Shivrajyabhishek Sohala : शिवचरित्र असे वाचा hemant sambare writes chhatrapati shivaji maharaj Shivrajyabhishek sohala Read Shiva Charitra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhatrapati Shivaji Maharaj

Shivrajyabhishek Sohala : अवघ्या विश्वाचे आदर्श असणाऱ्या शिवरायांचे चरित्र नेमके कसे वाचावे?

- हेमंत सांबरे

छत्रपती शिवराय हे आज नुसत्या महाराष्ट्राचे नव्हे, नुसत्या भारताचे नव्हे तर अवघ्या विश्वाचे आदर्श आहेत. याच शिवरायांचे चरित्र नेमके कसे वाचावे? हा अभ्यास करताना आणि त्याकडे तटस्थपणे बघताना चार प्रकारच्या कालखंडात विभागणी करावी लागेल.

कालखंड क्रमांक - १

शिवरायांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र आणि भारत विजयनगरचे हिंदू साम्राज्य १५६५च्या दरम्यान पाच मुस्लिम शाह्यांनी एकत्र येऊन नष्ट केले. विजयनगरचा शेवटचा राजा रामदेवराय हा सर्वधर्मसमभाव (हा शब्द वा वृत्ती तेव्हा सार्वत्रिक नव्हती, परंतु रामदेवराय मात्र त्याप्रमाणे राज्य चालवीत होता.) पाळत होता. याच कारणाने त्याच्या या राज्यात दोन मुस्लिम सरदार अतिशय महत्त्वाच्या पदावर जाऊन बसले होते. १५६५ला आजूबाजूच्या पाच बहामनी मुस्लिम राज्यांनी एकत्र येऊन या विजयनगरच्या हिंदू राज्यावर निकराचा हल्ला केला.

ऐन युद्धात रामरायाच्या या दोन मुस्लिम सरदारांनी खाल्लेल्या मिठाबरोबर गद्दारी करून धर्माला जास्त महत्त्व दिले व बहामनी राजांच्या बाजूने जाऊन मिळाले, त्यामुळे विजयनगरचा मोठा पराभव झाला. सर्वधर्मसमभाव पाळणाऱ्या व अखंड सावध नसणाऱ्या रामदेवरायाला ठार मारले गेले व त्याचे मस्तक अहमदनगरच्या निजामशहाने त्याच्या महालाचे सांडपाणी जेथे पडते तेथे ठेवले आणि त्या मस्तकावरून त्यांनी अंघोळ वा इतर विधी केलेले पाणी वाहू लागले. खूप गडद अंधार दाटून येतो, तेव्हाच आशेचा एका छोटासा किरणही खूप मोठे काम करत असतो आणि हा आशेचा किरण म्हणजे शहाजी-जिजाऊ यांच्या मनात पेटून उठलेली हिंदूंवरील अन्यायाची चीड!

कालखंड क्रमांक - २

शिवरायांचा काळ

शिवनेरीवर १६३०मध्ये शिवरायांच्या जन्माने एका नव्या सूर्याचा उदय झाला झाला!

ही मूळ भूमी हिंदूंची असूनही ते मात्र उपेक्षित झाले होते, गुलाम झाले होते! त्याचवेळी त्यांचा स्वाभिमानही मेला होता. जे मराठे वा हिंदू सरदार मुस्लिम शाह्यांची चाकरी करत होते, ते फक्त स्वार्थ बघत होते, त्यांना सर्वसामान्य रयतेचे काही घेणे देणे नव्हते! त्यांच्या देखत मूर्त्या, मंदिरे, पुजास्थाने भ्रष्ट -नष्ट होत होती. औरंगजेबाची महत्त्वाकांक्षा निःसंशय धार्मिक होती, त्याला या भारत देशाला पूर्णपणे इस्लामिक देश बनवायचे होते. परंतु त्याच्या या आसुरी वेडाच्या समोर छत्रपती शिवाजीराजे, संभाजीराजे व समस्त मराठे सह्याद्री बनून आडवे आले.

१) शिवरायांनी परधर्मात गेलेल्या नेताजी पालकर व बजाजी निंबाळकर यांना शुद्ध करून परत हिंदू धर्मात घेतले व त्यांच्या बरोबर भोजन घेतले. त्यांच्या कुटुंबालाही परत सन्मान दिला.

