शबरीमला प्रकरण : हे सरकार महिलांविरोधात : तृप्ती देसाई

टीम ई-सकाळ
Saturday, 16 November 2019

गेल्या वर्षी तृप्ती देसाईंना कोची विमानतळावरूनच परत जावे लागले होते. केरळमधील डाव्या आघाडी सरकारच्या धर्मविरोधी भूमिकेमुळे शबरीमला हे तीर्थक्षेत्र कायम तणावात राहत आहे.

तिरुअनंतपुरम : गेल्या काही दिवसांपासून केरळच्या पथनमथिट्टा जिल्ह्यातील अयप्पा स्वामींचे शबरीमला मंदिर प्रवेश हा विषय देशभरात गाजतो आहे. या मंदिरात दर्शनासाठी पुरुषांप्रमाणे महिलांनाही प्रवेश देण्यात यावा, यासाठी महिलांनी लढा पुकारला आहे.  

शबरीमला मंदिर भाविकांसाठी आजपासून खुले करण्यात आले. सायंकाळी पाच वाजता कंदरारू महेश मोहनाररू यांनी गर्भागृहाचे दरवाजे उघडले आणि भक्तांची दर्शनासाठी रीघ लागली. मात्र, आंध्र प्रदेशातून अय्यपा स्वामींच्या दर्शनासाठी आलेल्या 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या दहा महिलांना पोलिसांनी पांभा टेकडीवरूनच परत पाठविले. 

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने शबरीमला वादावर तोडगा काढण्यासाठी तो मोठ्या पीठाकडे गुरुवारी (ता. 14) सोपविला. त्यानंतर केरळ सरकारने सुरक्षा व्यवस्था कडेकोट केली. मात्र, आज पुन्हा त्याठिकाणी वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे महिला कार्यकर्त्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी संताप व्यक्त केला आहे.  

त्या म्हणाल्या की, ''काल केरळ सरकारने महिलांना कोणतेही संरक्षण पुरविण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले होते. कोणत्याही संरक्षणाविना आता महिला मंदिरात दर्शनासाठी जात असताना आता त्यांना रोखले जात आहे. त्यामुळे हे सरकार पूर्णपणे महिलांविरोधात काम करत असल्याचे यातून दिसून येते.''

गेल्या वर्षी तृप्ती देसाईंना कोची विमानतळावरूनच परत जावे लागले होते. केरळमधील डाव्या आघाडी सरकारच्या धर्मविरोधी भूमिकेमुळे शबरीमला हे तीर्थक्षेत्र कायम तणावात राहत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Govt working against women and disrespecting SC order on Sabarimala said Trupti Desai