
Health Exam Fraud: फोडलेले पेपर पुरवणाऱ्या मुख्य दलालास अटक
पुणे : आरोग्य विभागाच्या गट "क' परीक्षेचा पेपर फोडून तो राज्याच्या वेगवेगळ्या भागातील दलालांपर्यंत तो पेपर पोचवुन त्यांच्याकडून पैसे घेणाऱ्या मुख्य दलालास पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुलढाणा येथून अटक केली. वर्धा येथे आरोग्य सेवक म्हणून कार्यरत असणारा संबंधित दलाल मागील अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या. (Health Department Exam Fraud Updates)
गोपीचंद सानप (वय 27, रा. बीड) असे अटक केलेल्या मुख्य दलालाचे नाव आहे. याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेमध्ये काही महिन्यांपुर्वी गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये वरिष्ठ अधिकारी, दलालांसह अनेकांना आत्तापर्यंत अटक केली आहे. पोलिसांनी यापुर्वी आरोग्य पेपरफुटी प्रकरणामध्ये संजय सानप यास अटक केली होती. त्याच्यासमवेत गोपीचंद सानप हा देखील होता. सानप हा बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे.
हेही वाचा: Pune Corporation: भाजपचा धमाका; अडीच हजार कोटीची कामे मंजूर
आरोग्य विभागाचा पेपर फोडणाऱ्या प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या निशीद गायकवाड याच्या संपर्कात गोपीचंद सानप होता. त्यानेच आरोग्य विभाग गट "क'चा पेपर मिळविला होता. त्यानंतर त्याने हा पेपर त्याने बीड, जालना, औरंगाबाद, नगर, परभणी, औरंगाबाद सह राज्यातील विविध जिल्ह्यातील दलालांना पुरविला होता. त्यासाठी त्याने संबंधित दलालांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम स्विकारली असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये स्पष्ट झाले होते. त्यानुसार, पोलिस मागील दोन महिन्यांपासून गोपीचंदचा शोध घेत होते. परंतु, तो पोलिसांना गुंगारा देत होता.
दरम्यान, सायबर पोलिसांचे पथक विविध जिल्ह्यांमध्ये त्याच्या मागावर होते. पोलिसांना तो बुलढाणा येथे येणार असल्याची खात्रीपुर्वक माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार, सायबर पोलिसांच्या पथकाने त्यास बुलढाणा येथे जाऊन अटक केली. बीड येथे परीक्षेचे पेपर फोडणाऱ्यांमध्ये जीवन सानप व गोपीचंद सानप असे दोन गट कार्यरत होते. त्यानुसार, आरोग्य विभागाचा पेपर फुटीच्या गुन्ह्यात त्यांचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाशी संबंधीत फरारी आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली.
Web Title: Health Department Exam Fraud Main Criminal Arrest
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..