२) शिवराय गोव्याच्या मोहिमेवर असताना त्यांना भग्न अवस्थेत असलेले मूळ कदंब राजांनी बांधलेले व मधल्या काळात बहामनी राज्यांत पाडले गेलेले मंदिर दिसले. शिवरायांनी मग या मंदिराचाही जीर्णोद्धार केला.

३) शिवाजी महाराज नियमितपणे पूजाअर्चा करत व मोहिमेवर असतानाही त्यांचे पूजेचे शिवलिंग स्फटिक त्यांच्याबरोबर असायचे.

४) जिथे जिथे त्यांनी नवीन किल्ले बांधले तिथे त्यांनी अनेक नवीन मंदिरेही बांधली. कुठेही त्यांनी मशीद वा चर्च असे काही उभारली नाहीत.

कालखंड क्रमांक - ३

संभाजी महाराजांचे बलिदान आणि दिल्लीवर भगवा!

संभाजीराजांचे चारित्र्य जिजाऊंनीच मुख्यत्वे घडवले. १६८९ला औरंगजेबाने संभाजीराजांना पकडले तेव्हा ते अवघे ३३ वर्षांचे होते. त्याने संभाजी राजांच्या समोर मुस्लिम धर्म स्वीकारणे वा मृत्यू हे पर्याय ठेवले. त्यांनी व कवी कलश यांनी अतिशय धैर्याने मृत्यूचा स्वीकार केला, पण मुस्लिम धर्म स्वीकारला नाही.

संभाजी महाराजांचे हे बलिदान म्हणजे अभूतपूर्व ठरले व मराठे सूडाने पेटून उठले, पुढच्या पन्नास-साठ वर्षांत मराठ्यांनी मुघलांचे साम्राज्य पूर्णपणे उध्वस्त केले! शिवरायांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण झाले. पुढे थोर मराठा सरदार महादजी शिंदे यांनी दिल्लीवर भगवा फडकवला.

कालखंड क्रमांक - ४

सध्याचा काळ

सध्या एक संक्रमण काळ सुरू आहे. हिंदू समाजात संभ्रम निर्माण केला जात आहे. आपले सर्वोत्तम आदर्श म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे सर्वधर्मसमभाव मानणारे होते, त्यांच्या सैन्यात खूप सारे मुस्लिम होते, त्यांना हिंदू धर्माचा काही विशेष अभिमान नव्हता. अर्धवट अभ्यास असणारे व ज्यांचे फार असे वाचन नाही असे लोक गोंधळून जाणे वा संभ्रमित होणे सहज शक्य आहे.

छत्रपती शिवाजीराजे परधर्माचा द्वेष कधीही करत नव्हते. स्वतः जिजाऊ व शिवराय त्यावेळच्या मुस्लिम राज्यकर्त्यांचा कावाही ओळखून होते, म्हणूनच त्यांनी साध्या मावळ्यांमध्येही स्वधर्म (हिंदू धर्म) व स्वराज्य (हिंदूंना न्याय देणारे स्वतःचे राज्य) याचा स्वाभिमान जागा केला. त्यामुळेच हे मावळे प्रत्येक युद्धात धैर्याने लढले व प्रसंगी मृत्यूला ही त्यांनी यास्तव कवटाळले!

हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेऊन आपापसांतील जातिभेद, मतभेद विसरून अभूतपूर्व असे एकत्र येऊ या! हीच गोष्ट आपण शिवाजी महाराज यांचे चरित्र योग्य अर्थाने समजून घेतल्याची मुख्य खूण असेल.

जिजाऊसाहेब व शिवराय यांना उद्देशून म्हटले जाते,

तुम्ही नसता तर,

नसती दिसली अंगणात तुळस,

तुम्ही नसता तर,

नसते दिसले मंदिरांचे कळस!

तुम्ही नसता तर,

नसते दिसले सुहासिनींच्या भाळी कुंकू!

पतिव्रतांच्या किंकाळ्या मग,

विरल्या असत्या रानी!

म्हणूनच शिवरायांचे चरित्र निर्माण होण्याची प्रेरणा व उद्देश हिंदूंनी कधीही विसरू नये.