Rain Alert : मतदानादिवशी या जिल्ह्यांत 'पावसाचा हाय अलर्ट'!

टीम ई-सकाळ
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

शुक्रवारपासून मुंबई आणि उपनगर, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे.

मुंबई : परतीच्या पावसामुळे सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाच्या सरी बरसत आहेत. मान्सूनने महाराष्ट्राचा निरोप घेतल्याचे जाणवत असतानाच बिगर मोसमी पावसाला सुरवात झाली आहे. 

हवामान शास्त्र विभाग पुणेने दिलेल्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोकण, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत सोमवारी (ता.21) जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या दिवशी राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याने त्याचा फटका मतदानावर होणार आहे. 

मतदानादिवशी कुठे कुठे कोसळणार पाऊस?

शुक्रवारपासून मुंबई आणि उपनगर, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागांत सोमवारीही पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

पश्चिम महाराष्ट्र : ऑरेंज अलर्ट

पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली आणि अहमदनगर या जिल्ह्यांत शनिवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. काही ठिकाणी मुसळधार पाऊसही झाला. त्यामुळे या भागात आणखी काही दिवस अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाडा : यलो अलर्ट

मराठवाड्यातील बीड आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

कोकण किनारपट्टी : ग्रीन अलर्ट

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असला तरी पुढील आठवडाभर वातावरण ढगाळ राहील. तर काही ठिकाणी पाऊस सोसाट्याच्या वाऱ्यासह हजेरी लावू शकतो.

अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटाजवळ वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. परिणामी, मोसमी पावसाने आपले काम बजावल्यानंतरही पाऊस होण्याला हे महत्त्वाचे कारण आहे. मंगळवारपर्यंत ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. 

- के. एस. होसाळीकर, सहसंचालक, पश्चिम प्रभाग

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- तळीरामांसाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून खुशखबर.. पाहा काय आहे खुशखबर!

- Vidhan Sabha 2019 : ‘हे कसले पहिलवान, आज या तालमीत तर उद्या त्या’; पवारांचा इंदापुरात टोला

- माजी मंत्री रेड्डी येणार अडचणीत; सीबीआयकडून होणार चौकशी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: High rainfall alert in these districts of Maharashtra on Monday