
Thackeray vs Shinde : सत्तासंघर्षावर उद्या सुनावणी; शिंदे गटाचा उर्वरित युक्तिवाद होणार
नवी दिल्लीः राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद झाल्यानंतर शिंदे गटाच्या युक्तिवादाला सुरुवात झाली होती. परंतु वकिलांनी आणखी वेळ मागितल्याने उद्या ते युक्तिवाद करतील.
शिंदे गटाचे ज्येष्ठ वकील निरज किशन कौल आणि ज्येष्ठ वकील हरीश साळवे हे उद्या युक्तिवाद करतील. तसेच राज्यपालांच्या वतीने सॉलिटर जनरल तुषार मेहता बाजू मांडणार आहेत.
शिंदे गटाचा युक्तिवाद उद्या पूर्ण होणं अपेक्षित आहे. यासह स्थानिक निवडणुकांच्या सुनावणीचीही उद्याचीच तारीख आहे. त्याची तारीख लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. सत्तासंघर्षावर उद्या सकाळी ११ वाजता सनावणीला सुरुवात होईल.
सत्तासंघर्षावरील सुनावणी २ मार्चपर्यंतच न्यायालयाला पूर्ण करायची होती. त्यासाठी न्यायालयाने वेळापत्रक देखील ठरवले होते. मात्र, शिंदे गटाच्या वतीने हरिश साळवे यांचा युक्तिवाद पूर्ण होऊ शकला नाही.
हे प्रकरण लवकर पूर्ण करण्यासाठी सरन्यायाधीशांनी सर्व वकिलांना वेळा ठरवून दिल्या. त्या प्रमाणे मंगळवारी सकाळच्या सत्रात शिंदे गटाच्या वकिलांनी आपला युक्तीवाद पूर्ण करावा असे सांगितले.
त्यानुसार उद्या शिंदे गटाचा युक्तिवाद पूर्ण होणं अपेक्षित आहे. त्यानंतर कोर्ट आपला निर्णय देऊ शकतं. सकाळी ११ वाजल्यापासूनच सुनावणीला सुरुवात होणार आहे.