
तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर जिल्हा गावागावात सहजपणे मिळणाऱ्या हातभट्टीमुळे राज्यभर ओळखला जातो. आई-वडिलांची म्हातारपणाची काठी म्हणजेच तरुण मुले हातभट्टीच्या आहारी जात आहेत. गावात पोलिस गेल्यावर त्यांना ते तरुण रस्त्यात कोठेही पडलेले दिसतात. तरीसुद्धा, अवैध हातभट्टीची विक्री खुलेआम सुरू आहे हे विशेष. पती हातभट्टीच्या व्यसनातून आजारी पडून मृत झाला आणि आता मुलगाही त्याच वाटेवर असल्याची व्यथा दक्षिण सोलापुरातील विंचूर गावातील विधवा महिलेने ‘सकाळ’कडे मांडली.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख जून २०२३ मध्ये तदारसंघात गावभेट दौरा करीत होते. त्यावेळी तालुक्यातील विंचूर, कुसुर, बोळकवठे, सुलेरजवळगे, फताटेवाडी अशा ठिकाणच्या महिलांनी दोनदा निवेदने दिली. त्यावेळी आमदार देशमुख यांनी थेट पोलिस अधिकाऱ्यास फोन लावून जाब विचारला आणि दारू विक्रेत्यांवरील कारवाईची सूचनाही केली. मात्र, काही दिवसांनी परिस्थिती ‘जैसे थे’च झाली.
विंचूर येथील महिलेच्या पतीला गावात सहज मिळणाऱ्या हातभट्टीचे व्यसन लागले. कामधंदा सोडून तो सतत हातभट्टी पित होता. काही वर्षांतच पतीने जगाचा निरोप घेतला. मुलगा मोठा होत असल्याने पतीच्या निधनाचे दु:ख ती महिला काही वर्षात विसरली. पण, ज्याचा आधार वाटला तोही हातभट्टीच्या आहारी गेल्याने ती हतबल झाली आहे. आमदारांकडे महिलांनी मागणी केली, गावकऱ्यांनी पोलिसांना निवेदन दिली, तरी हातभट्टी विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्याने जिल्हाभरातील हजारो महिला चिंतेत असल्याची सद्य:स्थिती आहे.
शासकीय यंत्रणेकडे सर्व माहिती, तरी...
सोलापूर जिल्ह्यातील ५४ ठिकाणी हातभट्टी तयार केली जाते आणि त्याची वाहतूक-विक्री जिल्ह्यातील मोठ्या ३५० गावांमध्ये होते, ही माहिती पोलिसांकडीलच आहे. ग्रामीण पोलिसांचे ‘ऑपरेशन परिवर्तन’ आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ‘हातभट्टीमुक्त गाव’अंतर्गत दोन्ही यंत्रणांनी ही माहिती यापूर्वीच संकलित केली आहे. त्या गावांमध्ये ग्रामीण पोलिसांचे बीट अंमलदार देखील आहेत. तरीसुद्धा, विक्रेत्यांवरील कारवाईत ना सातत्य ना हातभट्ट्यांवर छापे, अशी स्थिती आहे.
६ तालुक्यांत सर्वाधिक हातभट्ट्या
पोलिसांकडील माहितीनुसार, जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात सर्वाधिक ११, उत्तर सोलापूर व माळशिरस तालुक्यात प्रत्येकी नऊ, करमाळा तालुक्यात सात आणि अक्कलकोट व सांगोला तालुक्यात प्रत्येकी सहा ठिकाणी नेहमीच हातभट्टी पेटलेल्या असतात. याशिवाय पंढरपूर तालुक्यात तीन आणि मोहोळ तालुक्यातील दोन ठिकाणी देखील हातभट्ट्या आहेत. मात्र, सध्या अधिकाऱ्यांना ‘ऑपरेशन परिवर्तन’ व ‘हातभट्टीमुक्त गाव’ या अभियानांचा विसर पडल्याने हातभट्टी चालक बिनधास्तपणे गावागावात हातभट्टी पोच करीत असल्याचे चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.