गुरुपुष्य - एक शुभ योग

स्मिता दोडमिसे 
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

गुरुपुष्य आहे म्हणजे काय हे कळत ही नव्हते अशा वयापासून हा कामावर पडणारा शब्द. गुरुपुष्य आहे, गुंजभर का होईना सोने घ्यायला हवे, असे आईचे सुरू असायचे. किंवा एखादं वळ तरी घे, असे आजीचे बोलणे ऐकले की गुंजभर म्हणजे काय? वळं म्हणजे काय? या शब्दांचे अर्थही कळत नव्हते; पण त्या शब्दांभोवती गुरुपुष्य हा शब्द मात्र यायचा आणि नकळत तो घट्ट रुजला गेला.

गुरुपुष्य आहे म्हणजे काय हे कळत ही नव्हते अशा वयापासून हा कामावर पडणारा शब्द. गुरुपुष्य आहे, गुंजभर का होईना सोने घ्यायला हवे, असे आईचे सुरू असायचे. किंवा एखादं वळ तरी घे, असे आजीचे बोलणे ऐकले की गुंजभर म्हणजे काय? वळं म्हणजे काय? या शब्दांचे अर्थही कळत नव्हते; पण त्या शब्दांभोवती गुरुपुष्य हा शब्द मात्र यायचा आणि नकळत तो घट्ट रुजला गेला.

गुरौ पुष्यसमायोगे सिद्धयोग: प्रकीर्तित: 
गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरूवार व पुष्य नक्षत्र योग. आपल्या संस्कृतीमध्ये हा योग सर्वांत शुभयोग म्हणून ओळखला जातो. या दिवशी गुरुमंत्र किंवा आपल्या इष्टदेवाचे नामस्मरण करून आध्यात्मिक रीतिरिवाज पार पाडले जातात. या मुहूर्तावर ही कार्ये केल्यास त्यात लाभ होतो असं म्हटलं जातं. पुष्ययोग गुरुवारी किंवा रविवारी असेल तर त्याला महत्त्व असते. त्यावेळी या योगाला गुरुपुष्यामृत किंवा रविपुष्यामृत म्हटले जाते. आपल्याकडे हा योग अक्षय्य तृतीया, धनत्रयोदशी आणि दिवाळी या सणांएवढाच महत्त्वाचा मानतात. गुरुपुष्यामृत योग गुरुवारी ज्या कालावधीत चंद्र, पुष्य नक्षत्रात दिसतो तो गुरुपुष्ययोगकाल होय. त्याचा गुरू ग्रहांशी काही संबंध नाही. तसेच अमृताशीही नाही. २५०० वर्षांपूर्वी रोमनगरीत सात दिवसांचे बाजारचक्र होते. एक-दोन-तीन असे मोजून सात दिवस झाले, की लोक बाजाराला जमत. या दिवसांना नावे दिली तर सोय होईल असे लोकांना उमगले. त्यावेळी आकाशातील सात ग्रहांना आधीच नावे दिलेली होती. मग तीच नावे सात वारांना ठेवली. आणि मग ग्रह आणि त्या दिवशी असलेला वार अशी सांगड घातली गेली. मग चंद्र पुष्यनक्षत्रात असणे आणि त्या दिवशी गुरुवार असणे, असा हा गुरुपुष्यामृत योग. 

आपल्याकडे मुहूर्तांना विलक्षण महत्त्व आहे. मुहूर्ताला आपण सर्व शुभ कार्याला सुरुवात म्हणजेच शुभारंभ करत असतो. मुहूर्तांची निर्मिती कशी झाली हे पाहणेही कुतुहलाचे आहे. ज्योतिषशास्त्रात एकूण सत्तावीस नक्षत्रे मानली गेली आहेत. या नक्षत्रामध्ये पुष्य नक्षत्र विशेष शुभ असे मानले गेले आहे. ऋग्वेदात पुष्य नक्षत्र शुभंकारी, वृध्दीकारक व समृध्दीदायक आहे असे म्हटलंय. गुरुवारी पुष्यनक्षत्र  आल्यास तो दिवस शुभ मानला जातो. हा दिवस म्हणजे शुभ नक्षत्र व शुभ दिवस यांचा संयोग. संतुष्टी व पुष्टी देणारे नक्षत्र म्हणजे पुष्य नक्षत्र असे आपल्या ज्योतिषशास्त्रात मानले गेले आहे.

