esakal | राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याची तीव्रता येत्या ४८ तासात वाढणार. तसेच हे क्षेत्र पुढील दोन ते तीन दिवसात ओडिशामार्गे मध्य भारताच्या दिशेने सरकेल. परिणामी राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने शनिवारी दिला आहे. तर सोमवारी (ता. १३) कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते जोरदार पाऊस पडेल.

राज्यात शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात तुरळक भागात मुसळधार पावसाची नोंद झाली. सध्या मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीत असून येत्या तीन ते चार दिवसात ते दक्षिणेकडे सरकेल. त्याचबरोबर राजस्थान व परिसरावर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र व चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असून बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे.

पुण्यात पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’

पुणे जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सध्या शहर आणि परिसरात पावसाच्या जोरदार सरी पडत असून ही स्थिती आणखीन काही दिवस अशीच कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने वर्तविले आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात ५.७ मिलिमीटर तर लोहगाव येथे १०.६ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.

शहर व परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने जोर धरला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहर व परिसरात पुढील दोन ते तीन दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच घाट विभागातील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र त्यानंतर अंशतः ढगाळ वातावरण आणि दुपारनंतर हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)

रविवारी : रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर

सोमवारी : पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर

मंगळवारी : पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर

बुधवारी : पालघर, पुणे

loading image
go to top