esakal | इराण, इंडोनेशिया, मलेशिया येथे भारतातून यंदा झाली उच्चांकी साखर निर्यात

बोलून बातमी शोधा

इराण, इंडोनेशिया, मलेशिया येथे भारतातून यंदा झाली उच्चांकी साखर निर्यात

कोरोनामुळे अडचणीत पडली भर
कोरोनामुळे साखर उद्योगाच्या आर्थिक अडचणीत भर पडली आहे. एफआरपी देण्यासाठी सरकार कारखान्यांना कायदा दाखविते. मात्र, साखर निर्यात अनुदान वेळेवर देत नाही. सरकारने ते वेळेत द्यायला हवे.
राजेंद्र गिरमे, व्यवस्थापकीय संचालक, दि सासवड माळी शुगर फॅक्‍टरी, माळीनगर

इराण, इंडोनेशिया, मलेशिया येथे भारतातून यंदा झाली उच्चांकी साखर निर्यात
sakal_logo
By
प्रदीप बोरावके

माळीनगर (सोलापूर) ः कोरोना साथीचा संसर्ग असला तरीही भारताने यंदा दशकातील उच्चांकी साखर निर्यात केली आहे. भारतीय साखर उद्योगाला सर्वाधिक प्रसिद्ध बाजारपेठ असलेल्या इराण, इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांना जूनअखेर 49 लाख टन साखर निर्यात झाली आहे.

इंडियन शुगर मिल्स असोशिअशनच्या (इस्मा) मते पुढील काही महिन्यांत आणखी चार ते पाच लाख टन साखर निर्यात होईल. यंदा 60 लाख टन निर्यातीचे उद्दिष्ट असताना पुढील गाळप हंगाम सुरू होईपर्यंत 53 ते 54 लाख टन साखर निर्यात झालेली असेल. काही कारखान्यांची साखर निर्यातीची अनिच्छा हे उद्दिष्ट साध्य न होण्यामागचे कारण असल्याचे "इस्मा' ने म्हटले आहे. देशातील जवळपास 125 कारखान्यांनी त्यांना नेमून दिलेला साखरेचा कोटा निर्यात केला नाही.

यंदा साखर निर्यात उद्दिष्टाच्या खाली असली तरीही दशकातील ही विक्रमी निर्यात आहे. 2018-19 या हंगामात 38 लाख टन साखर निर्यात झाली होती. यावर्षी भारतीय साखरेला इराण, मलेशिया, इंडोनेशिया, श्रीलंका आणि अफगाणिस्तानातून चांगली मागणी आहे. महाराष्ट्रात एकामागोमाग विक्रमी साखर उत्पादन झाल्याने 2019-20 हंगाम सुरु होण्यापूर्वी विक्री न झालेली साखर मोठ्या प्रमाणात होती.
शेतकऱ्यांची बिले देण्यासाठी साखर उद्योगास अर्थसहाय्य म्हणून केंद्र सरकारने साखर निर्यातीस प्रतिटन 10 हजार 448 रुपये अनुदान जाहीर केले होते. थायलंड हा आशियाई देशांना साखर पुरवठा करणारा प्रमुख देश आहे. थायलंडमधील दुष्काळ व केंद्राची साखर निर्यात अनुदान योजना असा दुहेरी फायदा भारतीय साखर उद्योगाला झाला. थायलंडमध्ये दरवर्षी सरासरी 140 लाख टन साखर उत्पादन होते. दुष्काळामुळे येत्या हंगामात तेथे 80 लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे. त्यामुळे थायलंड साखर पुरवठा करीत असलेल्या देशांना साखर निर्यात करण्याची संधी भारतीय साखर उद्योगाला आहे. पुढील हंगामात देशात 305 लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे 60 ते 70 लाख टन साखर निर्यात होईल व पुढील हंगामात देखील साखर निर्यात अनुदान योजना अशीच असेल, अशी
अपेक्षा "इस्मा' ला आहे.

दशकातील साखर निर्यात
हंगाम साखर निर्यात (लाख टन)
2009-10 2.35
2010-11 26
2011-12 29.92
2012-13 3.48
2013-14 21.27
2014-15 10.94
2015-16 16.54
2016-17 0.46
2017-18 4.64
2018-19 38

संपादन ः संतोष सिरसट