पुणे विभागात अतिवृष्टीमुळे 29 जणांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

पुणे जिल्ह्यातील पुणे शहरासह, हवेली, बारामती, इंदापूर, दौंड आणि सासवड तसेच सांगली जिल्ह्यात मिरज, वाळवा, तासगांव आणि पलूस तालुक्‍यांमध्ये शंभर मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

पुणे - अतिवृष्टीमुळे पुणे विभागातील कोल्हापूर वगळता चार जिल्ह्यांमध्ये 29 नागरिकांचा मृत्यू झाला असून, आठ जण बेपत्ता आहेत. वाड्या-वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे 40 हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. तसेच, 87 हजार 416 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. 

पुणे विभागातील सोलापूर, सांगली, पुणे आणि सातारा जिल्ह्याला बुधवारी (ता. 14) झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा, करमाळा, माळशिरस तालुक्‍यांमध्ये शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. पुणे जिल्ह्यातील पुणे शहरासह, हवेली, बारामती, इंदापूर, दौंड आणि सासवड तसेच सांगली जिल्ह्यात मिरज, वाळवा, तासगांव आणि पलूस तालुक्‍यांमध्ये शंभर मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे आणि भिंत पडून पुणे जिल्ह्यात सात, सातारा दोन, सांगली सहा आणि सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, पुणे जिल्ह्यात एकजण बेपत्ता आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे विभागात दोन हजार 4156 घरांची पडझड झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. पुणे विभागातील 40 हजार 036 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. 

पडझड झालेल्या घरांची संख्या : 
पुणे 13 
सातारा 267 
सांगली 323 
सोलापूर 1716 

जिल्हानिहाय पिकांचे नुकसान, हेक्‍टरमध्ये : 
पुणे : ऊस, सोयाबीन, भाजीपाला, डाळिंब, भात (18 हजार 746 हेक्‍टर) 
सातारा : भात, भाजीपाला, ऊस आणि सोयाबीन ( एक हजार 420 हेक्‍टर) 
सांगली : सोयाबीन, ऊस, कापूस, डाळिंब, तूर, भाजीपाला (आठ हजार 276 हेक्‍टर) 
सोलापूर : सोयाबीन, ऊस, कापूस, डाळिंब, तूर, भाजीपाला (58 हजार 581 हेक्‍टर) 
कोल्हापूर : भात, ऊस, भुईमूग, सोयाबीन (393 हेक्‍टर) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains kill 29 deaths in Pune