esakal | रोगकिडीच्या प्रादुर्भावाने ग्रासली पिके; अतिवृष्टीने नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy rains and Insects damaged the crop farmers

रोगकिडीच्या प्रादुर्भावाने ग्रासली पिके; अतिवृष्टीने नुकसान

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : राज्यात खरीप हंगामाच्या शंभर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र अगोदरच अतिवृष्टी, पूरपरिस्थितीने बाधित झालेल्या खरिपातील पिकांना रोगकिडीने ग्रासले आहे. राज्यात गेल्या वर्षीपेक्षा ८.६ टक्क्यांनी अधिक म्हणजेच ११३.२ टक्के पाऊस झाला आहे. पण दुसरीकडे मात्र अतिवृष्टीने जळगाव, धुळे, नंदुरबारसह नाशिक जिल्ह्यातील पिकांचे नुकसान झालेल्या उत्तर महाराष्ट्राला पावसाची आणखी गरज आहे. उत्तर महाराष्ट्रात गेल्या वर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत १०७.२ टक्के पावसाची नोंद झाली होती. रविवारी (ता. १२) सकाळपर्यंत ८६.२ टक्के पाऊस झाला आहे.

उत्तर महाराष्ट्राला पावसाची गरज

उत्तर महाराष्ट्रात खरिपाच्या ९३.२५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यात नाशिक जिल्ह्यातील ९६, धुळ्यातील ९६, जळगावमधील ९३ आणि नंदुरबारमधील ९१ टक्के पेरण्यांचा समावेश आहे. मात्र, उत्तर महाराष्ट्रातील पिकांच्या वाढीवर पावसाच्या खंडाचा परिणाम झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील खरिपाच्या सरासरी उत्पादनात घट येण्याचा अंदाज कृषी विभागाचा आहे. अमळनेर, पारोळा, चोपडा तालुक्यांतील मूग, उडीद उत्पादनात घट येईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, राज्यभरातील काही भागांत मका, ज्वारी, कापूस, सोयाबीन, भुईमूग, मका या पिकांवर रोगकिडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. राज्यातील खरिपाच्या पिकांमधील भात फुटवे, पोटरीच्या, सोयाबीन फुलोरा ते शेंगा धरणे व पक्वतेच्या, मूग आणि उडीद शेंगा धरणे ते पक्वता व काढणीच्या अवस्थेत आहेत. तसेच कापूस पाते लागणे ते फुलोरा व बोंड लागणे, भुईमूग आऱ्या ते शेंगा भरणे, ज्वारी-बाजरी फुलोरा ते कणसे भरणे, मका-सूर्यफूल-तीळ-कारळे वाढीच्या अवस्थेत आहेत.

मूग, बाजरी, ज्वारी, तीळ, सूर्यफुलाचे क्षेत्र घटले

पावसाच्या वेळापत्रकात बिघाड झाल्याने राज्यातील मूग, बाजरी, ज्वारी, तीळ, सूर्यफुलाच्या क्षेत्रात घट झाली आहे. ज्वारीची पेरणी ४३ टक्के झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ती २५ टक्क्यांनी कमी आहे. शिवाय बाजरीची पेरणी ७५ टक्के झाली असून, गेल्या वर्षीपेक्षा २१ टक्क्यांनी कमी आहे. मुगाचे क्षेत्र गेल्या वर्षीपेक्षा चार टक्क्यांनी घटले असून, आता ७८ टक्के पेरणी झाली. तिळाची लागवड ३२, तर सूर्यफुलाची ८२ टक्के झाली आहे. भाताची लागवड १०२, मक्याची १०३, तुरीची १०४, उडीदची १२०, भुईमुगाची १०१, सोयाबीनची १०७, कापसाची ९३ टक्के झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा कमी लागवड झालेल्या पिकांमध्ये कापसाचा समावेश आहे.

हेही वाचा: ई-पीक पाहणीला ३० सप्टेंबरपर्यत मुदतवाढ

विभागनिहाय खरिपाच्या पेरण्या

(आकडेवारी टक्केवारीमध्ये दर्शवते)

कोकण - ९४

नाशिक - ९३.२५

पुणे - १३३

कोल्हापूर - १००

औरंगाबाद - १००

लातूर - ९८

अमरावती - ९८

नागपूर - १००

हेही वाचा: सणासुदीत गॅस सिलिंडर दरवाढीने अर्थकारण बिघडले

loading image
go to top