Gram Panchayat Election 2022 : ग्रामपंचायतींसाठी बिगुल वाजला; १८ डिसेंबरला मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Grampanchayat election 2022 Code of conduct applicable from today Voting on 18 December

Gram Panchayat Election 2022 : ग्रामपंचायतींसाठी बिगुल वाजला; १८ डिसेंबरला मतदान

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांतील सात हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजला असून, १८ डिसेंबरला मतदान तर २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.

ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित अशा सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८ नोव्हेंबरला संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील, असे मदान यांनी सांगितले. सात डिसेंबरला दुपारी तीन वाजता अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. मतदान १८ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. या निवडणुकीत सरपंच पदाची निवड थेट जनतेमधून करण्यात येणार आहे.

दरम्यान, ओबीसी आरक्षणावरून महानगरपालिका, नगरपालिकांसह जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षणासाठी नेमलेल्या बांठिया समितीने सरकारला अहवाल सादर केला आहे. मात्र, ग्रामपंचायत वगळता इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयातील निर्णयानंतरच होणार असून यावर उद्या (ता. १०) ला सुनावणी होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांवर सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती नसल्याने या निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत.

निवडणूक कार्यक्रम

अर्ज भरण्याचा कालावधी : २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर

अर्जांची छाननी : ५ डिसेंबर

अर्ज माघारीची मुदत : ७ डिसेंबर

मतदान : १८ डिसेंबर

मतमोजणी : २० डिसेंबर

पुणे : ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन झालेल्या जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींचा (सदस्य पदासह सरपंच पदाच्या) निवडणूक कार्यक्रम बुधवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर केला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाचे प्रमाण निश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या समर्पित मागासवर्ग आयोगाने ७ जुलै रोजी सरकारला अहवाल सादर केला आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला यापुढील निवडणुकांमध्ये मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन पुढील निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार २१ ऑक्टोबर रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झालेल्या ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापन झालेल्या आणि समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्याने गेल्या निवडणुकांमधून वगळलेल्या अशा जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे. तर या निवडणुकांमध्ये सरपंचांची निवड जनतेतून करण्यात येणार आहे.

येथे होणार निवडणुका

जिल्ह्यातील निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये भोर तालुक्यातील सर्वाधिक ५४, वेल्हे तालुक्यातील २८, इंदापुरातील २६, खेडमधील २३, आंबेगावमधील २१, जुन्नरमधील १७, बारामतीमधील १३, मुळशीतील ११, मावळातील नऊ, दौंडमधील आठ, हवेलीतील सात आणि शिरूरमधील चार अशा १२ तालुक्यांमधील २२१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.