हाथरस प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे द्या; शिवसेना आमदाराने केली मागणी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 October 2020

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणाचा गुन्हा मुंबईत दाखल करुन मुंबई पोलिसांना तपासासाठी उत्तर प्रदेशला पाठवण्याची मागणी केली आहे. त्यांनी टि्वट करत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे ही मागणी केली आहे.

मुंबईः उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणावरुन देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यावरुन राज्यातील योगी सरकारवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणाचा गुन्हा मुंबईत दाखल करुन मुंबई पोलिसांना तपासासाठी उत्तर प्रदेशला पाठवण्याची मागणी केली आहे. त्यांनी टि्वट करत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे ही मागणी केली आहे. आमदार सरनाईक यांनी योगी सरकारवर टीकास्त्रही सोडले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आमदार सरनाईक यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे की, देशाला संतप्त करणाऱ्या, मानवतेला काळिमा फासणाऱ्या हाथरस घटनेची पारदर्शक चौकशी न करता योगी सरकारने अत्यंत बेजबादारपणे, अमानवी पद्धतीने ती हाताळल्याचे दिसतेय. मुंबईत यावर गुन्हा नोंदवून मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावे अशी गृहमंत्री @AnilDeshmukhNCP  यांना मी विनंती करतो.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान,अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता. मुंबई पोलिस हेतूपुरस्सर तपासात दिरंगाई करत असल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. बिहार सरकारनेही हा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती. या प्रकरणात देशभरात मुंबई पोलिसांची नाचक्की झाली होती. यात महाराष्ट्र सरकार, बिहार सरकार आणि केंद्र सरकार आमनेसामने आले होते. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवून महिना झाल्यानंतरही त्यात प्रगती होत नसल्याने आता राज्यातील सत्ताधारी पक्षांकडून याबाबत विचारणा केली जात आहे. त्यातच आमदार सरनाईक यांनी हाथरस प्रकरण मुंबई पोलिसांकडे सोपवण्याची मागणी करुन भाजपवर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hand over Hathras case to Mumbai Police demanded Shiv Sena MLA Pratap Sarnaik