना एका आठवड्याचे क्वारंटाईन

मनोरुग्णालयात दाखल होणार्‍या रुग्णांना तसेच तुरुंगामध्ये दाखल होणार्‍या कैद्यांना एक आठवडाच क्वारंटाईन ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची अ‍ॅण्टिजेन चाचणी करून त्यानुसार त्यांना आयसोलेशन वॉर्ड किंवा हॉस्पिटलमधील संबंधित वॉर्डमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशा सूचना राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत.

अधिक वाचाः  सॅनिटायझरचा वारंवार उपयोग करत असाल तर वेळीच सावध व्हा; त्वचेची गंभीर अँलर्जी होण्याची शक्यता

आयसीएमआरने आरटीपीसीआर चाचण्यांबाबत नियमावली दिली आहे. मात्र, अन्य चाचण्यांबाबत नियमावली निश्चित नसल्याने गोंधळ होत होता. अनेक ठिकाणी अतिरिक्त चाचण्या होत असल्याचे समोर आले होते. त्यामूळे, चाचण्यांबाबत सूचनावली बनवून त्यांचा क्रम निश्चित करण्यात आला आहे. 

डॉ. प्रदिप व्यास, प्रधान सचिव, आरोग्य विभाग

(संपादनः पूजा विचारे)

Government instructions antigen testing surgery of critically ill patients


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government instructions antigen testing surgery of critically ill patients