esakal | हार्बर मार्गावरील शिवडीच्या स्टेशन व्यवस्थापकांचा सत्कार
sakal

बोलून बातमी शोधा

हार्बर मार्गावरील शिवडीच्या स्टेशन व्यवस्थापकांचा सत्कार

हार्बर मार्गावरील शिवडीच्या स्टेशन व्यवस्थापकांचा सत्कार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
  • राज्यपालांनी पाठीवर दिली कौतुकाची थाप

मुंबई: हार्बर मार्गावरील किंग्ज सर्कल आणि शिवडी स्थानकाला अस्वच्छतेतून स्वच्छतेच्या यादीत आणणाऱ्या शिवडी रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक नितेश कुमार सिन्हा यांचा नुकताच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते 'मुंबई रत्न' पुरस्काराने सन्मान केला आहे. या सन्मान सोहळ्यात पार्श्व गायक उदित नारायण, गायक अनूप जलोटा, उद्योपती रतन टाटा, उद्योपती अदि गोदरेज, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, विधितज्ञ उज्ज्वल निकम यांच्यासह उद्योग, साहित्य, सामाजिक क्षेत्रातील एकूण 31 जणांचा सन्मान करण्यात आला.

हार्बर रेल्वेवरील प्रवाशांना चहूबाजूने अस्वच्छता पसरलेल्या, दुर्गंधीयुक्त, बेरंगी भिंत्या असलेल्या शिवडी स्थानकातून प्रवास करावा लागत होता. मात्र, मागील काही महिन्यात शिवडी स्थानकाचा प्रवास तिमिरातूनी तेजाकडे गेला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील अस्वच्छ स्थानकाच्या यादीतून नाव वगळून स्वच्छ स्थानकाच्या यादीत सुवर्ण अक्षराने शिवडी स्थानकाचे नाव झळकू लागले आहे. यामागे सिन्हा यांची मेहनत, जिद्द कामी आली. सिन्हा हे शिवडी रेल्वे स्थानकाच्या अगोदर किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकात स्थानक व्यवस्थापक होते. येथेच त्यांनी स्वच्छतेची मशाल हाती घेतली होती. स्वच्छतेसह पर्यावरण जागृतीसाठी झाडे लावणे, प्रवासी सुविधा वाढविण्यासाठी भर दिला. त्यानंतर त्यांची वर्षभरापूर्वी शिवडी स्थानकात बदली झाली. त्यानंतर या काळात त्यांनी स्थानकातील स्वच्छता, भिंतींना रंग देणे, पाण्याची सुविधा वाढवून स्थानकाचे रुप पालटले. त्यामुळे श्र्वास कोंडणाऱ्या शिवडी स्थानकात मोकळा श्वास घेण्याची संधी प्रवाशांना दिली.

राज्यपालांच्या हस्ते सन्मान मिळणे खूप अभिमानाची गोष्ट आहे. माझ्यासाठी आणि रेल्वेसाठी गौरवाची बाब आहे. माझ्यामते, इतिहासात पहिल्यांदाच राज्यपालांच्या हस्ते राजभवनात एका स्थानक व्यवस्थापकाचा सन्मान होण्याची घटना झाली असेल. प्रचंड मेहनत, प्रचंड ध्यासाने किंग्ज सर्कल, शिवडी रेल्वे स्थानकाला चकाकी दिली आहे. वेगवेगळ्या संकल्पना मांडून प्रवाशांना प्रवासीभिमुख सुविधा पुरवित आहे. राज्यपालाच्या हस्ते मिळालेल्या सन्मानामुळे छाती भरून आली असून अधिक काम करण्याची उर्जा अंगात आली आहे, असे शिवडीचे स्थानक व्यवस्थापक सिन्हा यांनी सांगितले.

loading image
go to top