'एसटी' बँकेच्या निवडणुकीत सदावर्तेंचं पॅनल; राष्ट्रवादीला थेट आव्हान? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gunaratna Sadavarte
एसटी महामंडळ बँकेच्या निवडणुकीत सदावर्तेंचं पॅनल; राष्ट्रवादीला थेट आव्हान?

'एसटी' बँकेच्या निवडणुकीत सदावर्तेंचं पॅनल; राष्ट्रवादीला थेट आव्हान?

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळं प्रकाशझोतात आलेले अॅड. गुणरत्न सदावर्ते हे आता एसटी महामंडळ सहकारी बँकेच्या निवडणुकीत आपलं पॅनल उभा करणार आहेत. अनेक वर्षांपासून या बँकेवर राष्ट्रवादीचं काँग्रेसचं वर्चस्व आहे. त्यामुळं आपलं पॅनल उभा करत आणि त्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना उमेदवाऱ्या देऊन सदावर्तेंकडून थेट राष्ट्रवादी काँग्रेसला आणि पर्यायानं शरद पवारांना आव्हान देण्यात येणार आहे. पण आम्ही यंग हिंदुस्तानी असून वयोवृद्ध पुढाऱ्यांशी आमची लढाई नाही, असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे. (Gunaratna Sadavarte has panel in ST Corporation Bank elections Challenge to NCP)

अॅड. सदावर्ते म्हणाले, एसटी महामंडळाची बँक ही सहकाराची बँक असून ती एक स्टेट आहे. ही लोकशाहीच्या माध्यमातून निवडून देण्याची प्रक्रिया आहे, ती कोणाच्या बापाच्या घरची व्यवस्था नाही. कोणाला इथं भ्रष्टाचारासाठी मोकळीक दिलेली नाही. त्यामुळं कष्टकरी एसटी कर्मचारी आपली स्वतःची माणसं निवडतील. आत्तापर्यंत या बँकेवर पॉलिटिकल बॉस उभे केले जात होते, ही बुजगावणी एसटी कर्मचाऱ्यांना १४ ते १५ टक्के व्याजानं कर्ज द्यायचे, यातून त्यांचं प्रचंड शोषण होत होतं. इतर राज्यांसाठी मात्र ७ ते ८ टक्के व्याजदर दिला जातो. आमची बँक, आमचा पैसा, आमचे कष्ट, आमचे श्रम आणि पैसा असतानाही या राजकारण्यांकडून आपल्या मर्जितल्या लोकांना आणि इतर राज्यांना कर्जे दिली जातात. आमचं म्हणणं आहे की तिकडं सात टक्के देता तर इथं का नाही?

ड्रायव्हर, कंडक्टर किंवा मेकॅनिकल आदींना आम्ही आमच्या पॅनलच्या माध्यमातून उमेदवारी देऊ. बँकेत आमचे ९५ टक्के सभासद आहेत. आमची लढाई आम्ही विना दारु, विना प्रलोभनाची लढू, अशा प्रकारे एसटी कर्मचारी आपलं हक्काचं स्थान निर्माण करतील यामध्ये आम्हाला काही शंका नाही तो त्यांचा अधिकार आहे, असंही सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

अनेक वर्षांपासून या बँकेवर राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे, त्यामुळं सदावर्तेंचा हा लढा थेट शरद पवारांशी आहे का? या प्रश्नावर बोलताना सदावर्ते म्हणाले, "आम्ही यंग हिंदुस्तानी आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्याशी आमची कसली लढाई? ते काय बँकेचे मालक आहेत का? बँकेचे सभासद आहेत का? आमची लढाई ही कोणत्याही वयोवृद्ध पुढाऱ्यांशी नाही. आमची लढाई भारतमातेच्या प्रगतीसाठी आहे. महाराष्ट्रात कष्टकऱ्यांना विकलांग करुन ठेवलंय यावर मात करण्यासाठी आहे. आमचं म्हणणं आहे की, सहकारातील आणि कष्टकऱ्यांची प्रगती साधायची आहे. ही प्रगतीच देशाची प्रगती आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी ९२ हजार कष्टकऱ्यांपैकी राष्ट्रवादीनं यादी जाहीर करावी. पण आत्तापर्यंत किती लोकांची सहकाराच्या माध्यमातून प्रगती झाली? उलट तुम्ही जे लोक वाढवले त्यांच्याकडे मोठी संपत्ती निर्माण झाली. त्यांची मालमत्ता तपासा दूध का दूध, पाणी का पाणी होईल, अशा शब्दांत यावेळी सदावर्ते यांनी सडकून टीकाही केली.

भ्रष्टाचारातून तुरुंगात गेलो नव्हतो - सदावर्ते

एसटी कर्मचाऱ्यांचा लढा लढत असताना अॅड. सदावर्ते यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. याच्या चौकशीसाठी त्यांना काही काळ तुरुंगवासही भोगावा लागला. पण आता ते जामिनावर बाहेर आले असून आपण कोणताही भ्रष्टाचार केला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. "आम्ही भ्रष्टाचारातून जेलमध्ये गेलेलो नव्हतो, आम्ही क्रांतीकारी आहोत" अशा शब्दांत त्यांनी आपली बाजू मांडली आहे.