द्राक्षाच्या सक्षम काडीला हवीय वरुणराजाची दमदार साथ 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 June 2018

राज्यात साडेतीन लाख एकरांपर्यंत द्राक्षबागा पोचल्या आहेत. त्यात द्राक्ष पंढरी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दोन लाख एकरांवरील बागांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये मागील हंगामात उशिरापर्यंत छाटणी चालल्याने शेतकऱ्यांना द्राक्षांचे उत्पादन आणि भावही चांगले मिळालेत.

नाशिक : खरड छाटणीला उशीर झाला अन्‌ पाऊस लवकर आला. त्यामुळे मागील हंगामात द्राक्षांच्या काडीत फलधारणा झाली नाही. हा अनुभव जमेस असल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी किमान तीन आठवडे अगोदर यंदा खरड छाटणीचे काम पूर्ण केले. सूर्यप्रकाशही चांगला मिळाला. त्यामुळे अपेक्षित फलधारणा होऊन काडी सक्षम झालीय. आता अशा द्राक्ष बागांसाठी वरुणराजाच्या दमदार साथीची आवश्‍यकता आहे. 

राज्यात साडेतीन लाख एकरांपर्यंत द्राक्षबागा पोचल्या आहेत. त्यात द्राक्ष पंढरी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दोन लाख एकरांवरील बागांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये मागील हंगामात उशिरापर्यंत छाटणी चालल्याने शेतकऱ्यांना द्राक्षांचे उत्पादन आणि भावही चांगले मिळालेत. मध्यंतरी पुण्यात सोलापूरमधील भेटलेल्या शेतकऱ्यांच्या माहितीनुसार 10 जूनपर्यंत द्राक्ष विकले जातील, असे सांगून महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे कैलास भोसले यांनी आता द्राक्षांना 70 ते 80 रुपये किलो भाव मिळत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, की मागील हंगामातील अनुभवाच्या आधारे यंदा खरड छाटणीची कामे लवकर पूर्ण करण्यात आल्याने पुढील हंगामात चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना शाश्‍वती मिळाली आहे. मॉन्सूनपूर्व पावसाने वादळी वाऱ्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये हजेरी लावली. येत्या तीन दिवसांनंतर चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे. त्यामुळे आता जोरदार पाऊस झाला, तरीही त्याचा विपरीत परिणाम द्राक्षबागांवर होणार नाही. पावसाच्या हजेरीनंतर सूर्यप्रकाश मिळाल्यास बागांना अधिक मदत होईल. मात्र, सतत ढगाळ हवामानाची स्थिती राहिल्यास डावणी, भुरी, करपाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणीवर खर्च करावा लागेल. 
अन्नद्रव्य, संजीवकांचा डोस 

खरड छाटणीनंतर काडी विरळणी करत सहा ते सात पानांवर शेंडा छाटण्यात आला. त्यावर निघालेल्या बगल फुटीपैकी टोकाकडील फूट ठेवून बाकी फुटी काढण्यात येत आहेत. दहा ते बारा पानांवर "टॉपिंग' केले जात आहे. याशिवाय फलधारणेसाठी अन्नद्रव्य, संजीवके आणि जमिनीतून खतांचे डोस देण्यात येत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: grapes crops need suitable rain