एआयएमध्येही घराणेशाही; प्रदेशाध्यक्षांचा मुलगा करणार राजकारणात प्रवेश?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 July 2019

पत्रकार ते राजकारणी असा प्रवास केलेले औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांचे पुत्र बिलाल हे देखील आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात प्रवेश करण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून एमएची पदवी घेतल्यानंतर बिलाल यांनी तिथेच पत्रकारितेचे धडे गिरवत एमसीजेचे शिक्षण पुर्ण केले आहे. 

औरंगाबाद : पत्रकार ते राजकारणी असा प्रवास केलेले औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांचे पुत्र बिलाल हे देखील आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात प्रवेश करण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून एमएची पदवी घेतल्यानंतर बिलाल यांनी तिथेच पत्रकारितेचे धडे गिरवत एमसीजेचे शिक्षण पुर्ण केले आहे. 

सध्या एका न्यूज पोर्टलच्या माध्यमातून बिलाल प्रत्यक्ष पत्रकारितेचा अनुभव घेत आहेत. लोकसभा निवडणुकीत वडील इम्तियाज जलील यांच्या प्रचारात बिलाल सक्रीय होते. आता तर एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत देखील बिलाल यांच्या गाठीभेठी वाढल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर येत्या विधानसभा निवडणुकीत बिलाल यांची राजकारणात एन्ट्री होऊ शकते अशी चर्चा आहे. 

औरंगाबादचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांचा राजकीय प्रवास स्वप्नवत वाटावा असाच होता. पुण्याच्या सिम्बॉयसिस संस्थेत पदवी आणि नंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतल्यावर इम्तियाज यांनी पत्रकारीला सुरूवात केली. इलेक्‍ट्रॉनिक, प्रिंट मिडियातून सामाजिक प्रश्‍नांना वाचा फोडत असतांना प्रत्यक्षात विधानसभा किंवा लोकसभेत ते आपल्याला मांडण्याची संधी मिळेल असं कधी त्यांना वाटलंही नसेल. परंतु 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्यापुढे ही संधी चालून आली. एमआयएमकडून औरंगाबाद मध्यमधून उमेदवारी आणि पंधरा दिवसांच्या प्रचारानंतर थेट विजय मिळवत विधानसभा गाठण्यात इम्तियाज जलील यशस्वी ठरले होते. आमदारकीची टर्म संपत नाही तोच, पुन्हा नशिबाने साथ दिली आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात अशक्‍यप्राय वाटणार विजय मिळवत इम्तियाज जलील यांनी दिल्ली गाठली. 

बिलाल यांचा राजकारणातील वावर वाढला 
इम्तियाज जलील यांना दोन मुले आहेत, बिलाल आणि हमजा. यापैकी बिलाल याने वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत वाटचाल सुरू केली आहे. पत्रकारितेचे शिक्षण घेतल्यानंतर बिलाल सध्या सोशल मिडियावर प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेत आहेत. मुंबईच्या गल्लीबोळात फिरून " बिलाल की बक बक' कार्यक्रमांतर्गत "एक दिन का प्राईम मिनिस्टर' हा त्यांचा शो चांगलाच गाजला होता. दरम्यान, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात देखील बिलाल यांनी वडीलांच्या प्रचारासोबतच पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे सगळी कामे केली. इम्तियाज जलील यांची सावली बनून सध्या बिलाल वावरत आहेत. राजकारणात यशस्वी होण्याचे बाळकडूच जणू ते घेत असल्याचे यावरून स्पष्ट होते. खासदार झाल्यानंतर इम्तियाज जलील यांनी संसदेच्या पहिल्याच अधिवेशनाला हजेरी लावली तेव्हाही बिलाल दिल्लीत त्यांच्यासोबत होते. 

एमआयएमचे नेते, लोकप्रतिनिधी व महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत देखील बिलाल यांची उठबस वाढली आहे. इम्तियाज जलील यांनी नुकताच एक फोटो आपल्या फेसबुक पेजवरून शेअर केला, यात एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी, खासदार व महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील, आमदार वारीस पठाण आणि बिलाल जलील एकाच टेबलवर जेवण करतांना दिसत आहेत. यात बिलाल यांच्याबद्दल ओवेसी यांनी केलेली कमेंट आणि त्यावर इतरांची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात एमआयएम शंभरहून अधिक जागा लढवण्याच्या तयारीत आहे. तसा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना दिल्ली भेटीत देण्यात आल्याची देखील चर्चा आहे. राज्यात शंभर विधानसभेच्या जागा लढवायच्या झाल्यास एमआयएमला सुशिक्षित, चारित्र्यवान तरूणांची गरज भासणार आहे. बिलाल जलील यांची असदुद्दीन ओवेसी व एमआयएमच्या इतर नेत्यांशी वाढती जवळीक पाहता येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांची राजकारणात एन्ट्री होऊ शकते या चर्चेने सध्या जोर धरला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hierarchy in MIM, Imtiyazz jaleels son may enter in politics