परतीच्या पावसाने नांदेडला झोडपले

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 October 2019

पावसाचा जोर उद्यापासून ओसरण्याची शक्यता
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने चांगलाच जोर  धरला आहे. रविवारपासून (ता. १३) पावसाचा जोर ओसरणार आहे. शनिवारी (ता. १२) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

नायगाव येथे १५१ मिलिमीटरची नोंद
पुणे - राज्यात परतीच्या पावसाने जोर धरला आहे. नांदेड जिल्ह्यात गुरुवारी (ता. १०) झालेल्या परतीच्या पावसामुळे काढणी सुरू असलेल्या सोयाबीन, तूर, वेचणीस आलेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले. 

पाऊस सुरू असल्यामुळे अनेक मंडळांमध्ये रब्बीची पेरणी लांबणीवर पडली आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव, नरसी, मांजरम, खानापूर, शहापूर, पेठवडज या सहा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. शुक्रवारी (ता. ११) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये नायगाव (खैरगाव) मंडळात सर्वाधिक १५१ मिलिमीटर पाऊस झाली. 

नांदेड जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये रात्रभर पाऊस सुरू असल्यामुळे शेतातील कापणी केलेल्या सोयाबीन पिकामध्ये पाणी साचून नुकसान झाले. नायगावसह धर्माबाद, बिलोली, देगलूर या सीमावर्ती भागातील तालुक्यासह मुखेड, कंधार, लोहा, उमरी तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये विजांच्या कडकडाट जोरदार पाऊस झाला.

पावसाचा दणका
    परिपक्व खरीप पिकांची प्रत खालवणार
    महाबळेश्वर तालुक्यात स्ट्राॅबेरीला फटका
    वादळी पावसाने कोकणात भात शेती अडचणीत
    रब्बीच्या पेरण्यांना पाऊस लाभदायक
    पाण्यामुळे बटाटा आणि भुईमुग पीक संकटात
    अतिवृष्टीने खरीप पिके, भाजीपाला, फुलपिकांचे मोठे नुकसान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain water monsoon agriculture loss