शुभ नक्षत्र व सात वारामध्ये गुरुवार शुभ म्हणून त्याच्या संयोगातील गुरुपुष्यामृत योग शुभ! कोणत्याही कार्यात यश देणारा, नशीब बदलणारा, इच्छित फल प्राप्ती करून देणारा गुरुपुष्यामृत योग आहे असे म्हटले जाते. गुरू ग्रह हा ज्ञान व यशस्विततेचे प्रतीक असे आपण म्हणतो, म्हणून या योगाच्या काळात अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा शुभारंभही केली जातो. 

शुभ कार्ये व गुरुपुष्यामृत योगाचा असा जवळचा संबंध आहे. या योगावर जप, तप, ध्यान, दान  इ. केले जातात तसेच अनेक शुभारंभ जसे शैक्षणिक शुभारंभ, घरबांधणी, सोनेखरेदी इ. केले जाते. स्थायी स्थिर नक्षत्र म्हणून पुष्य नक्षत्राकडे पाहिले जाते, यामुळे या योगावर केलेले सर्वच व्यवहार स्थिर सौख्य देणारे असतात असे मानले जाते. सोने हा मौल्यवान धातू. आपण भारतीय ‘सोने’ या धातुला अधिक महत्त्व देतोच. पूर्वापार एक बिनधोक आणि हक्काची गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडे आपण बघतो. असे मानले जाते की गुरुपुष्यामृत योगावर खरेदी केलेले सोने अक्षय राहते. त्या सोन्यामध्ये वृद्धी होते आणि ते पुन्हा विकायचीही वेळ येत नाही असे म्हणतात. एक अक्षय गुंतवणूक म्हणून गुरुपुष्यामृत योगावरील सोने खरेदीकडे पाहिले जाते, मानले जाते. या योगावर खरेदी केलेल्या सोन्यात अधिक भर पडत राहते असा लोकांचा अनुभव देखील आहे. पुष्यामृत गुरुवारी येणे हा योग दुर्मिळ आहे. म्हणूनच आपण याला अमृत योग असे संबोधितो.

गुरुपुष्य या शुभ योगावर काय करू शकता
या धार्मिक ग्रंथ वाचन, अनुष्ठान, आध्यात्मिक रीतिरिवाज या पारंपरिक गोष्टींबरोबरच आपण कालसुसंगत गोष्टीही ठरवू शकतो, ज्या कायम टिकतील जसे की
१. गृहप्रवेश, सोने व चांदी खरेदी, मालमत्ता आणि इतर गुंतवणूक खरेदी, नवीन व्यवसाय सुरू, विद्यारंभ म्हणजेच शिक्षण सुरू करण्यासाठी व इतर. तसेच या दिवशी गुरू मंत्र तसेच देवाचे नामस्मरण व इतर सर्व धार्मिक सेवा केल्यास अत्यंत लाभ होतो. 
२. गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त साधून धार्मिक पुस्तके, वैचारिक, अभ्यासपूर्ण पुस्तके वाचायला सुरुवात करा. 
३. दिवसातून किमान काही मिनिटे मनन, चिंतन करा.  त्याची सुरुवात गुरुपुष्यामृताच्या निमित्ताने करता येईल. 
४. मन:शांतीसाठी मन शांत करण्याचे व्यायाम
    गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सुरू करावे.
५. सकारात्मक विचार तर नेहमीच करायचा. त्यासाठी कोणताही मुहूर्त पाहायची गरज नाही. 
६. सतत आनंदी राहण्याचा आणि सकारात्मक राहण्याचा निश्‍चय करा. आपण आनंदात आहोत ही सवय लावून घ्या. 
मग हा शुभयोग, अमृतयोग नक्कीच होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gurupushyamrut Special Gold Good Time