आरोग्यमंत्री टोपेंना सापडली सोलापुरातील कोरोनाची नस 

प्रमोद बोडके
Sunday, 28 June 2020

आता लक्ष प्रशासनाच्या कार्यवाहीकडे 
महापालिका हद्दीत वाढणाऱ्या रुग्ण संख्येसोबतच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर या तालुक्‍यात दिवसेंदिवस वाढणारी रुग्ण संख्या सोलापूर जिल्हा प्रशासनापुढे आव्हान निर्माण करत आहेत. आरोग्यमंत्री टोपे यांनी दिलेल्या सूचनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची मोठी जबाबदारी जिल्हा व महापालिका प्रशासनावर आली आहे. या अंमलबजावणीवरच सोलापुरातील कोरोनाची तीव्रता अवलंबून असणार आहे. 

 

सोलापूर : कोरोनाच्या संकटात ग्राऊंड लेव्हलला जाऊन काम पाहणाऱ्या महत्वाच्या व्यक्तींमध्ये राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यांच्या या तळमळीचे व धडपडीचे नेटीझन्सनी तोंडभरुन कौतुकही केले आहे. सोलापुरात कोरोना आला कसा? इथपासून ते सोलापुरातील कोरोनाचा थांबवायचा कसा? या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यात सोलापूर जिल्ह्याचे प्रशासन अपयशी ठरले आहे. कोरोनाबाधितांची रोज वाढणारी संख्या, मृतांचा आकडा अशा चिंताग्रस्त वातावरणात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा शनिवारी झालेला सोलापूर जिल्ह्याचा दौरा प्रशासनाला नवी दृष्टी देऊन गेला आहे. 

शनिवारी रात्रीपर्यंत सोलापूर जिल्ह्यात असलेल्या एकूण 2434 बाधितांपैकी फक्त सोलापूर महापालिकेच्या हद्दीत 2141 बाधित आहेत. सोलापूर जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत मृत पावलेल्या 253 व्यक्तींपैकी 238 व्यक्ती या सोलापूर महापालिका हद्दीतील आहेत. सोलापूर जिल्ह्यात महापालिका हद्दीतील कोरोना आटोक्‍यात आणणे आवश्‍यक झाले आहे. यापूर्वीचे महापालिका आयुक्त दिपक तावरे यांच्या कालावधीत महापालिका प्रशासन सजग न राहिल्याने सोलापूर शहरातील कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेली आहे.

सोलापूर महापालिका हद्दीत अलगीकरण केल्या जाणाऱ्या व्यक्तींची संख्या सरासरी चारशे ते साडेचारशेच्या दरम्यान आहे. ही संख्या अडीच हजारापर्यंत नेण्याची सूचना आरोग्यमंत्री टोपे यांनी केली आहे. तसेच कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची वेळेत चाचणी, कॉन्टॅक्‍ट ट्रेस्टिंग करण्यासाठी दिलेल्या सूचना महत्वाच्या आहेत. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयासह इतर महत्वाच्या रुग्णालयात आयसीयु बेडची संख्या वाढविण्याचाही निर्णय सोलापूरसाठी उपयुक्त ठरणार आहे. 

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लढणारी आरोग्य यंत्रणा, महापालिकेची यंत्रणा व इतर यंत्रणेसाठी व सर्वसामान्य सोलापूरकरांसाठी येत्या काळात केली जाणारी अँटीजेन टेस्ट ही देखील सोलापुरातील कोरोना रोखण्यासाठी महत्वाचे पाऊल ठरण्याची आशा निर्माण झाली आहे. अवघ्या आर्ध्या तासात कोरोनाचा रिपोर्ट ऍन्टीजेन टेस्टमुळे मिळणार आहे. सोलापुरात जवळपास एक लाख अँटीजेन टेस्ट होणार आहेत. सोलापुरातील कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी महत्वाच्या सूचना आरोग्यमंत्री टोपे यांनी या दौऱ्यात दिल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health Minister Tope finds Corona vein in Solapur